५ मिनिटांच्या रागात पोलिसांना नडलं की आयुष्यभराचा बाजार उठतो हे नक्की….

काल पासून मुंबईच्या मुलुंडमधील पोलिसांना नडल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतं आहे. यात जतीन सतरा नावाचा युवक गाडी पार्किंगच्या कारणावरून पोलिसांना रागात शिवीगाळ करताना दिसतं आहे. पण आता याच शिवीगाळीमुळे जतीनचा बाजार उठायची वेळ आली आहे.

नेमकं काय घडलं होतं? आणि का उठणार आहे बाजार?

गुरुवारी मुलुंड वाहतूक पोलिसातील ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप हे आरआरटी रोडवर नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करत होते. त्यावेळी पोलिसांनी याच भागातील दुकान असलेल्या जतीन सतरा या दुकानदाराच्या गाडीवर कारवाई केली. मात्र या कारवाईमुळे संतापलेल्या जतीनने पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

हळू हळू जतीनच्या रागाचा पारा इतका वाढत गेला की त्याने वाहतूक पोलिसांना थेट अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. यात त्याने एक विशीष्ट जातीचं नाव घेत

‘तुमच्यापेक्षा ते तरी बरे भीक मागून खातात’ असं म्हंटला.

https://www.facebook.com/100002819942236/videos/pcb.3595969077173722/3595968830507080

सोबतचं पोलिसांच्या अंगावर धावून जाऊ लागला. अखेर वाहतूक पोलिसांनी मुलुंड पोलिसांना याची माहिती दिली आणि जतीनला ताब्यात घेतले. इथं पर्यंत एक प्रकरण पुर्ण झालं. यात जतीनला जामीन देखील मिळाला. रात्री या प्रकरणी माफी मागतानाचा एक व्हिडीओ देखील पोस्ट करत हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला. यात त्यानं पोलिसांना सलाम वगैरे केला.

https://www.facebook.com/100002819942236/videos/pcb.3595969077173722/3595968963840400

मात्र आता जतीननं उच्चारलेलं जातीवाचक वाक्य त्याच्या अंगलटी येणार आहे. इथूनच दुसऱ्या प्रकरणाची सुरुवात झाली आहे. कालं रात्री विविध पक्षांच्या संघटना आणि कार्यकर्त्यांनी विशिष्ट जातीचा उल्लेख करुन त्यांना हिणवल्याबद्दल जतीनवर ॲट्रोसिटी दाखल करण्याची मागणी केली, आणि त्यानुसार त्याच्यावर हा गुन्हा दाखलं झाला आहे.

काय होवू शकतं ॲट्रोसिटी दाखलं झाल्यावर?

एखाद्या व्यक्तीवर ॲट्रोसिटी दाखल झाल्यास सर्वात आधी तर त्याला अटक पूर्व जमीन मिळत नाही. सोबतच संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक केली जाते. जर गुन्हा सिद्ध झाला तर सहा महिन्यांपासून ते पाच आणि दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या झोमॅटो प्रियंका मोगरे प्रकरणाची आठवण

मागच्या दोन वर्षापुर्वी झोमॅटो गर्ल प्रियांका मोगरे हिने देखील अशीच पोलिसांशी ५ मिनीटांमध्ये आलेल्या रागात हुज्जत घातली होती. त्यानंतर तिला तब्बल १४ महिने तुरुंगात काढावे लागले होते आणि याच काळात तिचं आयुष्य अक्षरशः बरबाद झालं होतं. अजून देखील हे प्रकरण ताजं आहे.

८ ऑगस्ट २०१९ रोजी वाशी, सेक्टर १७, नवी मुंबई या एरियात झोमॅटोसाठी डिलिव्हरी गर्लचे काम करणारी प्रियंका तिच्या बाईकवरून एक ऑर्डर डिलीव्हर करण्यासाठी निघाली होती. तितक्यात तिचा मोबाईल वाजला आणि कॉल घेण्यासाठी तिने बाईक बाजूला घेऊन तसेच गाडीवर बसलेल्या स्थितीत कॉल घेतला. ती फोनवर बोलत असताना तिच्या लक्षात आले की, मागून ट्रॅफिक पोलीस तिच्या गाडीच्या नंबर प्लेटचे फोटो काढत आहे.

