दूसऱ्या दिवशी लोकं आपआपल्या घरी जातात मग भूतांची जत्रा सुरू होते.

आमचे भिडू लोक कधी काय विषय देतील आणि आम्हाला कामाला लावतील काही सांगता येत नाही. आज सकाळीच आम्हाला एक मेल आला. त्यात लिहलं होतं… 

नमस्कार,

मी चैतन्य गुंड मी तुमचे लेख वाचतो.तरी तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातील आगडगाव गाव जे नगर तालुक्यातील आहे. येथील कालभैरवनाथ मंदिरात भूतांच्या यात्रे बद्दल माहिती गोळा करून लेख प्रसिद्ध करावा अशी मागणी करतो.

गावागावात अशा जत्रा असतात, हे आजवर ऐकून आहेच पण भूताची जत्रा काय मॅटर म्हणून आम्ही उत्सुकतेपोटी या यात्रेवर करण्यात आलेलं लिखाण, स्थानिक पत्रकार आणि नगर जिल्ह्यातल्या लोकांना फोन करुन माहिती गोळा करु लागलो. लोकं गोळा होत असतील, भूत म्हणून बाहुल्या नाचवत असतील अस वाटतं पण काहीतरी वेगळीच माहिती निघाली.

जे माहित झालं ते सर्व तुमच्यासमोर. करा सुरवात. 

अहमदनगरच्या भूईकोट किल्यापासून पुढे जाणाऱ्या बुऱ्हाण रस्त्याला २० किलोमीटरच्या अंतराव आगडगाव नावाचं गाव लागतं. या गावाच्या शेजारीच काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. इथे काय चालतं तर आपल्या गावागावात जशी जत्रा भरते तशीच जत्रा इथे भरते. गावात मोठ्ठा उत्सव असतो. जत्रा झाली की दूसऱ्या दिवशी सर्वजण आपआपल्या घरी जातात. बाहेरून आलेले पाहूणे गाव सोडतात. तर गावातील मंडळी घरात बसतात.

दूसऱ्या दिवशी रात्री मंदिर परिसरात कोणीच जात नाही. याच कारण काय तर दूसऱ्या दिवशी रात्री इथे भूतांची जत्रा भरते. रात्रीच्या वेळी इथे भूतच भूत असतात. 

वास्तविक हि अंधश्रद्धेची गोष्ट. पण या अंधश्रद्धेत कोणालाच त्रास होत नाही. भूतांची जत्रा म्हणून कोणता बळी दिला जात नाही की कोणता होमहवन केला जात नाही. आज रात्री मंदिर परिसरात भूतांची जत्रा आहे म्हणून तिकडं कोणी जायचं नाही इतकच मानण्याची हि प्रथा. 

या प्रथेला सुरवात कधी झाली हे पाहण्याअगोदर मंदिराचा नेमका इतिहास कधीचा ते समजून घ्यायला हवं.

काळ भैरवनाथाचे मंदिर हे पुरातन देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिर परिसरात शिलालेख नाहीत पण इथे मोठमोठे दगड आणि शिळा आहेत. मंदिराच्या बांधकामावरून यासाठी मोठ्याप्रमाणात मनुष्यबळ लावण्यात आल्याचा अंदाज लावला जातो. मात्र  दंतकथानुसार आडगाव, रतडगाव आणि देवगाव या तीन  गावांची नावे ज्या राक्षसांवरुन आहेत त्या आगडमल, रतडमल आणि देवमल या तीन राक्षसांनी हे मंदिर बांधल्याच सांगितल जातं. मंदिराच्या दारावर या तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्र असल्याने भाविकांकडून देखील या दंतकथेला दूजोरा दिला जातो. 

मंदिर परिसरात एकूण २४ समाधी आहे. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या बाबांच्या या समाधी झाल्या. लोक सांगतात की २४ पिढ्याहून अधिकचा इतिहास या मंदिराला आहे. त्याचसोबत मंदिराच्या आवारात असणाऱ्या कडुलिंबाबद्दल देखील दंतकथा सांगितली जाते. या कडुलिंबाची पाने कडू लागत नाहीत. त्याचसोबत याला निंबाळ्या पण लागत नाहीत, त्यामुळे यासारखं दूसरं झाड उगवणं अशक्य असल्याच सांगतात.  

