जानकी देवर : १८ व्या वर्षी झाली होती झाशीची राणी रेजिमेंटची कॅप्टन.

भारतीय स्वातंत्र चळवळीत सशस्त्र क्रांतीचा सर्वात गौरवशाली इतिहास म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना. याच सेनेच्या एका तुकडीचे नाव होते झाशीची राणी रेजिमेंट. स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या जीवाची देखील पर्वा न करणाऱ्या महिलांची ही रेजिमेंट होती.

जुलै १९४३ मध्ये सुभाष चंद्र बोस आझाद हिंद सेनेसाठी वर्गणी गोळा करण्याच्या आणि सैनिकांची भरती करण्याच्या हेतूने सिंगापूर येथे गेले. ब्रिटीश साम्राज्य विरोधात लढण्यासाठी तेथील भारतीयांना एकत्र येण्याचे आव्हान करण्यासाठी त्यांनी ६० हजार लोकांना संबोधित केले.

याच लोकांमध्ये एक १६ वर्षांची मुलगी बोस यांच्या शब्दांमुळे प्रभावित झाली होती. भारतात जन्माला आलेली पण याच प्रदेशात स्थायिक असणारी एका सधन तमिळ कुटुंबातील ही मुलगी, तीच नाव होत जानकी देवर.

हीच जानकी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी  झाशीची राणी रेजिमेंटची कॅप्टन झाली होती.

आपल्या जवळील सगळे मौल्यवान दागिने आझाद हिंद सेनेसाठी दान करत जानकीने या लढ्यात उडी घेतली होती. तिच्या रेजिमेंट मध्ये दाखल होण्याच्या निर्णयाला कुटुंबातून प्रचंड विरोध झाला. पण तिने ठाम निश्चय केला होता. त्यावेळी आझाद हिंद सेनेत भरती होण्यासाठी वडिलांच्या किंवा पतीच्या अनुमती पत्राची गरज होती. त्यामुळे जानकीने संघर्ष करत अखेरीस यातून वाट काढली आणि आपल्या वडिलांना तयार करून ती झाशीची राणी रेजिमेंट मध्ये दाखल झाली.

सिंगापूर येथील वॉटरलू स्ट्रीटवर झासी ची राणी रेजिमेंटचे २२ ऑक्टोबर १९४३ मध्ये उद्घाटन झाले.

तेव्हा उपस्थित असणाऱ्या ५०० महिला सैनिकांपैकी एक जानकी होती. याच ठिकाणी या रेजिमेंटच्या कॅप्टन असणाऱ्या लक्ष्मी सेहगल यांनी जानकीला ट्रेनिंग दिले. या ट्रेनिंग मध्ये रायफल, बॉम्ब, आणि इतर शस्त्र वापरण्याबरोबरच युद्ध शास्त्राचे देखील प्रशिक्षण दिले जात होते.

ट्रेनिंग प्रचंड कठीण होते, त्यात जानकी सारख्या एका सदन कुटुंबातील मुलीसाठी तर ते फारच त्रासाचे होते. इथे येणाऱ्या प्रत्येक मुलीला याची पूर्ण जाणीव होती की इथे आल्यानंतर घराच्या वाटा परत दिसणे शक्य नव्हते. पण देश प्रेमाच वेड लागलेल्या जानकीने कशाचिही तमा बाळगली नाही.

अन्न, वस्त्र निवारा याचा कसला हि विचार न करता ती येईल त्या परिस्थितीशी झगडत राहिली. हे सगळ करण्यापाठीमागे तिचा उद्देश पक्का होता, याबद्दल बोलताना तिने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होतं, 

“स्त्री जरी नेहमी नम्र वागणारी आणि सुंदर दिसणारी असली तरी कमजोर नाही आहे. स्त्रीची अशी ओळख निर्माण करण्यापाठीमागे पुरशी मानसिकता कारणीभूत आहे. या रेजिमेंट मध्ये दाखल होऊन भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्याबरोबरच स्त्रीला देखील पुरशी बंधनातून मला मुक्त करायचे आहे.”

अशा जानकीने स्वत:ला या लढ्यासाठी समर्पित केले होते. आपला सगळा वेळ तिने देश सेवेसाठी वाहून घेतला होता. तिच्या याच समर्पणामुळे तिला लेफ्टनंट हे पद देण्यात आलं. एप्रिल १९४४ साली कॅप्टन असणाऱ्या लक्ष्मी सेहगल यांना काही कारणास्तव दवाखान्यात दाखल करावे लागल्याने १८ वर्षाच्या जानकीला बर्मा येथील तुकडीची पहिल्यांदा कमांडर करण्यात आले.

ती या रेजिमेंटची कमांडर असतानाच रेडक्रॉस हॉस्पिटल मध्ये ब्रिटीश सैन्याने बॉम्ब हल्ला आणि गोळीबार केला.

यात आझाद हिंद सैन्याचे अनेक सैनिक गंभीररित्या जखमी झाले. या सैनिकांना मदत करण्यात जानकी व्यस्त झाली. या लढाईत आझाद हिंद सेनेने अखेरीस माघार घेतली. तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सोबतच जानकीने जंगलातून वाट काढत सैनिकांना सुखरूप घरी पोहचवले. पण याच सैन्यात दाखल हून देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणाऱ्या जानकीची ही तळमळ तशीच राहिली. कारण या युद्धात हारल्याने आझाद हिंद सेना शांत झाली.

पण देशभक्ती साठी एखद्या ठराविक सैन्याचीच गरज पडते असे नाही, हेच जानकीने सिद्ध करत भारतीय कॉंग्रेस मेडिकल मिशनच्या माध्यमातून ती काम पाहू लागली. १९४८ साली तिची ओळख तमिळ नेशन या दैनिकाचे संपादक नहाप्पन यांच्याशी झाली.

एका वर्षानंतर तिने त्यांच्यासोबत विवाह केला.

सामाजिक क्षेत्रात काम करत तिने गर्ल गाईड असोसिएशन आणि महिला संघटनेच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये देखील काम केले. तिने केलेल्या या कार्याच्या सन्मानार्थ मलेशियाच्या संसदेत सिनेट मेंबर म्हणून तिची निवड करण्यात आली. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी तिला जानकी यांना सन्मानीत करण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.

हे ही वाचा भिडू.