प्रियंका त्या ट्रॅफिक पोलिसाला म्हणाली, “पुढे पण प्लेट आहे, पुढून फोटो काढा आणि मी काही नियम मोडलेला नाही, मी हॉल्टिंगवर आहे”. झालं… साध्या बाईकच्या पार्किंगवरून सुरु झालेल्या वादात प्रियंकाचा तोल गेला. ती पोलिसांशी उद्धटपणे बोलली, तिने स्वतःच्या मोबाईलने ते सगळं शुट करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांचा मोबाईल हिसकावला आणि तो परत त्यांच्या अंगावर टाकला.

एका डिलीव्हरी गर्लने केलेल्या अशा अपमानाने पोलिसांचा अहंकार चांगलाच दुखावला. त्यानंतर पोलिसांनी स्टेशन वरून ज्यादा पोलीस मागवून घेतले. यावेळी प्रियंका अतिशय सभ्यतेने पोलिसांना प्रकरण काय आहे ते सांगतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

मात्र पोलिसांनी तिला पोलिस स्टेशनला नेले आणि तिच्यावर सरकारी कामामध्ये अडथळा आणि दरोड्याचा प्रयत्न, शांततेचा भंग, धमकी देणे, भारतीय दंड विधान (IPC) ३५३, २९४, ३९३, ५०६ आणि ५०४ कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला.

प्रियंकाला न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांची बाजू वरचढ ठरली आणि प्रियंकाला जामीन नाकारला गेला. त्यामुळे तिची रवानगी थेट भायखळा जेलच्या महिला सेलमध्ये झाली. प्रियंकाला पोलिसांसोबत उद्धट वागणं बरचं महागात पडलं. या दरम्यान तिची अवघ्या साडेतीन वर्षांची लहान मुलगी तिला सासूबाईंकडे सोपवावी लागली होती.

पुढे एका महिन्याने पुन्हा जेंव्हा प्रियंकाची केस सुनावणीसाठी आली तेव्हा न्यायालयानं प्रियंकाला २५ हजार रुपयांच्या दोन सोल्वनसीवर जामीन मंजूर केला. मात्र एकट्या असलेल्या प्रियंकाला कोणीही मदत केली नाही. त्यामुळे जामीन मिळूनही पुन्हा तुरुंगातच खितपत राहिली.

फेब्रुवारी २०२० मध्ये काही स्वयंसेवी संस्थांकडून तिच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु झाले. पण नेमकं त्यावेळी लॉकडाऊन पडलं आणि ही प्रक्रिया आणखी रखडली. अखेरीस या स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांना ऑक्टोंबर २०२० मध्ये यश आलं आणि. तब्बल १४ महिने आणि ७ दिवसांनंतर प्रियांकाला यातुन जामीन मिळाला.

मात्र या सगळ्या प्रकरणादरम्यान प्रियंकाची दुचाकी पोलिसांनी जप्त केली होती. झाल्या प्रकारामुळे तिची नोकरीही गेली आणि तिच्या घराचे १४ महिन्यांचे भाडेही भरलेलं नव्हतं. दोन जामीनदार मिळवण्यासाठी तिची धावपळ अद्याप सुरू होती. सोबतचं व्हिडीओमुळे खराब झालेली प्रतिमा आणि ती पुसून टाकण्याचे सगळ्यात मोठं आव्हान प्रियंका सध्या पार करत आहे.

मात्र अशा सगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांची चुकी असल्यास काय? त्यांच्यावर कारवाई होते का?

यावर बोलताना एका पोलिस निरीक्षकांनी नावं न सांगण्याच्या अटीवर बोल भिडूशी बोलताना यासंबंधातील माहिती सांगितली. ते म्हणाले, पहिल्यांदा तर अशा सार्वजनिक ठिकाणी झालेल्या हिंसाचाराची नोंद घेतली जाते. यातील संबंधित व्यक्ती किंवा तिथला प्रत्यक्षदर्शी माणूस कोणीही त्या संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखलं केल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते.

त्यानंतर प्राथमिक चौकशी आणि त्यानंतर विभागीय चौकशीअंती संबंधित पोलिसावर कारवाई होवू शकते. यात मग सेवापुस्तिकेत नोंद घेणे, पगार रोखणे, वेतनवाढ रोखणे, निलंबन कायम ठेवणे किंवा अगदी बडतर्फी करणे अशा कारवाया होतं असतात. याआधी अनेकदा अनेकांवर अशा कारवाया झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना यातून सूट मिळते असं समजणे चुकीचे ठरू शकते.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.