रोगराईतून मुक्त होण्यासाठी कोकणातले हे गाव शेकडो वर्षांपासून “जनता लॉकडाऊन” पाळते

कधीकधी आपल्या प्रथा आपल्याला बोगस वाटतात. त्यांचा काय उपयोग म्हणून शहाणे झालेले आपण अनेकदा आपल्या प्रथा, परंपरांचा अपमान करतो. पण बऱ्याच प्रथा, परंपरेपाठीमागे काहीतरी ठोस कारणे असतात.

आत्ताच वातावरण बघा, कोरोनासारखा संसर्गजन्य रोग पसरू नये म्हणून लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊन पाळण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. लोकांनी गर्दी करु नये म्हणून प्रशासन सर्व गोष्टी बंद ठेवत आहेत.

या पार्श्वभूमीवर आपल्याच कोकणातील एका प्रथेचा आवर्जून उल्लेख करावा लागतो, ती म्हणजे गावपळणीची गोष्ट. 

गावपळणीची गोष्ट म्हणजे चार दिवस संपुर्ण गाव बंद राहते. फक्त बंदच नाही तर हे चार दिवस गावातील लोक गाव बंद करुन गाव सोडून जातात.

या प्रथेला गावपळणीची प्रथा म्हणतात.

गावपळणीची ही प्रथा सिंघदुर्ग जिल्ह्याच्या आचरे आणि पंचक्रोशीतल्या गावात प्रसिद्घ आहे. वायंगणी, चिंदर, मुगणे अशा गावांमध्येही दर चार वर्षींनी गावपळण होत असल्याची माहिती देण्यात येते.

आत्ता गावपळण म्हणजे नेमकं काय असतं ?

गावपळण म्हणजे गावातली लोकं दर चार वर्षांनी एकत्र जमतात. गावातल्या ग्रामदैवताचा कौल घेतला जातो. कौल मिळल्यानंतर या तारखेपासून त्या तारखेपर्यन्त असे चार दिवस ठरवले जातात. तीन रात्री आणि चार दिवस गावाच्या वेशीबाहेर जावून रहायचं असतं. कौल मिळाली आणि तारिख ठरल्याची बातमी गावासोबतच पै पाव्हण्याच्यात, मुंबईच्या चाकरमान्यांच्यात पोहचते आणि बाहेर राहणारी मंडळी बुकींगच्या कामाला लागतात. संपुर्ण गाव यात्रेला जमतो तसा गावपळणीसाठी गावात येतो.

या दरम्यान गावपळणीत राहण्यासाठी तात्पुरत्या मंडपाचा खुंटी पुरून शुभारंभ केला जातो. घर सारवले जाते. गावपळणीच्या राहूट्या दिवाळीच्या दिवसांप्रमाणे सजवल्या जातात. जेवणासाठी स्वतंत्र जागा, कोंबड्यासाठी स्वतंत्र खोली, गुरांचा गोठा तयार केला जातो.

हे सगळ झाल्यानंतर संपुर्ण गाव गावाच्या वेशीवर येवून राहतो. या चार दिवसात सर्वजण एकत्र राहतात. संपुर्ण गावाचे एक कुटूंब होते. दिवसभरात नदीवरचे मासे खायचे, दंगामस्ती करायची, शिकार करायची असे कार्यक्रम चालतात.

या चार दिवसात गावात कोण फिरकत नाही. चार दिवसात संपुर्ण गाव ओस पडलेला असतो. गावातील घुसी, उंदीर या दरम्यानच्या काळात अन्न न मिळाल्याने मरून जातात. काही किड असेल तर ती नष्ट होते.

गावपळणीच्या मागे अशी आहे आख्यायिका. 

एक आख्यायिका अशीही आहे की पूर्वी गाव नांदत नव्हता तेव्हा गाव नांदावा म्हणून तीन दिवस मी गाव ओस पाडेल असे वचन रामेश्वराने दिले होते. ते वचन पाळण्यासाठी चार वर्षातून एकदा ही प्रथा पाळण्यात येते.

सोबतच शास्त्राच्या भाषेतून सांगणारी माणसं सांगतात की या चार दिवसात घरातली रोगराई मरते, गावातली घाण नष्ट होवून जाते.

आणि चार दिवस आपल्या जो गाव एकत्र येतो तो पुढचे चार वर्ष एकत्र गुण्यागोविंदाने नांदतो.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.