जपानी माणसाने रामायणावर बनवलेला अ‍ॅनिमेशन सिनेमा भारतात रिलीज होऊ दिला नव्हता

आत्ता बघणं होत नाही पण लहानपणी शाळेतून आल्यावर हंगामा सारखे कार्टून चॅनल बघणं हा आवडता छंद. शाळेचं दप्तर बाजूला ठेवलं की, तडक उठून टीव्ही समोर बसायचं.

तेव्हा एक कार्टून फिल्म सारखी बघायला आवडायची ती म्हणजे ‘रामायण – द लेजंड ऑफ प्रिन्स राम’.

या फिल्मच्या नावामध्ये एक आकर्षण होतं. आपण एका महाकाव्याचा आस्वाद घेत आहोत, अशी भावना मनात यायची. आणि हा कार्टून सिनेमा बघायची सारखी इच्छा व्हायची. रामायण या महाकाव्यावर पुढे अनेक कार्टून सिनेमे आले. पण या सिनेमाची सर इतर कशाला नाही. भिडूंनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही.

हा सिनेमा बनवण्याची कल्पना एका भारतीयाची नव्हे तर एका जॅपनीज माणसाची होती.

१९९२ साली भारत – जपान राष्ट्रीय संबंधांना ४० पूर्ण झाली होती. त्यानिमित्ताने कार्टून नेटवर्क चॅनल वर हा सिनेमा सारखा दाखवला जात होता.

परंतु दुर्दैवाने या चांगल्या सिनेमाच्या वाट्याला सिनेमागृह आलं नाही. त्यामुळे जगभरात नावाजला गेलेला हा सिनेमा भारतातल्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही.

सिनेमा इतका चांगला असूनही असं का झालं असावं ?

हा सिनेमा भारतात प्रदर्शित का होऊ शकला नाही हे जाणून घेऊ, त्याआधी हा सिनेमा कसा घडला याची गोष्ट…

भारतीय स्थापत्यशास्त्रज्ञ डॉ. बी.बी. लाल यांना अलाहाबाद येथे उत्खनन करताना काही पुरातन अवशेष सापडले. यावर आधारित ‘द रामायण रेलीकस’ ही डॉक्युमेंट्री युगो साको हा जॅपनीज माणूस बनवत होता.

ही डॉक्युमेंट्री बनवताना युगो साकोला रामायणाची जी अध्यात्मिक गोष्ट आहे त्याची भुरळ पडली. जॅपनीज भाषेत रामायणावर आधारित १० वेगवेगळ्या स्वरूपाचे ग्रंथ त्याने वाचले.

हे वाचताना त्याच्या लक्षात आलं, आपण जी डॉक्युमेंट्री बनवत आहोत ती या अध्यात्मिक महाकाव्याला पुरेसा न्याय देऊ शकत नाही.

आणि इथेच युगो साकोच्या मनात रामायणावर अ‍ॅनीमेशन सिनेमा बनवण्याची कल्पना आली. यासाठी त्याने भारतातील प्रख्यात अ‍ॅनीमेशन तज्ञ राम मोहन यांच्याशी बोलणी सुरू केली.

सिनेमाच्या निर्मितीची सर्व तयारी झाली. ‘रामायण – द लेजेंड ऑफ प्रिन्स राम’ हे नाव सिनेमाला देण्यात आलं.

जवळपास ४५० जॅपनीज तंत्रज्ञ सिनेमाच्या निर्मितीवर , त्यात असलेल्या अ‍ॅनिमेटेड दृष्यांवर काम करत होते. भारतीय पुराणकथांचा अभ्यास करून त्या दृष्टीने सिनेमात असणाऱ्या राम, रावण, हनुमान अशा सर्व व्यक्तिरेखांचे डिझाईन करण्यात आले. १३ दशलक्ष डॉलर इतका खर्च या सिनेमावर झाला होता.

भारतीय अ‍ॅनीमेशन तज्ञ राम मोहन या सर्व जॅपनीज लोकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होते.

भारतीय लोकांच्या मनात रामायणा विषयी असलेली संवेदनशील भावना ते जाणून होते. त्यामुळे या महाकाव्याचा अ‍ॅनीमेटेड सिनेमा होताना, पात्रांचं चित्रण कुठेही हास्यास्पद वाटू नये, या महाकव्याचा आदर जपला जावा, अशी भावना राम मोहन यांच्या मनात होती.

खूपदा जॅपनीज माणसांना काही गोष्टी कळायच्या नाहीत.

उदाहणार्थ, धोतर हा प्रकार त्यांना माहीत नव्हता. त्यामुळे राम मोहन यांनी त्यांचा एक माणूस पाठवून धोतर कसं नेसतात याची प्रात्यक्षिक जॅपनीज माणसांना करून दाखवली. त्यामुळे त्यांना धोतर डिजाइन करता आलं.

ज्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता , त्या वर्षी भारतात रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद या आंदोलनाने हिंसक स्वरूप धारण केलं होतं.

त्यामुळे १९९२ साली भारतात सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता होती. पण विश्व हिंदू परिषदेला या सिनेमाविषयी समजले. हिंदू देवतांचं कार्टून स्वरूप आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका घेऊन विश्व हिंदू परिषदेने या सिनेमाला कडाडून विरोध दर्शवला. लोकांच्या मनात असलेल्या संवेदनशील भावनेला असं अ‍ॅनिमेटेड स्वरूप देणं योग्य नाही, अशी भूमिका भारत सरकारने घेतली.

दिग्दर्शक युगो साको आणि भारतीय अ‍ॅनिमेटेड तज्ञ राम मोहन यांनी स्वतःची बाजू मांडण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते प्रयत्न फोल ठरले.

अखेर भारत सोडून इतर देशातील सिनेमागृहांमध्ये ‘द वॉरियर प्रिन्स’ या नावाने हा सिनेमा प्रदर्शित झाला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर या सिनेमाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या सिनेमाच्या जॅपनीज, इंग्लिश आणि हिंदी अशा भाषांमध्ये आवृत्ती काढण्यात आल्या. हिंदी भाषेत अरुण गोविल यांनी रामाला, अमरिश पुरी यांनी रावणासाठी आवाज दिला. तर शत्रुघ्न सिन्हा हे कथाकार होते.

आजही तुम्ही हा सिनेमा हिंदी मध्ये बघाल, तेव्हा रावणाच्या व्यक्तिरेखेत अमरीश पुरींचा आवाज अनुभवणं ही एक आगळीवेगळी पर्वणी असते.

मुळात एक जॅपनीज माणूस रामायण वाचून त्यावर आधारित असा एक सिनेमा बनवतो हीच आपल्यासाठी थक्क करणारी गोष्ट आहे. भारतात या सिनेमाला थिएटर जरी मिळालं नाही तरी जागतिक स्तरावर अनेक प्रेक्षकांना आणि विशेषत: लहान मुलांना रामायणासारख्या महाकाव्याचा अनुभव घेता आला, ही निश्चितच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.