बनवाबनवी नंतर मराठीत कुठला बाप विनोदी पिक्चर झाला असेल तर तो “जत्रा”
बनवाबनवी बाप पिक्चर आहे. नो डाऊट. आजही बनवाबनवीला उतारा नाही. पण जत्रा पण तसाच बाप पिक्चर आहे. ‘अलबत्त्या गलबत्त्या, कोण फोडतो खलबत्त्या’ हि घोषणा आठवतेय? मध्यरात्री कानोळेंच्या घरावर ‘दार उघड कानोळे, दार उघड’ असा मोठमोठ्या आवाजातला मोर्चा आठवतोय? जेव्हा घरमालक भाड्याचा विषय काढतो तेव्हा होणारी गैरसोय दाखवुन ‘भाड्या…चं विचारताय आम्हाला?’ हा मोन्याने कानोळेंना विचारलेला प्रश्न आठवतोय.
ज्याप्रमाणे बनवाबनवीचा एकन्एक सीन आठवतो तसाच जत्रा आठवतो.
दादा कोंडके, महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांनी मराठीमध्ये जी विनोदी सिनेमांची यशस्वी परंपरा सुरु केली ती परंपरा पुढे नेण्याचं काम केदार शिंदेने केलं. केदारने ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ हि निखळ कौटुंबिक मालिका प्रेक्षकांना दिली. ‘हसा चकट फु’ सारखे विनोदी कार्यक्रम दिग्दर्शित केले. यामुळे केदारला विनोदाची किती चांगली जाण आहे, हे कळुन येत होतं.
२००४ साली केदारने ‘अगं बाई अरेच्चा’ आणला. या सिनेमाची कथा, गाणी सर्वच भन्नाट होतं. यानंतर मात्र केदारच्या डोक्यात मोठा सिनेमा करण्याचं डोक्यात होतं.
हा सिनेमा म्हणजे ‘जत्रा’.
अनेक कलाकार, भव्यदिव्य माहोल, दोन कलाकरांचा डबल रोल असं फार काही ‘जत्रा’ सिनेमात होतं. एकुणच केदारसमोर मोठं आव्हान होतं. इथे केदारच्या मदतीला अभिनेता अंकुश चौधरी होता. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अगं बाई अरेच्चा’ अशा केदारच्या प्रोजेक्ट्समध्ये अंकुशने सहदिग्दर्शन केलं होतं.
‘जत्रा’ साठी कलाकार ठरले. भरत जाधव, विजय चव्हाण, प्रिया बेर्डे, क्रांती रेडकर, सिद्धार्थ जाधव आणि इतर. आता जे कलाकार सिनेइंडस्ट्रीत तसेच टीव्ही माध्यमात लोकप्रिय आहेत त्यांना करियरच्या सुरुवातीला ‘जत्रा’ सारखा मोठा सिनेमा मिळाला होता.
‘जत्रा’च्या माध्यमातुन प्रिया बेर्डे ९ वर्षांनी कमबॅक करत होत्या.
शुटींगच्या नाईट शिफ्टचा पहिलाच दिवस. पाऊस येण्याचं चिन्ह दिसत असल्याने केदारला शुटींग लवकरात लवकर संपवायचं होतं. पण ज्यांचा सीन शुट करायचा होता त्या प्रिया बेर्डे अजुन सेटवर पोहचल्या नव्हत्या. थोड्याच वेळात प्रियाताई सेटवर आल्या. पहिल्याच दिवशी सेटवर यायला उशीर झाल्याने त्यांचं मन थोडं निराश झालं होतं. पण उदास होऊन चालणार नव्हतं, कारण एक खमकी आणि रुबाबदार महिला सरपंचाची भुमिका त्यांना करायची होती.
सीनची सर्व तयारी झाली. प्रियाताईंनी आपल्या आईचं स्मरण केलं. आणि सीन शुट केला. केदारने कॅमेरामागुनच मान डोलावुन पसंती दर्शवली. दिग्दर्शकाच्या या कृतीमुळे प्रियाताईंचा जीव हायसा झाला.
जितेंद्र जोशीने ‘कोंबडी पळाली’ गाणं लिहिलं. अजय-अतुल यांनी या गाण्याला धमाकेदार चाल लावली.
आता खरी कसोटी होती भरत जाधवची. कारण त्याला या गाण्यात बेभान नाचायचं होतं. भरतने याआधी सिनेमात इतका डान्स केला नव्हता. कोरीओग्राफर उमेश जाधवने भरत कडुन दोन दिवस ‘कोंबडी पळाली’ची तालीम करुन घेतली. अंकुश चौधरीने सुद्धा भरतला नाचण्यासाठी मदत केली. पुढे गाणं शुट झालं.
ज्यांनी गाणं पाहिलंय त्यांना माहितच आहे, भरत या गाण्यावर तुफान नाचलाय.
