शुद्ध शाकाहारी श्रीनाथ भारताचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान बॉलर होता .
जवागल श्रीनाथ आठवतोय ?
बँकेतल्या क्लार्क सारखा दिसणारा श्रीनाथ एक फास्टर बॉलर आहे हे वाटायचं नाही. शिक्षणाने इंजिनियर असलेला श्रीनाथ अंगापिंडाने धिप्पाड नव्हता. फास्टर बॉलरकडे असायला हव असं धडकी भरवणार व्यक्तिमत्व त्याच नव्हतं. एके काळी भारतीय गोलंदाजांबद्दल चेष्टेने असं म्हंटल जायचे की भारतात फास्टर बॉलर हा प्रकारच नसतो. असतात ते फक्त स्पिनर आणि मध्यमगती गोलंदाज. भारतातले पीचच असायचे पाटा. फलंदाजांसाठी नंदनवन. किती जरी जीव तोडून बॉलिंग केली तरी बॉलला स्पीडच मिळत नाही. अजूनही आपल्या इथले पिच हे खास स्पिनर साठी बनवलेले असतात.
अशा विपरीत परिस्थितीत श्रीनाथ १५० किमी प्रती तास या वेगाने बॉलिंग करायचा.
श्रीनाथ भारतातला आता पर्यन्तचा सर्वात फास्टर बॉलर आहे.धक्का बसला ना ऐकून. हो !
ना कपिल देव, ना झहीर खान, ना उमेश यादव. श्रीनाथने भारतातर्फे सगळ्यात जलदगतीने गोलंदाजी केली होती. विशेष म्हणजे तो शाकाहारी होता. एखाद्या शाकाहारी गोलंदाजाने एवढी फास्ट गोलंदाजी करणे हे आजही आश्चर्य मानले जाते.
कपिल देवच्या निवृत्तीनंतर भारतीय बॉलिंगची धुरा श्रीनाथने कित्येक वर्षापर्यंत समर्थ पणे सांभाळली. व्यंकटेश प्रसाद बरोबर त्याची जोडी जमली. विशेषतः दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याच्या गोलंदाजीला बहार यायचा. अनेक दिग्गज आफ्रिकी फलंदाज श्रीनाथ पुढे नांगी टाकताना दिसायचे.
त्याच्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय सामना पाकिस्तान विरुद्ध होता.
१९९९ साली कलकत्त्याच्या ईडन गार्डन मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या इनिंग मध्ये ५ बळी घेतले. मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये त्याची बॉलिंग डोळ्याचे पारणे फेडणारी अशी होती. त्या इंनिंग मध्ये त्याने ८ विकेट घेतल्या. एका मॅच मध्ये १३ विकेट्स घेण्याची किमया त्याने केली.
वन डे मध्ये भारताकडून सगळ्यात पहिल्यांदा ३०० विकेटचा आकडा त्याने पार केला होता. भारतातर्फे सर्वात जास्त विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अनिल कुंबळेच्या खालोखाल असे दुसरे स्थान मिळवले आहे.
श्रीनाथ कडे फास्टर बॉलर मध्ये न आढळणारा एक गुण होता तो म्हणजे तो कधी स्लेजिंग करायचा नाही.
स्लेजिंग हे बॉलर च्या भात्यातलं अदृश असे अस्त्र मानलं जात. फिल्डरनी सोडलेलं झेल असो किंवा फलंदाजाने केलेली धुलाई असो श्रीनाथ स्थितप्रज्ञ असायचा. शिवीगाळ तर दूर श्रीनाथ रागाने कटाक्ष देखील टाकायचा नाही. विकेट घेतल्यावर सुद्धा त्याने कधी असुरी आनंद साजरा केला नाही.
एकदा न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यातला एक किस्सा झाला होता.
श्रीनाथ ने टाकलेला जोरदार बाउन्सर स्टीफन फ्लेमिंगच्या हेल्मेटला लागला. अशा डेडली बाउन्सर नंतर बॉलर हमखास स्लेजिंग करतात. फ्लेमिंगला श्रीनाथ देखील काही तरी पुटपुटताना दिसला. त्याने श्रीनाथला उलट उत्तर दिले. पण त्याला नंतर कळाले की श्रीनाथ त्याला कुठे लागले का याची चौकशी करत होता.
फ्लेमिंग म्हणतो,
“त्या दिवशी त्याला स्वतःची खूप लाज वाटली. श्रीनाथ सारखा जंटलमन सध्याच्या युगात विरळाच.”
अनिल कुंबळे च्या एका इंनिंग मध्ये १० विकेट घेतलेल्या विश्वविक्रमात श्रीनाथ चाही हातभार आहे. कुंबळेचा विक्रम जवळ आल्यावर श्रीनाथ ने मुद्दामहून आपल्याला विकेट मिळणार नाही असे बॉल टाकले. त्याच्या बॉलवर उडालेला झेल सदागोपन रमेश ला सोडायला लावला.
मित्राच्या विश्वविक्रमासाठी त्याग करणारा असा गोलंदाज पहिलाच.
इंग्लिश मध्ये एक म्हण आहे “NICE GUYS FINISH LAST”. श्रीनाथचा चांगुलपणा हाच कधी कधी त्याच्या साठी दुर्गुण ठरला. भारतीय क्रिकेट मध्ये बॉलर हे ओझ्याचे बैल असतात. त्यातही फास्टर बॉलरचे हाल कुत्रेही खात नाही.
अतिशय उष्ण तापमानात बिल्कुलही गवत नसलेल्या पाटा खेळपट्टीवर सातत्याने गोलंदाजी करून करून अखेर श्रीनाथला खांद्याच्या दुखापतींनी ग्रासले. तत्कालीन कप्तानांनी त्याचा अती वापर केला. नाही तर डोनाल्ड, मॅकग्रा, वसीम अक्रम या समकालीन दर्जेदार द्रुतगती गोलंदाजाच्या यादीत त्याचे नांव दुर्लक्षित राहिले नसते.
असा हा क्रिकेट मधला जंटलमन सध्या त्याला शोभेल असं मॅच रेफ्रीच काम करतोय. कर्नाटक क्रिकेट असोसिएशन मध्ये ही तो सक्रीय आहे. पण अनेकांना वाटत त्याची खरी जागा भारताचा बॉलिंग कोच म्हणून आहे. त्याच्या अनुभवाचा वापर भारतासाठी नवीन वेगवान गोलंदाज तयार करण्यासाठी व्हावा यात चुकीचे काही नाही.
हे ही वाच भिडू –
- क्रिकेटचा शोध लावणारा इंग्लंड, इतिहासातील पहिल्याच कसोटीत पराभूत झाला होता !!
- चेतन चौहान हा विक्रम करणारे जगातील पहिलेच क्रिकेटपटू ठरले होते.
- भारतीय क्रिकेटमधील खलनायक, ज्याने स्वार्थापोटी देशहित फाट्यावर मारलं !