या महिलेमुळे ऊसाचा उतारा वाढू शकला.

एक काळ असा होता जेव्हा ऊसाचा उतारा पडायचा नाही. तसा तो आत्ता पण पडत नाही पण त्यामागं राजकारण असत. हि गोष्ट तेव्हाची जेव्हा ऊस खऱ्या अर्थाने गोड नव्हता. म्हणजे ऊसापासून बनवण्यात येणारी साखर पण कमी गोड असायची. जागतिक पातळ्यांवर असणारा ऊसाचा दर्जा आणि भारतात असणारा ऊसाचा दर्जा यात जमीनअस्मानचा फरक होता. बर हा काळ नेमका कोणता होता तर

भारतात तेव्हा खाजगी साखर कारखाने होते, सहकारी तत्वावर साखर कारखाने उभा राहून शकतात या गोष्टींना बळ मिळत होतं आणि भारताच्या पीकक्षेत्रात ऊस नावाच नवं पीक येवू शकतं याची जाणीव शेतकऱ्यांना होत होती.

म्हणजेच तो काळ १९४० ते १९५० च्या दरम्यानचा होता. या काळात ऊस उत्पादक, कारखानदार यांच्या समोरची समस्या होती ती म्हणजे ऊसामध्ये कमी असणारा उतारा थोडक्यात कमी गोडवा. याच काळात केरळमध्ये एक मुलगी शिक्षणाच्या प्रवाहातून स्वत:ला सिद्ध करत होती. ज्या काळात मुलींनी शिक्षण घेणं देखील अवघड होतं त्या काळात या मुलीने सायटोजेनेटिक्स सारख्या विषयात पदवी करत होती. 

“एदावलेत कक्कट जानकी अम्मल” 

त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९७ रोजी केरळमधील तेलिचेरी येथे झाला. त्या सायटोजेनेटिक्स आणि फायटोगॉजीमध्ये वैज्ञानिक संशोधन केलेल्या भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ होत्या. तेलिचेरीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी क्वीन मेरियर्स महाविद्यालयामधून पदविका आणि पुढे प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून १९२० मध्ये वनस्पती शास्त्राची पदवी प्राप्त केली होती. नंतर प्रेसिडेन्सी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या प्रेरणेने अम्मल यांनी सायटोजेनेटिक्स विषयात पदवी प्राप्त केली होती.

मद्रास येथे महिला ख्रिश्चन महाविद्यालयात शिकत असताना १९२५ मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळविली. भारतात परतल्यावर त्यांनी महिला ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिक्षण सुरू ठेवले. त्या प्रथम ओरिएंटल बारबोर फेलो म्हणून मिशिगनला गेल्या. तेथेही त्यांनी अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक विद्यापीठांपैकी एक असलेल्या विद्यपीठामध्ये Phd मिळवली.

१९३२ साली त्या भारतात महाराजा कॉलेज ऑफ बॉटनी या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकण्यासाठी परत आल्या. आणि या ठिकाणी एक क्रांन्तीकारी संशोधनास सुरवात झाली.

एदावलेत कक्कट जानकी अम्मल यांनी ऊसामध्ये असणाऱ्या कमी गोडव्याचा प्रमाणावर संशोधन सुरू केलं. 

१९३२ ते १९३४ त्यांनी शुगर केन ब्रिडींग स्टेशन कोईमत्तुर येथे गेल्या तिथे त्यांनी शुगर केन बायोलॉजी वर संशोधन सुरू केलं. त्याकाळात पापुआ निगीनी चा ऊस सर्वात गोड मानला जायचा, त्यामुळे भारताला तिथून ऊसाचे बियाणे आयात करण्यात येत असे. मात्र त्यांनी भारतातच गोडवा असणारा ऊस निर्माण करण्याच्या संशोधनास सुरवात केली. व याच कामात त्या यशस्वी झाल्या.

त्यानंतर नोबेल विजेत CV रामण यांनी जानकी यांनी पहिल्याचं वर्षी रिसर्च फेलो म्हणून निवड केली, पण त्या तिथे जातीभेद आणि महिला असण्याचा त्रास सहन करावा लागला. संशोधनात होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. लंडनमध्ये गेल्यानंतर त्यांचे काम पाहून रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटीने काम करण्यासाठी सन्मानाने बोलवलं. 

पुढे १९५१ साली पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना स्वतः आमंत्रण देऊन भारतीय वनस्पती वैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेची पुनर्रचना करण्यास सांगितले.

केरळमधील सदाहरित वनांमधून त्यांनी औषधी गुणधर्म असलेल्या व आर्थिकदृष्ट्या मौल्यवान समजल्या जाणाऱ्या झाडाझुडपांच्या नमुन्यांचा संग्रह केला. त्या भारतीय विज्ञान अकादमीच्या एक संस्थापक होत्या. अम्मल यांनी १९३५ साली भारतीय विज्ञान अकादमीचे फेलो आणि १९५७ मध्ये इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे सदस्य म्हणून काम केले.

मिशिगन विद्यापीठाने त्यांना मानद एलएल.डी हा बहुमान दिला. १९५६ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. भारत सरकारच्या पर्यावरण आणि वनीकरण मंत्रालयाने २००० मध्ये त्यांच्या नावावर वर्गीकरण राष्ट्रीय पुरस्कार सुरू केला आहे. दिनांक ७ फेब्रुवारी १९८४ रोजी रिसर्च लॅबमध्ये काम करत असताना त्यांचे निधन झाले. पण आपण एक गोष्ट मात्र विसरता कामा नये, ती म्हणजे त्यांच्यामुळेच भारतात ऊस पीकाबाबत संशोधन करण्यास सुरवात करण्यात आली. त्यांच्या संशोधनामुळे जास्त उतारा पडणारा ऊस निर्माण करण्यात आला व त्याचाच परिणाम म्हणजे तुमच्या ऊसाचा दर आणि चहाचा गोडवा कणभर वाढला.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.