पाकिस्तानात जाऊन त्यांनाच सुनवलेल्या जावेद अख्तर यांचा स्ट्रगल काही कमी नाही…

भारतातले प्रसिद्ध लेखक, स्क्रीनप्ले रायटर, गीतकार असलेले जावेद अख्तर हे तसं सारखं चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व आहे. बऱ्याचदा ते वादाच्या भोवऱ्यात अडकलेलेही पाहायला मिळतात. त्याच जावेद अख्तर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओचं विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाकिस्तानातल्या एका कार्यक्रमातला आहे आणि त्या कार्यक्रमात जावेद अख्तर हे पाकिस्तानलाच खडे बोल सुनावताना दिसतायत.

मागच्या आठवड्यात पाकिस्तानच्या लाहोरमध्ये प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांच्या आठवणीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून त्यांना बोलवण्यात आलं होतं.

या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षकांपैकी कुणीतरी त्यांना प्रश्न विचारला, ‘तुम्ही अधून-मधून पाकिस्तानात येत असता. मग तुम्ही भारतात गेल्यावर तिथल्या लोकांना हे सांगता का? की, पाकिस्तानात सुद्धा चांगले लोक राहतात आणि आम्ही फक्त बॉम्ब घेऊन उभे नसतो.’

या प्रश्नाचं उत्तर देताना जावेद अख्तर यांनी थेट पाकिस्तानलाच सुनवलंय. ते म्हणाले,

“आपण एकमेकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यातून काहीही निष्पण्ण होणार नाहीये. आम्ही मुंबईतल्या लोकांनी आमच्या शहरावर हल्ला झालेला बघितलाय आणि ते हल्लेखोर काय नॉर्वे किंवा इजिप्तवरून आले नव्हते. आजही ते हल्लेखोर तुमच्या देशात सुरक्षित आहेत आणि मुक्तपणे फिरतायत. त्यामुळे आमच्या भारतीयांच्या मनात तुमच्याबद्दल राग असेल तर त्याबद्दल तुम्हाला तक्रार असता कामा नये.”

त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय आणि भारतात त्यांच्या या वक्तव्याचं कौतूकही केलं जातंय.

आज कौतूक होत असलं तरी, आतापर्यंत बऱ्याचदा ते ट्रोलही झालेत. पण ट्रोल करणाऱ्यांना म्हणा किंवा आज कौतूक करणाऱ्यांना म्हणा त्यांच्यापैकी अनेकांना जावेद अख्तर यांचं स्ट्रगल माहीत नसेल. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये सेटल होईपर्यंत प्रचंड मेहनत आणि स्ट्रगल केलंय.

तर जावेद अख्तर यांचा जन्म झाला तो ग्वाल्हेरमध्ये. त्यांच्या कुटुंबातले बहुतेकजण हे कवींचं होते. म्हणजे जावेद यांचे आजोबा मुजतार खैराबादी हे देखील त्यांच्या काळातील प्रसिद्ध कवी होते. जावेद अख्तर यांचे वडील जान निसार अख्तर हे बॉलीवूड चित्रपटांचे गीतकार आणि उर्दू कवी होते तर आई साफिया उर्दू लेखिका होत्या. त्यामुळे जावेद याना सुद्धा लेखनाची कला ही पूर्वजांकडूनच मिळालेली. 

जावेद यांच खरं नाव जादू होतं. त्यांचे वडील जान निसार अख्तर यांनी त्यांच्या ‘लम्हा-लम्हा जादू का फसना होगा’ या कवितेतून ते ठेवलं होते. काही काळानंतर, त्यांनी नाव बदलून जावेद ठेवण्यात आले, कारण ही दोन नावे एकमेकांशी मिळती जुळती होती.

