भारतीय क्रिकेटमधील ‘राज कपूर’, ज्याने संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी विजय मिळवून दिला …
तो खेळाडू ज्याने भारताला ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध पहिला टेस्ट विजय मिळवून दिला …तो खेळाडू ज्याने रिची बेनोच्या नेत्वृत्वाखालील दिग्गजांनी भरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला आपल्या फिरकीच्या तालावर अक्षरशः नाचवले…तो खेळाडू जो पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला पहिला क्रिकेटर ठरला…तो खेळाडू ज्याचा चेहरा राज कपूरशी मिळायचा, म्हणून ज्याला भारतीय क्रिकेटमधील राज कपूर देखील म्हंटलं जायचं…
गोष्ट पटेलांची आहे…प्रेमाने जसू पटेल म्हणून ओळखले जाणारे जसुभाई पटेल..खरं तर जसुभाई पटेल हे काही भारतीय क्रिकेटमधलं फारसं परिचित नसलेलं नाव. पण जेव्हा कधी भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी विजयाची आठवण निघते…ऐतिहासिक कानपूर कसोटीची आठवण निघते, त्या प्रत्येक वेळी जसू पटेलांचा उल्लेख गौरवाने केला जातोच. १९५९-६० चा ऑस्ट्रेलियन संघाचा भारतीय दौरा. गेल्या चार वर्षात भारताने एकही कसोटी जिंकलेली नाही आणि इंग्लडकडून ५ सामन्यांच्या मालिकेत ५-० असा मार खाऊन झालेला. मालिकेतील पहिल्या कासोटीत भारताने ऑस्ट्रेलियाकडूनही मानहानीकारक पराभव स्विकारलेला. अशा वेळी निवड समितीचे अध्यक्ष लाला अमरनाथ एक आश्चर्यकारक निर्णय घेतात. चार वर्षापूर्वी कसोटी पदार्पण केलेल्या आणि फक्त ४ कसोटी सामने खेळून १० विकेट नावावर असणाऱ्या ३५ वर्षीय ऑफ स्पिनर जसु पटेल यांना संघातून बोलावणं येतं.
दुसरी कसोटी. कानपूरचं ग्रीन पार्कचं मैदान. स्पिनरला मदतगार ठरू शकणारं पीच. पहिली बॅटिंग करताना भारतीय संघाची अॅलन डेव्हिडसन (५) आणि रिची बेनो (४) यांच्या घातक बॉलिंगसमोर सपशेल शरणागती. ऑल आउट १५२. दुसऱ्या दिवशीच्या लंच पर्यंत ऑस्ट्रेलियाची मॅचवर मजबूत पकड मिळवण्याच्या दृष्टीने यशस्वी वाटचाल. १ बाद १२८. एकुलती एक विकेट जसुभाईच्या नावे. तरीही भारतीय मारा काही फारसा प्रभावी नव्हताच. लंचनंतर भारतीय कर्णधार गुलाबराय रामचंद यांनी पहिली गोष्ट काय केली असेल तर त्यांनी जसूभाईचा बॉलिंग एंड बदलला. बॉलिंग एंड काय बदलला, जसूभाईचा नूरही पालटला. जसूभाईचा बॉल वळायला लागला आणि स्पिन बॉलिंगसमोर धडपडणाऱ्या ऑस्ट्रेलियन बॅटसमनचे पायही डगमगायला लागले. वेल सेट झालेले मॅकडोनल्ड (५३) आणि हार्वे (५१) यांना पॅव्हेलीयनमध्ये पाठविल्यानंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला पॅव्हेलीयनचा रस्ता दाखविण्यासाठी जसूभाईनी फारसा वेळ नाहीच घेतला.
१ बाद १२८ वरून ऑस्ट्रेलियाच्या संघाची ऑल आउट २१९ अशी भंभेरी उडाली. इनिंगच्या शेवटी जसूभाईची बॉलिंग फिगर होती ३६ ओव्हर्स ६९ रन्स आणि ९ विकेट्स. होय, जसूभाईनी ऑस्ट्रेलियाचा जवळपास संपूर्ण संघच गिळून टाकला होता. एकच विकेट जी चंदू बोर्डेंच्या वाट्याला आली, त्या नॉर्मन ओनीलचा देखील एक अतिशय सोप्पा कॅच मिडविकेटवर बापू नाडकर्णीनी सोडला होता आणि त्यामुळेच डावात सर्वच्या सर्व १० विकेट्स मिळविण्याच्या विक्रमापासून जसूभाई चुकले. तरीही एकाच डावात ९ विकेट्स मिळविण्याचा विक्रम जसूभाईच्या नावावर जमा झालाच, जो पुढे सुमारे ४० वर्षे, १९९९ मध्ये अनिल कुंबळेने कोटला कसोटीत पाकिस्तानविरुद्ध एका डावात १० विकेट्स घेईपर्यंत त्यांच्या खात्यात जमा राहिला.
इनिंगच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाने २९१ रन्स काढल्या. डेव्हिडसनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम बॉलिंग करताना ९३ रन्स देऊन ७ विकेट्स घेत भारतीय संघ धावांचा डोंगर उभारणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली. पहिल्या डावातील ६७ रन्सची आघाडी वजा जाऊन २२५ रन्स चेस करायला ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरला. चौथ्या इनिंगमध्ये चेस करण्याच्या दृष्टीने हे अर्थातच आव्हानात्मक टार्गेट होतं. चौथ्या दिवशीच्या ५९ रन्सवर २ विकेट या स्कोरवरून पुढे खेळायला सुरु केलेला ऑस्ट्रेलियन संघ आणखी एका विजयाच्या दिशेने जातोय असं वाटत असतानाच परत एकदा जसूभाई संघाच्या मदतीला धाउन आले. त्यांच्या (५५-५) या भन्नाट स्पेलला पॉली उम्रीगर (२७-४) यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली. दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियन संघाचा डाव १०५ रन्समध्येच गुंडाळला. ऑस्ट्रेलियाचा ११९ रन्सनी पराभव करत भारताने त्यांच्या विरुद्धच्या कसोटीतील आपल्या पहिल्या-वहिल्या ऐतिहासिक विजयाची नोंद केली.