पंजाबी माणूस तामिळनाडूमध्ये देखील प्रसिद्ध होऊ शकतो हे जसपाल भट्टी ने दाखवून दिलं

भिडूंनो, विचार करा..

आपल्याला जो कार्यक्रम लोकांना दाखवायचा आहे त्याच नाव कोणी ‘फ्लॉप शो’ असं ठेवेल का? पण या अवलिया कलाकाराने हे विचित्र नाव आपल्या कार्यक्रमाला दिलं.

इतकंच नव्हे, तर ‘फ्लॉप शो’ प्रेक्षकांमध्ये मात्र सुपरहिट करून दाखवला.

या अवलिया कलाकाराचं नाव म्हणजे जसपाल भट्टी.

आधुनिक काळात स्टँड अप कॉमेडी हा प्रकार लोकप्रिय झाला आहे. अशाप्रकारच्या विनोदामध्ये अनेकदा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर विनोदी अंगाने टीकाटिप्पणी करण्यात येते. परंतु हे सर्व जसपाल भट्टी यांनी १९८६ साली सुरू केलं आहे.

या काळात जसपाल भट्टी यांनी ‘उलटा पुलटा’ आणि ‘फ्लॉप शो’ या दोन कार्यक्रमांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर विनोदी अंगाने भाष्य केले.

लोकांना सतावणाऱ्या समस्या जसपाल भट्टी यांनी आपल्या कार्यक्रमांमधून मांडल्या.

यामुळेच त्यांचे कार्यक्रम सामान्य माणसांमध्ये लोकप्रिय झाले.

प्रत्यक्ष आयुष्यात जसपाल भट्टी यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी पंजाब वीज कंपनीत नोकरी केली. परंतु नोकरी करता करता त्यांचं लक्ष कॉमेडी करण्याकडे वळलं.

विनोदी लिहिणारा कोणताही लेखक किंवा कलाकार हा उत्तम निरीक्षण करणारा असतो. जसपाल भट्टी यांच्या स्वभावात सुद्धा हा गुण होता. नोकरी करता करता द ट्रिब्युन या वर्तमानपत्रासाठी ते स्केच बनवायचे.

सलग ५ वर्ष त्यांनी काढलेली व्यंगचित्र वर्तमानपत्रात छापून येत होती. हे स्केच रेखाटताना आजबाजुला घडणाऱ्या घटनांवर निरीक्षण करण्याची त्यांना सवय लागली.

रोजच्या समस्यांवर तिरकस पद्धतीने ते विचार करू लागले.

याचमुळे त्यांच्या डोक्यात एक कार्यक्रम सादर करण्याचा विचार घोळू लागला. फक्त विचार करून ते थांबले नाहीत तर त्यांनी त्या कार्यक्रमाची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली. हा कार्यक्रम म्हणजे ‘फ्लॉप शो’.

हा कार्यक्रम आणण्यासाठी १८ वर्ष करत असलेल्या वीज कंपनीमधील नोकरीचा राजीनामा दिला आणि ते दूरदर्शन कडे वळले.

कोणताही कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं प्रमोशन सुद्धा करावं लागतं. जेव्हा जसपाल भट्टी यांनी फ्लॉप शो दूरदर्शन वर आणला तेव्हा लोकांपर्यंत हा शो पोहोचण्यासाठी त्यांनी एक अजब कृती केली.

फ्लॉप शो चा पहिला एपिसोड लोकांना आवडला हे त्यांच्या कानावर आलं होतं. परंतु हा कार्यक्रम अधिकाधिक लोकांनी बघावा म्हणून जसपाल भट्टी संपूर्ण शहरात गाडीने फिरायचे. जो कोणी माणूस रस्त्यावर दिसेल त्याला सांगायचे.

“अरे जा फ्लॉप शो बघ.”

सध्या जे हर्षद मेहता प्रकरण चर्चेत आहे, त्या प्रकरणावर जसपाल भट्टी यांनी केलेला एपिसोड लोकांच्या अजूनही लक्षात असावा.

हा शो लोकप्रियतेच्या शिखरावर होता परंतु १० भागानंतर जसपाल भट्टी यांनी हा कार्यक्रम बंद केला. खूप जणांनी त्यांना यामागचं कारण विचारलं. परंतु जसपाल भट्टी यांची ठाम भूमिका होती. तेव्हा ते म्हणाले होते,

“मी १० एपिसोडच लिखाण केलं होतं. आणि याच लिखाणात मला स्वतःचं १०० % योगदान द्यायचं होतं.”

प्रचंड मागणी असताना सुद्धा जसपाल भट्टी यांनी हा शो बंद करण्याचा घेतलेला निर्णय, त्यांच्या स्पष्ट विचारांची ओळख आपल्याला करून देतो. टीव्ही वर लोकप्रिय झालेल्या जसपाल भट्टी यांनी ‘फना’, ‘कुछ मिठा हो जाए’, ‘कुछ ना कहो’, ‘इकबाल’ यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा अभिनय केला.

त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘माहोल ठीक है’ या सिनेमाचं सुद्धा सर्वत्र कौतुक झालं.

२५ ऑक्टोबर २०१२ साली गाडीच्या अपघातात जसपाल भट्टी यांचं दुर्दैवी निधन झालं. या अपघातानंतर चंदिगढ ट्रॅफिक पोलिसांनी जसपाल भट्टी यांना ब्रँड एम्बेसेडर केले.

याला कारण असं, जेव्हा त्यांचा अपघात झाला तेव्हा ते गाडीत मागच्या सीटवर बसले होते. मागच्या सीटवर बसलेल्या माणसांनी बेल्ट बांधण्याचा कोणताही नियम नाही. परंतु जसपाल भट्टी यांनी बेल्ट बांधला असता तर ते आपल्यात असते, ही भावना बाळगून चंदिगढ पोलिसांनी जसपाल भट्टी यांचं छायाचित्र वापरून लोकांना बेल्ट बांधण्यासाठी जागरूक केले.

एकूणच जाता जाता सुद्धा जसपाल भट्टी लोकांना अनोखी शिकवण देऊन गेले.

सध्याच्या काळात स्टँड अप कॉमेडी करणारे अनेक विनोदवीर सुद्धा राजकीय दबावाला बळी पडतात. किंवा राजकीय व्यक्तींवर विनोद करणं टाळतात. परंतु त्या काळात जसपाल भट्टी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांना जे मांडायचं होतं, ते त्यांनी लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम केलं.

विनोदवीर किंवा कलाकार हा समाजाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस असतो, हेच जसपाल भट्टी यांनी सर्वांना दाखवून दिलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.