हाफ एव्हरेस्ट !!!
हाफ एव्हरेस्ट ? हे कसलं स्वप्न ? त्याचं स्वप्न हे पुर्ण एव्हरेस्टचंच होतं. पण तो निम्यात पोहचला तरी हिरो झाला. नेमका कसा ?
नोबुकाझू कुरिकी. जपानी गिर्यारोहक. गिर्यारोहण करणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकाचं जसं असतं तसंच त्याचंही एक स्वप्न होतं. त्याला जगातील सर्वात उंच असणारं ‘माउंट एव्हरेस्ट’ शिखर सर करायचं होतं. त्यासाठी तो अपार मेहनत घेत होता. सात वेळा एव्हरेस्ट चढण्याचे अयशस्वी प्रयत्न करून देखील झाले होते. एवढंच काय तर, एव्हरेस्ट सर करण्यासाठी २०१२ मध्ये हाती घेतलेल्या शेवटच्या मोहिमेत त्याला आपली ९ बोटे देखील गमवावी लागली होती. असं असूनही एव्हरेस्ट चढण्याचं स्वप्न काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. यावर्षी त्याने पुन्हा एकदा एव्हरेस्ट मोहीम हाती घेतली. ही त्याची आठवी एव्हरेस्ट मोहीम होती. परंतु समुद्रसपाटीपासून ८८४८ मीटरच्या उंचीवर असणाऱ्या या शिखरावर पोहचायला साधारणतः १४०० मीटरचं अंतर बाकी असतानाच मोहिमेदरम्यानच काल त्याचा मृत्यू झाला.
कुरिकीचा मृत्यू नेमका का झाला यासंदर्भातील तपशील अद्यापपर्यंत मिळाला नसला तरी माध्यमांमधील बातम्यांनुसार तो आजारी होता आणि खराब नेटवर्कमुळे त्याचा आपल्या टीमसोबतचा संपर्क तुटला होता. ‘नोबुकाझू कुरीची शेरिंग द ड्रीम’ या नावाने त्याचं फेसबुक पेज आहे. त्यावरून तो आपल्या प्रवासातील व्हिडीओ शेअर करत असे. या पेजवर त्याने टाकलेल्या एका पोस्टवरून त्याची तब्येत ठीक नसल्याच्या बातम्यांना पुष्टी मिळते. या पोस्टमध्ये आपण ७४०० मीटरच्या उंचीवर असून आपल्याला बरं वाटत नसल्याबद्दल त्यानं लिहिलं होतं. यापूर्वी कुरिकीने २००८ साली ८१८८ मीटर उंचीचं ‘चो ओयु’ आणि २००९ साली ८१६७ मीटर उंचीचं धौलागिरी शिखर केलं होतं परंतु ७ वेळा प्रयत्न करून देखील त्याला एव्हरेस्ट चढण्यात यश आलं नव्हतं. शेवटी याच प्रयत्नात त्याला आपल्या जीवाशी हात धुवावा लागला.