जावेद अख्तरांना स्टुडिओतून घरी जातांना एका सिनवरून ‘इक लडकी को देखा तो ऐसा लगा’ गाणं सुचलं

कलावंताची प्रतिभा कधी फुलेल आणि कधी कोमेजून जाईल ते त्यालाही ठाऊक नसते. हिंदी सिनेमाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत की अगदी काही क्षणात अप्रतिम गाणं तयार व्हायचं तर काही गाणे बनायला वर्ष वर्ष लागायचे!

विधू विनोद चोप्रा यांच्या ‘ १९४२ : अ लव स्टोरी’ या चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्याच्या किस्सा हा असाच आहे.

गीतकार जावेद अख्तर यांनी अक्षरशः काही मिनिटांमध्ये हे गाणं लिहिलं होतं. ज्या वेळी या सिनेमाची स्क्रिप्ट विधू विनोद चोप्रा यांनी गीतकार जावेद अख्तर व संगीतकार राहुल देव बर्मन यांना ऐकवली आणि या कथानकात गाण्याच्या जागा कोणत्या आहेत ते विचारलं; त्यावेळी जावेद अख्तर यांनी नायकासाठी असलेल्या गाण्यासाठी एक जागा सांगितली.

विधू विनोद चोप्रा आणि राहुल देव बर्मन हे जावेद अख्तर यांना म्हणाले ,” या ठिकाणी गाणे कसे शक्य आहे? अजून तर नायक नायिका परस्परांना भेटले पण नाहीत. त्यांची ओळख पण नाही. एक दुसऱ्याचं नाव देखील त्यांना माहिती नाही. अशावेळी तुम्ही गाण्याची जागा कशी काय सांगता?” पण जावेद अख्तर यांना खात्री होती की नायिकेला पाहता क्षणी नायकाच्या मनात ज्या भावना उचंबळून आलेल्या आहेत त्याला गाण्याच्या रूपातून व्यक्त करता येतील.

जावेद अख्तर यांचा आत्मविश्वास पाहून पंचम आणि विधू विनोद चोप्रा यांना या सिच्युएशनवर गाणे लिहायला सांगितले. तसेच त्यासाठी पुढच्या बुधवारी संध्याकाळी चार वाजता आपण भेटूयात असे सांगितले. तो दिवस शनिवारचा होता. जावेद यांनी विचार केला आणखी चार दिवस आहेत आपल्या हातात. मस्तपैकी गाणे लिहून टाकू. 

शनिवारी जावेद अख्तर घरी गेले आणि आपल्याला गाणे लिहायचे आहे हे चक्क विसरून गेले. बुधवारी संध्याकाळी मीटिंगसाठी जायला निघाल्यावर, गाडीत बसल्यानंतर त्यांना आठवले ‘अरे आज तर आपल्याला त्या सिच्युएशन वरचे गाणे त्यांना द्यायचे आहे!’ जावेद अख्तर यांना एकदम धक्का बसला ‘मागच्या चार दिवसात आपण एकही ओळ लिहिली तर नाहीच पण या गाण्याबद्दल साधा विचार देखील आपण केलेलं नाही!

आज सर्व मंडळी समोर आपली नाचक्की होणार कारण या गाण्याच्या सिच्युएशनचा आग्रह हा आपलाच होता. आपल्यासाठीच आजची मीटिंग अरेंज केली आहे!’ जावेद अख्तर खूप गोंधळात पडले. काय करायचे? जुहूच्या लुडो सिनेमाच्या समोरून जाताना त्यांना सिच्युएशन वरून एक ओळ मनात आली. ’ एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ बस ही एकच ओळ त्यांच्या मनात पिंगा घालू लागली.

दहा मिनिटात ते पंचमच्या म्युझिक रूममध्ये पोहोचले. सर्वजण त्यांचीच वाट पाहतो होते. जावेद कडे गाण्याची फक्त एक ओळ होती. चहापान झाल्यानंतर गाण्याचा विषय निघाला, त्यावेळी जावेद अख्तर म्हणाले,” मी चार दिवस याच गाण्याचा विचार करत होतो! आणि एक चांगलं गाणं तयार होऊ शकतं. पण तुम्हाला त्याची पहिली ओळ आधी ऐकवतो. 

