जसप्रीत बुमराहच्या डेडली ‘यॉर्कर’ चं रहस्य काय?
आम्हा भारतीयांना यॉर्करचं खूप आकर्षण आहे. गल्लीबोळातल्या प्रत्येक भावी बॉलरला यॉर्कर टाकायची इच्छा असते. खणखणीत स्पीडमध्ये पळत यायचं आणि स्टंपच्या गच्च्यात बॉल टाकायचा, बॅट्समन हुकला की संपला. तिन्ही दांड्या गुल!! अनेक भारतीय बॉलर्सनी या स्कीलवर महारथ मिळवण्याचा प्रयत्न केला. झहीर खान आला तेव्हा वाटलं देखील होत की यॉर्करचा सुलतान आला पण कालांतराने तोही यॉर्कर पेक्षा स्विंग, रिव्हर्स स्विंगवर भर देऊ लागला.
खऱ्या अर्थाने भारताला यॉर्करचा सुलतान मिळाला त्याच नाव जसप्रीत बुमराह.
६ डिसेंबर १९९३ रोजी गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एका शीख कुटुंबात जसप्रीतचा झाला. तो अवघा सात वर्षांचा असताना त्याचा वडिलांचा अकाळी मृत्यू झाला. आई दलजीत एका शाळेत प्राध्यापक होती. वडिलांच्या मृत्यू नंतर एकट्या आईने जसप्रीतचा सांभाळ केला. क्रिकेट मध्ये करिअर करण्याचं कसलच स्वप्न नसलेला जसप्रीत आज जगातील नंबर एकाचा बॉलर आहे. त्याच्या भेदक योर्कर पुढे भलेभले बॅट्समन ढेपाळतात.
आज तो ज्या यॉर्करमूळ यशाच्या शिखरावर पोहचला आहे त्याचं श्रेय त्याच्या आईला जात.
जसप्रीत लहानपणी आवड म्हणून क्रिकेट खेळायचा. लहानपणापासूनच त्याला बॉलिंग करण्याची आवड होती आणि तो शास्त्रशुद्ध बॉलिंग देखील करायचा. पाकिस्तानचा महान वेगावन बॉलर व स्विंग मास्टर वसीम अक्रम आणि ऑस्ट्रेलियाचा मिशेल जॉनसन त्याचे आदर्श होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत आई त्याला बाहेर खेळायला जाऊ द्यायची. मग आपल्यासारखा तो पण घरातच भिंतीवर मारा करत टेनिस बॉलने एकटा खेळत बसायचा.
घरात खेळत असताना बॉलच्या आवाजाने आईची झोप मोड होऊ नये ह्या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्यायचा. कारण आईची झोप मोड झाल्यास काय काय बोलणे खावे लागतात ते आपण सगळेच जाणतो. त्यातला त्यात कारण क्रिकेट असेल तर आपल्याकडच्या आया अधिकच चिडतात. त्यावर जसप्रीतने शक्कल लढवली. जिथे फरशी आणि भिंत एकमेकींना जुळतात बरोबर तिथेच तो बॉल फेकायचा. त्यामुळे बॉल टप्पा खायचा नाही आणि आवाजही व्हायचा नाही.
बस इथूनच तो योर्कर टाकण्यात माहीर झाला.
पण जसप्रीतची आई देखील इतर मुलांच्या आईप्रमाणेच क्रिकेट मधील करिअर बद्दल आश्वस्त नव्हती. त्यांची इच्छा होती की, जसप्रीतने उच्च शिक्षणासाठी कॅनडाला जावे आणि तिकडेच चांगली नोकरी बघून स्थायिक व्हावे.
पण नंतर १४ वर्षांचा झाल्यावर जसप्रीतने आपल्या आईला मनवले क्रिकेट करिअर म्हणून निवडले. पुढे त्याने गुजरातच्या U-19 टीममध्ये स्थान मिळवले. तेव्हा त्याच्या बॉलिंग एॅक्शन आणि भेदक माऱ्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नंतर जसप्रीत २० वर्षांचा असतना आयपीएल टीम मुंबई इंडिअन्सचे तत्कालीन कोच जॉन राईट यांनी पहिल्यांदा मैदानावर बॉलिंग करताना पाहिलं आणि त्याची मुंबई इंडिअन्स टीम मध्ये निवड केली.
आयपीएल मध्ये पर्दापण करत त्याने पहिल्याच मॅच मध्ये ३ विकेट्स घेतल्या. त्याच्या बॉलिंगने टीमचा मेंटोर सचिन तेंडूलकर आणि कप्तान रोहित शर्मा प्रभावित झाले होते. त्याची तुलना लसिथ मलिंगाशी केली जाऊ लागली. त्याच्यासारखाच यॉर्कर स्पेशालीस्ट म्हणून बुमराहने स्वतःची ओळख निर्माण केली.
तेव्हा जसप्रीतच्या आईला पण आपल्या मुलाच्या निवडीवर गर्व वाटायला लागला. जसप्रीतने २०१३-१४ च्या रणजी सत्रात गुजरात कडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या तर २०१६ च्या हजारे ट्रॉफी मध्ये ९ मॅच मध्ये २२ विकेट्स घेत सर्वोकृष्ट गोलंदाज ठरला होता.
या शानदार परफॉर्मन्सच्या जोरावर त्याने भारतीय क्रिकेट टीममध्ये स्थान पटकावलं. २०१६ मधील भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतना शेवटच्या वनडेत दुखापतीमुळे टीम मधुन बाहेर गेलेल्या मोहम्मद शमीच्या जागी जसप्रीतला संधी देण्यात आली होती. त्याने या संधीचे सोने करत पहिल्याच आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये २ विकेट्स घेत आपली निवड योग्य ठरवली.
२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध त्याने टेस्टमध्ये पर्दापण केलं. २०१८ मध्ये ९ मॅचमध्ये ४८ विकेट्स घेत पर्दापण वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय बॉलरचा मान पटकावला. वनडे मध्ये सध्या तो एक नंबरला आहे. वर्ल्डकप मध्ये सुद्धा भारतातर्फे सगळ्यात जास्त हवा बुमराहचीच होती.
त्याहूनही सगळ्यात जास्त चर्चा त्याच्या अनोख्या अॅक्शनची आणि त्याच्या डेडली यॉर्करची.
काल झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडीजसुद्धा त्याच्या मारयापुढे टिकलेली नाही. कपिल देव, झहीर खान नंतर जगाला धडकी भरवणारा भारतीय बॉलर म्हणून बुमराहची चर्चा सुरु आहे. इतकच नाही तर काही जण त्याची तुलना जगातला सर्वोत्कृष्ट बॉलर म्हणून करत आहेत. बघू येता काळच ठरवेल हा यॉर्कर किंग खरोखर ऑल टाईम बेस्टच्या यादीत जातो की नाही ते.
हे ही वाच भिडू.
- पांढऱ्या कपड्यातली शेवटची वनडे मॅच आणि आगरकरचा कधीच न मोडला गेलेला विक्रम!
- त्याचा स्विंग भारतीयांचा होता पण स्वॅग अस्सल नगरी होता !
- तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान बॉलर होता .
- बालाजीने मारलेला तो सिक्स आजही पाकिस्तान्यांची झोप उडवत असेल !