जपानच्या बौद्ध धर्मात देखील गणपती आहे… त्याचं नाव कांगितेन..

गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरता आणि भारतापुरता कधीच मर्यादित नव्हता. जगभर मोठ्या उत्साहात गणपतीचं आगमन होतं आणि तेवढ्याच उत्साहात हा उत्सव साजराही केला जातो…हा तर आपण बोलतोय जपानी कांगितेन गणपतीबद्दल… 

ऐकायला थोडं नवीन वाटत असलं तरीही हे खरंय की, जसं एकदंत, चिंतामणी हे गणपतीचे अवतार मानले जातात त्याचप्रमाणे कांगितेन हा गणपतीचा जपानी अवतार आहे.

पण हा कांगितेन गणपती भारतातल्या गणपतीपेक्षा जरा वेगळा आणि त्याचं बौद्ध धर्माशी विशेष असं नातं आहे.

तसं तर कांगितेन या नावाचा गणपती, गणेश या नावाशी कुठेही मेळ खात नसला तरीही कांगितेन ची मूर्ती आपल्याकडच्या गणेशमूर्तीशी साधर्म्य सांगणारी आहे. गणपती आणि कांगितेनला दाखवला जाणारा नैवेद्य जवळपास एकसारखाच आहे. आपल्याकडे मोदक केला जातो तर जपानला मोदकांसारखाच तळलेला कांगिदान नैवेद्य दाखवला जातो… 

आणखी एक म्हणजे भारतात गणपतीला विघ्नहर्ता म्हणलं जातं तर जपानमध्ये कांगितेनच्या एका जुन्या रुपाला बिनायकातेन ला विघ्नकर्ता म्हणलं जातं. विघ्नकर्ता म्हणून त्याला खूश करण्यासाठी उपासना केली जाते, तो प्रसन्न झाला कि भक्तांची भरभराट होते चिनी-जपानी बौद्धांची धारणा आहे.  

इकडे भारतात हिंदू परंपरेत गणपती शिव-पार्वतीचा पुत्र आहे तर तिकडे जपानमध्ये बौद्ध ग्रंथांमध्ये केलेल्या उल्लेखांप्रमाणे कांगितेन हा शिवाशी साधर्म्य सांगणाऱ्या बौद्ध देवतांमधल्या उमाहीचा पुत्र आहे. या कांगितेनचा अर्थ जपानी भाषेत ‘शाश्वत सुखाची देवता’ असा होतो..

आता प्रश्न असा पडतो कि, जपानमध्ये आपल्या गणपती कसा पोहोचला? 

तर अर्थातच या भागांमध्ये गणपती जाण्याचं कारण म्हणजे भारताचा दुसऱ्या देशांशी असलेला व्यापार.  या व्यापारांदरम्यान भारतातल्या अनेक प्रथा, परंपरा, प्रतीकं, चिन्हं बौद्ध धर्मासोबत भारतातून चीनमार्गे जपानमध्ये पोहोचल्या.

श्रद्धेच्या भावनेने लोकं गणपतीची मूर्ती आपल्यासोबत बाळगायचे आणि यामुळे इतर लोकांमध्येसुद्धा गणपती बाप्पाबद्दल कुतूहल आणि श्रद्धा तयार झाली. जपानमधला ‘कांगितेन गणपती’ त्यातलाच एक आहे.

पुराणकथांच्या अभ्यासकांच्या सांगण्यानुसार, भारतातून जपानमध्ये गणेशपूजेची प्रथा पोहचण्याचा काळ साधारण ८ व्या शतकाचा असावा. 

मिळालेल्या माहितीनुसार, ‘शिंगोन’ किंवा ‘मंत्र’ बौद्ध धर्माचा भाग म्हणून कांगितेनची उपासना पहिल्यांदा ८-९व्या शतकाच्या आसपास जपानमध्ये सुरू झाली. हा बौद्ध धर्माचा एक तांत्रिक प्रकार होता जो भारतातील ओडिशामधून उदयास आला होता. जो नंतर पहिल्यांदा चीन आणि नंतर जपानला गेला. याचदरम्यान कुकाई नावाच्या जपानी भिक्षूने जपानमध्ये शिंगोन बौद्ध धर्माची स्थापना केली.

आणि तांत्रिक बौद्ध धर्म शिकण्यासाठी त्याने पुढे चीनला प्रवास केला.  कांगितेन गणपती सुरुवातीला शिंगोन बौद्ध धर्मात लहान देवता म्हणून ओळखला जायचा. पण जपानी इतिहासातील ‘अभिजात सुवर्णयुग’ मानल्या जाणार्‍या ‘हियन पीरियडमध्ये  या कांगितेन एक स्वतंत्र देव म्हणून उदयास आला. जपानच्या धार्मिक ग्रंथांमध्ये कांगितेनचे अनेक संदर्भ आहेत. कांगितेनच्या अनेक दंतकथा देखील तिथे सांगितल्या जातात. 

संपूर्ण जपानमध्ये, जपानी बौद्ध धर्माचे हजारो वर्षांपूर्वीची अनेक सुंदर लाकडी मंदिरं आहेत. यातले जवळपास २५० हुन अधिक मंदिरं हे कांगितेन गणपतींचे आहेत. जपानमध्ये या मंदिरांना शॉदेन-सामा, गणबाची, बिनायकातेन, कांगितेन, गनपतेल अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. जपानी मंदिरांमध्ये कांगितेनच्या मूर्ती सहसा लाकडी पेटीत ठेवल्या जातात. भक्त या पेट्यांनाच प्रार्थना करतात. बाकी फक्त औपचारिक प्रसंगीच मूर्ती बाहेर काढली जातात.

जपानी बौद्ध धर्मातील शिंगॉन आणि तेंदाई या संप्रदायांमध्ये तर या कांगितेन गणपतीची बुद्धिस्ट देवता म्हणून गणाबाची, बिनायका-तेन आणि कांतीगेनची उपासना केली जाते. यात कांतीगेन आणि शोतेन, शिंगॉनन गणपतीचं रूप जास्त लोकप्रिय आहे. 

यातील शिंगॉनन गणपतीची जी मूर्ती आहे ती संपत्ती आणि प्रजोत्पादनाचंही प्रतीक आहे. या मूर्तीत स्त्री आणि पुरुष या दोन रूपांतील गणपती एकमेकांना आलिंगन देताना दिसतात.

म्हणून हि मूर्ती किंव्हा तिचे फोटो तुम्हाला जपानमध्ये उघडपणे कुठेही पाहायला मिळत नाहीत आणि स्वतंत्र गजमुख असलेली कांगितेन गणपतीची मूर्ती जपानी परंपरेत सगळीकडे पाहायला मिळते. ही कांगितेन २..४…६…८..१०..१२ अशा बाहूंची मूर्ती दिसून येते.  आज, जपानमधील अंदाजे २५० मंदिरांमध्ये कांगितेन गणेशाची पूजा सुरू आहे.

हजारो किलोमीटर असलेला जपान आणि भारत हे दोन देश जे भिन्न धर्माचं पालन करतात, वेगवेगळ्या संस्कृती जगतात तरीही या कांगितेन गणपतीच्या निमित्ताने एकत्र येतात…

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.