मंदिराच्या आवारात अशा प्रकारच्या गुढ गोष्टी असल्याने भूतांच्या जत्रेवर सहज विश्वास बसून जातो. जत्रेचं नेमकं कारण शोधताना जत्रा कधी सुरू झाली हे शोधावं लागतं. 

याबद्दल गावकरी एक कथा सांगतात,

कथा अशी की गावातील गोपीनाथ कर्पे नावाचे व्यक्ती जत्रेच्या दिवशी आपली घागर मंदिरात विसरले.  मंदिरात घागर विसरली हे दूसऱ्या दिवशीच्या रात्री त्यांच्या लक्षात आलं. लगेच ते मंदिरात गेले तर त्यांना मंदिराच्या आवारात विचित्र आकृत्या नाचताना दिसल्या. तिथूनच इथे भूतांची जत्रा भरते अस समजलं जावू लागलं. त्यापुर्वी देखील जत्रेच्या दूसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात जाण्याच विशेष कारण नव्हतच. तरिही या घटनेचा दूजोरा देवून भूतांची जत्रा खरच भरते अस सांगण्यात येत. 

दूसरी दंतकथा अशी की,

काळभैरव हा शंकराचा स्मशानातील अवतार. या देवासोबत राक्षस आणि भूताखेतांच्या गोष्टी पहिल्यापासूनच जोडलेल्या. तामिळनाडूतील मिनाक्षी मंदिरात एक उत्सव झाल्यानंतर तिथे असणाऱा आगडमल हा राक्षस महाराष्ट्राच्या दिशेने सोडण्यात येतो. तिथे असणारी हि दंतकथा याच मंदिराच्या आणि भूतांच्या जत्रेच्या संबधातून आली असावी. 

काही लोकं असही सांगतात की मंदिर हे दोन्ही टेकड्यांच्या मधोमध शांत ठिकाणी आहे. डाळीची आमटी, भाकरी असा प्रसाद सर्व भक्तांना दिला जातो. पुर्वीपासून इथे जत्रेनिमित्त पशुहत्या केली जायची. जत्रेच्या दूसऱ्या दिवशी मंदिर परिसारत उष्टं आणि खरकडं पडलेलं असायचं. जंगलातील जनावरं ते खावून जावेत म्हणून पुर्वीपासून दूसऱ्या दिवशी मंदीर खाली करण्याची प्रथा पडली असावी. 

आत्ता मुद्दा राहतो तो म्हणजे हे खरच आहे का? 

चैत्र महिन्याच्या रविवारी जत्रा झाली की सोमवारी रात्री भूतांची जत्रा भरते. त्यावेळी एकही माणूस या मंदिर परिसरात रात्रीचा रहात नाही. गावकऱ्यांकडून दूसरा कोणी रात्रीच्या वेळी मंदिराकडे चालला तर त्याला अडवलं देखील जात नाही. बाहेरील व्यक्ती मुद्दामहून रात्रीच्या वेळी भूतांची जत्रा पहायला जाणार असेल तर गावातले लोक सोबत जात नाहीत. तरिही आजपर्यन्त श्रद्धेचा विषय म्हणून लोक इथे जाणं टाळतात इतकच.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. NITIN BHISE says

    मी नितिन भिसे. 1 महिन्यातच तुमचे लेख वाचण्याची आवड निर्माण झाली कारण त्या लेखामुळे जिज्ञासा निर्माण होवून अजून माहीती मिळवण्याची आवड निर्माण होते. मी तुम्हाला नम्र विनंती करतो की,नकाशात उत्तर दिशा वरच्या दिशेने का दाखवतात याबद्दल लेख प्रसिद्ध करावा ही विनंती……आणि तुमची टीम अशीच लोकसेवे साठी कार्यरत राहो ही आशा करतो!!!

Leave A Reply

Your email address will not be published.