जर तुम्हा सगळ्यांना आवडली तर मी पुढचं गाणं लिहून टाकतो.’ जावेदने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. ही ओळ जर त्यांच्याकडे रिजेक्ट झाली तर चांगलंच आहे असा विचार मनात होता! पण झाले उलटेच! जावेद ची पहिली ओळ ‘इक लडकी को देखा तो ऐसा लगा….’ सर्वांना खूपच आवडली आणि त्यांनी सांगितले लगेच फटाफट गाणे इथे लिहून टाका. असे सांगितले.

आता पुन्हा प्रॉब्लेम झाला. गाण्याची पहिली ओळ आवडल्यामुळे आता पुढचं गाणं लिहिणं भाग होतं!

त्यामुळे म्युझिक रूमच्या एका कोपऱ्यात जाऊन जावेदने विचार करायला सुरुवात केली. सिच्युएशन मध्ये नायकाने नायिकेला फक्त एकदाच पाहिलेला असते. तिची एक झलक त्याला फक्त दिसलेली असते पण तिच्या एका दर्शनाने तो मोहरून गेलेला असतो! सदैव तिच्या विचारातच असतो. त्यामुळे ‘इक लडकी को देखा तो ऐसा लगा जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब जैसे उजली किरण…..’

जावेद अख्तर एकूण एक विशेषण आठवू लागले आणि ते गाणे बनू लागले! असं करत करत गाण्याचा पहिला अंतरा तिथेच अक्षरशः काही मिनिटात तयार झाला! ते गाणं त्यांनी पंचम कडे दिलं. पंचम ने पुढच्या एक मिनिटात गाण्यावर नजर फिरवून लगेच त्याला चाल लावली.

आता गाण्याला जेव्हा गेय स्वरूप आलं त्यावेळी जावेद अख्तर यांचा मेंदू देखील आणखी तल्लख झाला. आणि त्याने तिथल्या तिथे दुसरा अंतरा देखील लिहून टाकला! काही काळापूर्वी गाण्याचा एक शब्द ही नसताना काही मिनिटात गाणे तयार झाले.

विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना आणखी कडवं लिहायला सांगितले.

आता मात्र त्यांनी सांगितलं हे उरलेलं गाणं मी घरी जाऊन पूर्ण करतो. तिसरं कडवं लिहिताना मात्र त्यांना बऱ्यापैकी झगडावे लागलं. कारण सगळी चांगली विशेषण संपून गेली होती. आणि जावेद यांनी एक ठरवलं होतं की नायक आणि नायकांचं प्रेम हे शुद्ध प्रेम आहे. इथे वासनेला अजिबात वाव नाही. त्यामुळे त्यांनी ‘ एक लडकी को देखा तो ऐसा लगा जैसे छलका हो जाम, पहला नशा’ असे शब्द अजिबात लिहिले नाहीत.

प्रेमाच्या उदात्त भावनेने भरलेलं आणि वासनेचा लवलेश नसलेला हे गाणं जावेद अख्तर यांनी पूर्ण केलं. पंचमदा यांनी अतिशय सुंदर असं याला संगीत दिलं. कुमार सानूच्या आवाजातील या गाण्याने तमाम देशभरातील तरुणांमध्ये प्रेमाची लहर पसरली. सिनेमा संगीताच्या गोल्डन इरा मधील वाटावीत अशी ही गाणी होती.

दुर्दैवाने राहुल देव बर्मन यांचा हा शेवटचा सिनेमा ठरला. कारण या चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच ४ जानेवारी १९९४ रोजी त्यांचे निधन झाले. या काळात चित्रपट संगीताचा दर्जा खूपच खालावला होता सरकायालो खटिया, चोली सारखे शब्द असलेली गाणी आणि संगीत सिनेमातून येत होतं. पण सिनेमाच्या संगीताला पुन्हा एकदा स्वच्छ वाटेवर आणून ठेवण्याचे काम राहुल देव म्हणून यांनी केलं! १५ एप्रिल १९९४ ला सिनेमा भारतभर प्रदर्शित झाला आणि सुपर हिट ठरला.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.