‘जत्रा’ मध्ये विजय चव्हाण यांचाही डबल रोल आहे. विजय चव्हाण यांनीच ‘जत्रा’ विषयी एक गंमतीदार आठवण सांगीतलीय ती अशी की,
‘सिनेमात हिरो भरत जाधव. पण जास्त काम मी केलंय. केदार सारखी नाईट शिफ्ट लावायचा. पहाटे पाच वाचता नाईट शिफ्ट संपुन आराम करायचा झाला तर पुन्हा दहा वाजता शुटींगला बोलायचा. तो अजिबात थकायचा नाही. ‘मोरुची मावशी’ नाटकानंतर मी जास्त दमलो असेन तो या सिनेमासाठी.’
भरत जाधव, अंकुश चौधरी, विजय चव्हाण हि मंडळी प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा तशी मिश्किलच. त्यामुळे ‘जत्रा’च्या सेटवर नेहमी हसतंखेळतं वातावरण असायचं.
याचाच एक किस्सा असा झाला…
विजय चव्हाण यांना सकाळी लवकर उठायची सवय. ते उठल्यावर इतरांनाही जबरदस्ती लवकर उठवायचे. वाईमध्ये ‘जत्रा’चं शुटींग सुरु होतं. विजय चव्हाण आणि अंकुश चौधरी यांची खोली बाजुला होती. एके दिवशी सकाळी विजय चव्हाण लवकर उठले आणि त्यांनी अंकुशला उठवलं.
अंकुश थोडा वैतागला होता. तो म्हणाला,
‘अहो काय काका, रात्री किती वाजता झोपलोय तुम्हाला माहितीय का? मला कशाला लवकर उठवलंत.’
विजय त्यावेळी तोंडात तंबाखु चघळत होते. त्यामुळे अंकुशचं बोलणं ते हसत हसत मान डोलावुन ऐकत होते.
अंकुशने बघितलं तर रस्त्यावरुन मुली सकाळी वाईच्या बस स्टँडपाशी जात होत्या. अंकुशने तोंडातुन मुलींच्या दिशेने एक चिडवण्याचा आवाज काढत पटकन आपल्या खोलीत धूम ठोकली. विजय चव्हाण यांची मात्र तारांबळ उडाली. तोंडात तंबाखु असल्याने ओठ दुमडलेले होते, आणि त्यात सर्व मुली वर पाहत होत्या. कुठे जाऊ अन् कुठे नको, अशी अवस्था विजय चव्हाणांची झाली होती.
‘जत्रा’च्या संपुर्ण शुटींगविषयी प्रियाताई सांगतात,
‘त्यावेळेस हम आपके है कौन करताना आम्ही सर्व जे एकमेकांशी आतुन जोडले गेले होते. तीच भावना जत्रा च्या वेळेस पुन्हा अनुभवायला मिळाली.’
अतुल देशपांडे हे ‘जत्रा’चे साऊंड डिझायनर. इतक्या मोठ्या जत्रेचा आवाज निर्माण करणं त्यांच्यासाठी आव्हान होतं. या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेमात प्रथमच ‘डाॅल्बी डिजीटल सराऊंड इ.एक्स’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. हाॅलीवुडमध्ये पाच वर्ष काम करणारे चेतन देशमुख यांनी डबल रोलसारखे स्पेशल इफेक्टस् ‘जत्रा’ साठी वापरले.
भरत जाधवचा सिनेमातला ‘घुम्या’ आणि त्याचं ‘ऑ’ प्रचंड लोकप्रिय झालं होतं.
जत्रा’ हा भरतच्या करियरला कलाटणी देणारा सिनेमा आहे. सिद्धार्थ जाधवला सुद्धा या सिनेमाच्या माध्यमातुन मोठ्या लांबीची भुमिका मिळाली आणि त्याने सुद्धा संधीचं सोनं केलं. अजय-अतुलचं संगीत तसंच सिनेमातली दोन्ही गाणी आजही प्रत्येकाच्या मनात आहेत.
‘अशी ही बनवाबनवी’ मध्ये जसा सुधीर जोशींचा अतरंगी घरमालक सरपोतदार लक्षात राहिलेला तसाच ‘जत्रा’ मधला विजय चव्हाणांनी रंगवलेला घरमालक कानोळे सुद्धा धमाल आणतो. अभिनय, दिग्दर्शन, संगीत अशा सर्वच बाजुंनी उत्कृष्ट असलेली हि ‘जत्रा’ १५ वर्षानंतरही आपलं तितकंच मनोरंजन करते.
- भिडू देवेंद्र जाधव
हे ही वाच भिडू.
- मराठी सिनेमात तो कॉमेडियन म्हणून अडकला, पण तो त्याहून भारी आहे.
- पहिल्याच भेटीत महेशला लक्ष्याने झपाटून टाकलं होतं.
- श्रीरंगपुरचे पोलीस कमिशनर म्हणून आयुष्यभर त्यांचा धाक राहिल..
- काय पण म्हणा रंजना अशोक सराफला कॉमेडीत जडच जायची.
Ag bai arechya…Nishani dawa.angtha… pachadlela,timepass…Hi kay bap moovi nahi ka