जाने भी दो यारों मध्ये दु:शासन साकारणारा हा व्यक्ती तुम्हाला माहित आहे का..?

ढासळलेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर विनोदी अंगाने भाष्य करून प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे फार मोजके सिनेमे हिंदी सिनेसृष्टीत बनवले गेले आहेत.

या सिनेमांपैकी एक महत्वाचा सिनेमा म्हणजे ‘जाने भी दो यारो’. हा काळाच्या पुढचा विचार करणारा सिनेमा ठरला. जमाना कितीही बदलला तरी काही कलाकृतींचा प्रत्येक काळात संबंध असतो.

हा सिनेमा रिलीज होऊन ३७ वर्ष उलटून गेली तरीही या सिनेमात दाखवण्यात आलेली परिस्थिती आजच्या काळात सुद्धा तितकीच लागू होते.

भारतीय सिनेसृष्टीत ग्रेट सिनेमांच्या यादीत या सिनेमाचा समावेश करण्यात आला आहे. या सिनेमाशी संबंधीत एक किस्सा आज उलगडणार आहोत.

विधू विनोद चोप्रा आपल्या सर्वांना माहीत आहेत. थोडक्यात त्यांची ओळख सांगायची झाली तर, हिंदी सिनेसृष्टीत सुपरहिट ठरलेल्या ‘मुन्नाभाई सिरीज’, ‘पिके’, ‘3 इंडीयट्स’, ‘संजू’ या लोकप्रिय सिनेमांच्या निर्मितीची जबाबदारी विधू विनोद चोप्रा यांनी सांभाळली.

तसेच ‘1942 : अ लव्ह स्टोरी’, ‘मिशन कश्मीर’, ‘परिंदा’ अशा गाजलेल्या हिंदी सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. काम मोजकंच करावं पण ते दर्जेदार करावं, अशी भावना असणारी काही माणसं असतात. विधू विनोद चोप्रा अशाच माणसांपैकी एक. त्यांच्या आजवरच्या सिने कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांचे बहुतांश सर्व सिनेमे लोकांना आवडले आहेत.

विधू विनोद चोप्रा यांचा जन्म भारतातील जम्मू काश्मीर येथे असलेल्या श्रीनगर भागात झाला.

१९९० साली काश्मिरी पंडितांवर जिहादी माणसांकडून हल्ले करण्यात आले. त्यामुळे कुटुंबाला घेऊन विधू विनोद चोप्रा त्यांच्या आईने काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे दिग्दर्शनात करिअर करण्याच्या उद्देशाने विधू विनोद चोप्रा यांनी पुण्यातील FTII मध्ये प्रवेश घेतला.

विषय ‘जाने भी दो यारो’ चा होता आणि अचानक लेखाची गाडी विधू विनोद चोप्रा यांच्या आयुष्याकडे कशी वळली, असा प्रश्न तुमच्या मनात आला असावा. तर… FTII मधून पास आऊट होऊन विधू विनोद चोप्रा यांनी प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून ‘जाने भी दो यारो’ साठी काम करायला सुरुवात केली. कुंदन शाह सिनेमाचे दिग्दर्शक. सिनेमाच्या प्रॉडक्शन टीममध्ये विधू विनोद चोप्रा काम करत होते.

कोणताही व्यत्यय न येता सिनेमाचं शुटिंग व्यवस्थित होणं, सर्व कलाकारांना काय हवं – नको ते बघणं, अशी जबाबदारी विधू विनोद चोप्रा सांभाळत होते.

‘जाने भी दो यारो’ मधला सर्वात गाजलेला सिन म्हणजे म्हणजे महाभारताचा प्रसंग.

रंगमंचावर महाभारत नाटक सुरू असतं. इतक्यात एकमेकांचा पाठलाग करणारे सर्वजण नाटकाच्या ठिकाणी विंगेत येऊन पोहोचतात. इथे आल्यावर नाटकांच्या मुळ कलाकारांना बाजूला करून ही मंडळी स्वतः महाभारतातील भूमिका करतात. आणि मग हे सर्वजण स्टेजवर जो काय धिंगाणा घालतात, तो सिनेमात पाहणं उचित. या प्रसंगात दुःशासनाच्या भूमिकेत विधू विनोद चोप्रा पाहायला मिळतात.

विधू विनोद चोप्रा ही भूमिका साकारणार नव्हते.

अगदी शेवटच्या क्षणाला त्यांना ही भूमिका करावी लागली.

यामागचं कारण असं…

दुःशासनाच्या भूमिकेसाठी एका वेगळ्या कलाकाराची निवड झाली होती. त्याचं मानधन ठरलं होतं ५०० रुपये. पण ऐन शॉटच्या वेळेस मानधन कमी आहे म्हणून तो कलाकार अडून बसला. विधू विनोद चोप्रा त्या कलाकाराला समजावत होते.

पण तो कलाकार मानधनाच्या मुद्द्यावर अडून बसला होता. पलीकडून दिग्दर्शक शॉटसाठी आवाज देते होते. अडचणीत सापडलेल्या विधू विनोद चोप्रा यांनी त्या कलाकाराच्या हातातले दुःशासनाचे कपडे स्वतःच्या अंगावर चढवले. हे बघितल्यावर तो कलाकार नरमला. त्याने माफी मागितली.

पण आत्ता उशीर झाला होता. विधू विनोद चोप्रा यांनी दुःशासन रंगवला. आणि तो असा रंगवला की त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं.

विधू विनोद चोप्रा यांच्या अभिनयाला खरंच दाद दिली पाहिजे कारण, ‘जाने भी दो यारो’ मधल्या महाभारताच्या प्रसंगात नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, सतीश शाह यांसारखे अनेक अभिनेते आहेत. आणि इतरही कलाकार आहेत. भोवताली इतके कलाकार असूनही विधू विनोद चोप्रा यांनी अत्यंत आत्मविश्वासाने दु:शासन साकारला.

यानंतर विधू विनोद चोप्रा यांनी बॉलिवुडमध्ये स्वतःची लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून वेगळी ओळख निर्माण केली हे आपल्याला माहीतच आहे. पण करियरच्या सुरुवातीला त्यांनी केलेला दुःशासन ते स्वतः आणि प्रेक्षक विसरणार नाहीत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.