भारताचा पहिला विकेटकिपर मराठी होता, रिटायर झाल्यावर वॉचमनची नोकरी करावी लागली

आज घडीला क्रिकेटमध्ये जितका पैसा उधळला जातो त्या तुलनेत पूर्वी भारतीय क्रिकेटर लोकांना इतके पैसे मिळत नसत. क्रिकेटमधून रिटायर झाल्यावर आधीच्या क्रिकेटर लोकांना पोटापाण्यासाठी दुसरा उद्योग करावा लागायचा.

पूर्वी बीसीसीआय इतकं गरीब कोणीच नव्हतं आणि आज बीसीसीआयचा थाट आपण बघतोच आहे. क्रिकेटमधून रिटायर झाल्यावर अत्यंत दुर्दैवी हाल आपल्या मराठी आणि भारताच्या पहिल्या विकेटकिपरचे झाले होते.

तर भारताकडून खेळणारे पहिले विकेटकिपर आणि बॅट्समन होते जनार्दन ज्ञानोबा नवले. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून पहिला चेंडू खेळण्याचा मानसुद्धा जनार्दन नवलेंनाच जातो.

हा सगळा पराक्रम नवलेंनी १९३२ साली इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स टेस्टमध्ये केला होता.

७ डिसेंबर १९०२ साली महाराष्ट्राच्या फुलगावमध्ये जनार्दन नवलेंचा जन्म झाला. घरची शेती होतीच शिवाय वडिलांचा कपड्यांचा सुद्धा व्यवसाय होता. नवले यांचा समावेश हा त्याकाळच्या टॉप विकेटकिपर लोकांमध्ये केला जायचा. 

जॅक हॉब्स हे नवलेंना बर्ट ओल्डफील्ड आणि जॉर्ज डकवर्थ सारख्या चॅम्पियन खेळाडूंच्या बरोबरीचं मानायचे. फर्स्ट रेट विकेटकिपर म्हणून नवलेंचा नामोल्लेख केला जायचा.

साडे पाच फूट उंची असलेले नवले अत्यंत चपळ विकेटकिपर म्हणून ओळखले जायचे. ६५ मॅचमधे १०१ कॅच आणि ३६ स्टम्पिंग नवलेंच्या नावावर आहेत. बॅटिंगमध्ये त्यावेळी भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाजांचा सामना करायला कचरायचे, तेव्हा जनार्दन नवले हे हार्ड हिटर म्हणून प्रसिद्ध होते.

फास्ट बॉलिंगला तर ते फोडून काढण्यात पटाईत होते. स्थानिक क्रिकेटमधली कामगिरी त्यांना भारतीय संघात घेऊन आली.

१९३२ साली जेव्हा भारताच्या पहिल्या टेस्टसाठी घोषणा झाली तेव्हा नवलेंची निवड होणं साहजिकच होतं कारण प्रॅक्टिस मॅचमध्ये नवलेंनी जबरदस्त कामगिरी केलेली होती. प्रॅक्टिस मॅचमधल्या कामगिरीच्या बळावर नवलेंची भारताच्या पहिल्या टेस्टसाठी निवड झाली. 

या दौऱ्यात नवलेंना जास्त काही करता आलं नाही, या टेस्टमध्ये त्यांनी फक्त २५ धावा केल्या होत्या पण त्यांच्या विकेटकिपिंगनं लोकांची मनं जिंकली.

नंतर नवले हे भारतात खेळल्या जाणाऱ्या टेस्टचे मानकरी ठरले. पण यानंतर त्यांना टेस्ट खेळण्याची संधीच मिळाली नाही. शेवटी संधी मिळत नसल्याच्या कारणाने नवलेंनी क्रिकेटमधून संन्यास घेतला.

पण भारतीय टीममधून संन्यास घेतल्यानंतर जनार्दन नवलेंना काही पेन्शन मिळाली नाही त्यामुळे उदरनिर्वाहासाठी नवलेंनी एका चिनी मिलमध्ये सेक्युरिटीची नोकरी धरली. मॅच खेळूनसुद्धा खेळाडूंना तेव्हा पुरेसे पैसे दिले जात नसायचे.

७ सप्टेंबर १९७९ मध्ये जनार्दन नवलेंचं निधन झालं. पण त्यांचा शेवटचा काळ अत्यंत दुर्दैवी होता. अत्यंत गरीब परिस्थितीत नवलेंना दिवस काढावे लागले.

नवलेंबद्दल असंही सांगण्यात यायचं,  की शेवटच्या काळात त्यांच्यावर भीक मागण्याचीही वेळ आली होती. नवलेंसारखा खंदा बॅट्समन आणि जबरदस्त विकेटकिपरवर त्याच्या शेवटच्या काळात अत्यंत दुर्दैवी वेळ आली होती.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.