पुढे लहान असतानाच जावेद यांच्या आईचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. पण काही काळानंतर जावेद यांना वडिलांसोबत राहणं कठीण झाल तेव्हा त्यांनी आपल्या आजी-आजोबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि लखनऊला गेले. लखनऊमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भोपाळच्या सेफिया कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर लेखक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जावेद यांच्या म्हणण्यानुसार ४ ऑक्टोबर १९६४ च्या आसपास  मुंबई गाठली. तसे ते अनेक शहरामध्ये राहिले पण त्याच आयुष्य बदललं ते मुंबईतच. त्यांची स्वप्नं तर मोठी होती, पण त्यासाठी स्ट्रगल करणं ही त्याकाळची ओळखच होती. जावेद यांना राहायला घर नव्हतं ना खायला पैसे जवळ होते. आपल्या स्ट्रगलिंच्या काळात अनेक रात्री न खातापिता झाडाखाली झोपून काढल्या. कधी ते कुठल्या कॉरिडॉरमध्ये तर कधी व्हरांड्यात झोपायचे. नंतर त्यांना जोगेश्वरीतील कमाल अमरोही यांच्या स्टुडिओत झोपायला जागा मिळाली.

जावेद छोटी मोठी काम करून पोट भरत होते. अशात सरहदी लुटेरेच्या सेटवर त्यांची सलीम यांच्याशी भेट झाली. त्या चित्रपटात सलीम अभिनेता होते आणि जावेद प्रॉडक्शनची काम करत होते. लेखनाची आवड असलेल्या दोघांची लवकरच मैत्री झाली. दोघांनाही लेखनाची आवड होती, पण या नव्या जोडीला कोणतेही काम द्यायला लवकर तयार व्हायचचं नाही.

त्यावेळी एस.एम.सागर यांना तरुण लेखकांची गरज होती. जावेद त्यावेळी उर्दूमध्ये लिहायचे आणि नंतर त्याचे हिंदीत भाषांतर झाले. काम आवडल्यावर एस.एम.सागर यांनी दोघांना काम दिले. यानंतर हळूहळू सलीम आणि जावेदची जोडी इंडस्ट्रीत आपलं स्थान तयार करू लागली, पण त्यावेळी स्क्रिप्ट रायटर्सना क्रेडिट मिळत नसायचं.  

राजेश खन्ना हे पहिले स्टार होते ज्यांनी या जोडीवर विश्वास ठेवला आणि त्यांना मोठा ब्रेक दिला. राजेश खन्ना यांनी त्यांना त्यांच्या हाथी मेरे साथी या चित्रपटात पटकथा लेखकाचे काम दिले. हा चित्रपट हिट झाला आणि त्यासोबतच लेखकांनाही क्रेडिट द्यायला सुरुवात झाली. आणि इथूनच जावेद अख्तर यांच्या करियरला खरी सुरुवात झाली. 

हाथी मेरे साथी सोबतच या जोडीने अंदाज, अधिकार, सीता और गीता, यादों की बारात, जंजीर, हाथ क्लीन्स, दीवार, शोले, चाचा-भतीजा, डॉन, त्रिशूस, दोस्ताना, क्रांती, जमाना, मिस्टर इंडिया असे अनेक चित्रपट दिले. या जोडीने लिहिलेल्या २४ पैकी २० चित्रपट हिट ठरले. पण, काही मतभेदामुळे १९८२ मध्ये जावेद अख्तर आणि सलीम खान या जोडीत फूट पडली.

आपली जोडी तुटल्यानंतर सुद्धा जावेद यांनी आपल्या कामावर कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. त्यांनी पुढे एकट्याने अनेक चित्रपटात सुपरहिट गाणी दिली. ज्यामुळे त्यांना फिल्मी करिअरमध्ये अनेक नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेत. त्यांना सलग तीन वर्षे म्हणजे १९९७ मध्ये साज, १९९८ मध्ये बॉर्डर आणि १९९९ मध्ये गॉडमदर साठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.  यासोबतच जावेद अख्तर यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या भारतातील सर्वोच्च पद्म सन्मानही मिळालेत.

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.