पोलीस भिंद्रनवालेवर मुंबईत पाळत ठेवून होते अन् तो अमृतसरला फरार पण झालेला.

सध्या पंजाब पोलिस पूर्ण ताकद लाऊन अमृतपाल सिंगचा तपास करतायत, वारीस पंजाब दे या खलिस्तानवादी संघटनेचा हा म्होरक्या पोलिसांच्या हातावर तुरी देत पळतोय. पण वारिस पंजाब देचा प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग पंजाबमध्येच लपून बसला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात असलेल्या श्री अकाल तख्त साहिब किंवा भटिंडा येथील तलवंडी साहिब येथील तख्त श्री दमदमा साहिब येथे येऊन तो आत्मसमर्पण करू शकतो. मात्र या सगळ्या बातम्यांमध्ये खलिस्तानवादी संघटना, त्यांचे नेते हा उल्लेख आला की एक नाव आपल्या डोळ्यांसमोर येतं, 

ते म्हणजे जर्नेलसिंह भिंद्रनवाले.

इंदिरा गांधींनी ब्लुस्टार सारखे महत्वकांक्षी ऑपरेशन राबवलं नसतं तर भिंद्रनवाले आणि त्यांच्या फुटीरतावादी दहशतवाद्यांनी भारताचे तुकडे केले असते.

हा जर्नेलसिंह भिंद्रनवाले एकदा मुंबईत आला होता. त्याच्या फुटीरतावादी कारवायांमुळे गुप्तचर संस्था त्यांच्यावर लक्ष ठेवून होती तरिही तो सहिसलामत मुंबईतून पसार झाला.

त्याने पोलिसांना कस फसवलं त्याचा हा किस्सा.

भिंद्रनवालेच्या कारवाया उघडपणे सुरू होत्या. मात्र त्याच्यावर कारवाई केली तर शिख समाजातून मोठ्या प्रमाणात उठाव होईल व त्याचा फायदा भिंद्रनवालेलाच होईल अशी शक्यता होती. त्यामुळे केंद्र सरकार त्याच्यावर कारवाई करण्यासाठी धजावत नव्हते. भिंद्रनवाले तेव्हा आपल्या पन्नास ते साठ सशस्त्र अनुयायांसह मुंबईला येण्यासाठी निघाला होता. पोलीसांनी त्याच्यावर वाटेतच कारवाई करणं अपेक्षित होतं, पण ही कारवाई करण्यापेक्षा तो काय करतो याचा ठावठिकाणा घेण्यावर गुप्तचर यंत्रणांनी लक्ष केंद्रित केलं. त्याच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने तो सुखरुप मुंबईत पोहचला.

आत्ता मुंबईच्या वास्तव्यात तो कोणाला भेटतो, काय करतो याची माहिती घेण्याची जबाबदारी मुंबई पोलीसांकडे आली होती. दादरच्या गुरूद्वारामध्ये भिंद्रनवालेने आपला मुक्काम हलवला होता. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी पोलीसांनी गुरूद्वारासमोरची खोली भाड्याने घेतली होती. दुर्बीण लावून तो जिथे राहतो त्याची इत्यंभूत माहिती पोलीसांना मिळत होती. तो किती वाजता उठतो इथपासून ते त्याला भेटण्यासाठी कोणते लोक येत आहे इथपर्यन्तची सर्व माहिती मुंबई पोलीसांची टिम टिपून घेत असे. अगदी रात्रीच्या वेळी देखील यात खंड पडत नव्हता.

दिवसातून पाच ते सहा वेळा भिंद्रनवाले खोलीच्या बाहेर आला की त्याचीही नोंद केली जात. दर दोन ते तीन तासांनी आपला अहवाल मुंबई पोलीसांची टिम दिल्लीत असणाऱ्या केंद्रातील गुप्तचर खात्याला पाठवत असे.

सर्व सोपस्कार व्यवस्थित चालू असताना अचानक बातमी आली की भिंद्रानवाले सुखरुप पुन्हा अमृतसरला पोहचला देखील.

दिल्लीच्या गुप्तचर संस्थेने दिलेल्या या बातमीवर मुंबई पोलीस मात्र विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. त्यांना प्रत्येक तासाला भिंद्रनवाले समोर दिसत असताना तो जावूच शकत नाही यावर पोलीस ठाम होते. अखेर बातमीमधलं तथ्य शोधण्यात आलं.

झालेलं अस की,

भिंद्रनवालेला पोलीस आपल्यावर पाळत ठेवून आहेत याची माहिती मिळाली होती. ही माहिती खुद्द मुंबई पोलीस खात्यातील एका शिख अधिकाऱ्यांनी ही माहिती भिंद्रानवाले याला दिली होती. त्यानंतर भिंद्रानवालेने आपल्यासारखाच एक डमी व्यक्ती तयार करुन त्याला सुरक्षीत दादरच्या गुरूद्वारामध्ये ठेवले होते.

पोलीसांना संशय येवू नये म्हणून रोज वेगवेगळ्या व्यक्तिंच्या बैठका देखील घेण्यात येत होत्या. या काळात भिंद्रनवाला मात्र मुंबईत आपलं काम फत्ते करुन अमृतसरला निघून देखील गेला होता. अमृतसर येथे जावून पुढील कारवाई करण्यात भिंद्रनवाले गुंतल्यानंतर गुप्तचर खात्याला तो अमृतसरमध्ये आल्याचे समजले. त्यानंतर मुंबई पोलीसांना खुलासा मागवण्यात आला तेव्हा मुंबई पोलीसांनी,

आम्ही भिंद्रनवालेला प्रत्यक्षात पाहिले नाही त्याच्या फोटोवरुन टेहाळणीच काम सुरू होतं त्यामुळे घोटाळा झाला असावा असा खुलासा केला.

बातमी मागची बातमी या जयप्रकाश प्रधान यांच्या पुस्तकात ही घटना आपल्याला मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त जे.एफ. रिबेरो यांनी सांगितल्याच जयप्रकाश प्रधान यांनी सांगितलं आहे. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.