‘ओपन बुक चॅलेंज’ आहे तरी काय..?

‘फेसबुक-केम्ब्रिज अॅनालिटीका’ वादाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक युजर्सच्या माहितीची सुरक्षितता हा मुद्दा प्रथमच जगभरात चर्चिला जातोय. आपल्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेच्या चिंतेने अनेकजणांना ग्रासलंय. जगभरात फेसबुक विरोधात #DeleteFacebook मोहीम राबविण्यात येतेय. यात आता आणखी एका गोष्टीची भर पडलीये. तंत्र गुंतवणूकदार जेसन कॅलाकॅनिस यांनी  OpenBookChallenge ची सुरुवात केलीये. जाणून घेऊयात आहे काय नेमकं हे प्रकरण..?

ओपन बुक चॅलेंज

तंत्र गुंतवणूकदार जेसन कॅलाकॅनिस यांनी फेसबुकला पर्यायी अशा सशक्त सोशल मिडिया प्लॅटफॉर्मच्या उभारणीसाठी या स्पर्धेचं आयोजन केलंय. ही जरी एक बिझनेस आयडिया दिसत असली तरी कॅलाकॅनिस तसं मानायला तयार नाहीत. त्यामुळे ते या कल्पनेला ‘ओपन बुक चॅलेंज’ असं म्हणताहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून  फेसबुकला पर्यायी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म उभारणीसाठी ७ वेगवेगळ्या टीमची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रत्येक टीमवर नवीन प्लॅटफॉर्मच्या निर्मितीसाठी ते १००००० डॉलर रुपये गुंतवणार आहेत.

open book challenge 2
Facebook/JasonCalanis

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला ३ स्टेप फॉलो करायला लागतील. सर्वप्रथम तुमच्या टीम तसेच नवीन पर्यायी फेसबुक निर्मितीच्या कल्पनांसह तुम्हाला स्पर्धेसाठी अप्लाय करावं लागेल.  www.openbookchallenge.com  या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्पर्धेसाठी अप्लाय करू शकता. अप्लाय केलेल्या टीमपैकी सर्वोत्कृष्ट कल्पना असणाऱ्या २० टीमची निवड करण्यात येईल आणि पुढील २ महिने या टीमसोबत संपर्कात राहून त्यांच्यापैकी  ७ सर्वोत्कृष्ट टीमची त्यांच्या कामगिरीनुसार निवड करण्यात येईल. ६० दिवसानंतर ७ सर्वोत्कृष्ट टीमची घोषणा करण्यात येईल आणि पर्यायी फेसबुकच्या निर्मितीसाठी प्रत्येक टीमला १००००० डॉलर दिले जातील. तुमची कल्पना तुम्ही यापूर्वी दुसऱ्या कुठल्या प्रकल्पात वापरली असेल तरीही हरकत नाही, फक्त ती प्रत्येक्षात येणं खरंच शक्य आहे का, याचा विचार टीमची निवड करताना प्राधान्याने करण्यात येईल. जुलैमध्ये सुरु होणारा हा प्रकल्प १२ आठवड्यांचा असणार आहे.

ओपन बुक चॅलेंज हा कुठलाही बिझनेस प्लॅन नसून ‘वापरकर्त्या ग्राहकाच्या माहितीच्या सुरक्षिततेची हमी’ देऊ शकणाऱ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मची निर्मिती करणं आणि ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षिततेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणं, हे आमचं उद्दिष्ट्य असणार आहे, असं या चॅलेंजच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलंय. या सगळ्यात गमतीची बाब अशी की फेसबुकला पर्याय म्हणून सुरु करण्यात येत असलेल्या या नवीन सोशल मिडीयाच्या निर्मिती संबंधीची चर्चा फेसबुक ग्रुपवरच केली जाणार आहे. ऑफर विषयीची माहिती देण्यासाठी देखील जेसन कॅलाकॅनिस यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटचाच वापर केलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.