जावेद अख्तरने रागाच्या भरात निम्मं सोडलेलं गाणं समीरने पूर्ण केलं आणि इतिहास घडला

लहानपणी सिनेमांचा मनावर इतका पगडा असतो की, सिनेमात दिसणाऱ्या जोड्या खऱ्या आयुष्यात
एकमेकांच्या पार्टनर असतील असंच वाटतं. शाहरुख खान आणि काजोल ही अशीच एक जोडी. या दोघांची सिनेमातली केमिस्ट्री इतकी कमाल होती की हे दोघे खऱ्या आयुष्यात सुद्धा एकमेकांचे पार्टनर असतील असंच भाबड्या मनाला वाटायचं.

‘कुछ कुछ होता है’ पाहून अंजली सारखी एखादी मस्तीखोर मैत्रीण असावी असं सारखं वाटायचं. मित्र जरी हवेत उडत असला तरी त्याला एका झटक्यात जमिनीवर आणणारी अशी अंजली. ‘राहुल इज अ चिटर’, असं म्हणत राहुलच्या डोक्याला शॉट लावणारी. पण मनातून मित्राबद्दल हळवी असणारी अंजली.

शाहरुख आणि काजोलची केमिस्ट्री या सिनेमात जी बहरली आहे, त्याला तोड नाही.

करण जोहर आत्ता जरी ‘कलंक’ लागेल असं काम करत असला तरीही ‘कुछ कुछ होता है’ सारखा बेहतरीन सिनेमा त्याने बनवला आहे. जो प्रत्येक काळाला रीलेट करणारा आहे. ‘कुछ कुछ होता है’ ची गाणी सुद्धा मस्त. अगदी कॉलेजच्या तरुणाईच्या जवळची असणारी. या सिनेमाच्या टायटल साँगच्या निर्मितीचा किस्सा मात्र काहीसा वेगळाच आहे.

‘कुछ कुछ होता है’ सिनेमाला जेव्हा १९ वर्ष पूर्ण झाली तेव्हा शाहरुखने या गाण्यामागचा किस्सा
उलगडला.

शाहरुख अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत दाखल झाला. अभिनेता होणाऱ्या प्रत्येकाच्या मनात शोले, दीवार हे सिनेमे म्हणजे आदर्श असतात. या दोन्ही सिनेमांचे लेखक म्हणजे सलीम – जावेद. त्यामुळे शाहरुखला जावेद अख्तर यांच्याविषयी माहीत होतं. शाहरुखच्या अनेक सिनेमांसाठी जावेद साबने गाणी लिहिली आहेत.

शाहरुखने करण जोहर सोबत ‘कुछ कुछ होता है’ करण्याचा निर्णय घेतला. या सिनेमासाठी जावेद अख्तर गीतलेखनाची जबाबदारी सांभाळणार होते. जावेद अख्तर जेव्हा गीतकार म्हणून सहभागी झाले तेव्हा सिनेमाचं नाव निश्चित नव्हतं. परंतु जावेद साबने एक गाणं लिहिलं. जावेद साबने लिहिलेल्या या गाण्याचं रेकॉर्डिंग सुद्धा झालं.

आणि एक वेळ अशी आली जेव्हा सिनेमाचं नाव ठेवण्यात आलं ‘कुछ कुछ होता है’ नावावरून या सिनेमाचा विषय वेगळा असणार असं जावेद साब यांनी अनुमान लावलं.

जावेद साब यांनी सिनेमाचं नाव बदलायची मागणी केली. परंतु करण जोहर आणि सिनेमाची इतर टीम
मात्र नावावर अडून राहिली. अखेर जावेद अख्तर यांना राग आला. ते शाहरुख सकट सर्वांवर नाराज होते. त्यांनी शेवटी रागाच्या भरात सांगितलं,

‘तुम लोगो को यही नाम रखना है तो रखलो. अब तो मेरा दिल जागे न सोता है, क्या करू हाय, कुछ कुछ होता है. तुम लोगो के यही चाहिए ना.. तो रखो’

असं बोलून जावेद साब यांनी सिनेमा सोडला.

या सर्व गोंधळात जावेद अख्तर यांनी रागाच्या भरात उच्चारलेले शब्द एका गीतकाराने कागदावर उतरवले. आणि याच शब्दांचा आधार घेऊन या गीतकाराने सिनेमाचं टायटल साँग लिहून काढलं. हा
गीतकार म्हणजे समीर.

सुप्रसिद्ध गीतकार अंजान यांचे पुत्र असलेले समीर हे देखील तगडे गीतकार होते.

त्यांनी गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड व्हावा इतकी गाणी अफाट लिहिली, समीर लिरिक्स फॅक्ट्री म्हणून सिनेमा सृष्टीतील दिग्गज लोक त्यांचा उपहास करायचे. त्यामुळे मोठ्या बॅनरची संधी त्यांना चुकूनच मिळायची. यावेळी जावेद अख्तरनि रंगाच्या भरात सोडलेला धर्मा प्रोडक्शनचा सिनेमा मात्र त्यांनी हातचा जाऊ दिला नाही. ज्वेडसाब यांच्याच शब्दांना त्यांनी चार चांद लावले.

जतिन – ललित यांनी या गीताला संगीत दिलं. ‘कुछ कुछ होता है’ सुपरहिट झालाच. पण सिनेमाच्या गाण्यांना सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळाली. इतकंच नव्हे, या गाण्याच्या टायटल साँग साठी अलका याग्निक यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच समीर अंजान यांना फिल्मफेअर मध्ये नामांकन मिळालं.

“मी सोडून सर्वांना या सिनेमाचं टायटल आवडलं होतं. मला खंत आहे की मी हा सिनेमा सोडला”,

असं जावेद अख्तर यांनी या एका मुलाखतीत सांगितलं होतं. रागाच्या भरात का होईना जावेद अख्तर यांनी सिनेमा सोडताना गीतकार म्हणून गाण्याचे शब्द देऊन गेले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.