राजीव गांधी आणि नरसिंहराव यांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न म्हणजे जवाहर नवोदय

१९८६ सालचा जानेवारी महिना. देशाचे शिक्षणमंत्री पी.व्ही. नरसिंहराव आपल्या साऊथ ब्लॉकमधल्या  ऑफिसमध्ये काही फायलींचा निपटारा करत बसले होते. भारताचे नवे शिक्षण धोरण बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं. अचानक त्यांना निरोप आला,

“पंतप्रधान राजीव गांधींनी तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांसोबत बोलावलं आहे. “

किती जरी झालं तरी नरसिंह राव हे जेष्ठ नेते होते. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रालय सांभाळलं होतं. राजीव गांधींसारख्या वयाने व अनुभवाने कमी असलेल्या पंतप्रधानांनी आपल्याला अधिकाऱ्यांसह हजर राहायला सांगणे त्यांना थोडस खटकलं होतं.

पंतप्रधानांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे पाहायला नरसिंह राव आपल्या मंत्रालयातील प्रमुख ऑफिसरना घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये पोहचले. नव्या शैक्षणिक धोरणावरून राजीव गांधी प्रचंड चिंतेत होते. त्यांच्या सरकारवर याबद्दल टीका केली जात होती. म्हणूनच त्यांनी नरसिंह राव यांना चर्चेसाठी बोलावलं होतं.  

राजीव गांधी त्यांना म्हणाले की,

“नेहमी अशी धोरणे बनतात आणि नंतर ती धूळ खात पडली जातात. पण आपल्या यावेळच्या शैक्षणिक धोरणातून मोठे बदल घडवायचे आहेत जे की पुढच्या अनेक पिढयांना फायदेशीर ठरतील. ” 

नरसिंहराव सांगतात की त्या दिवशी आम्ही पंतप्रधानांना आपल्या अनेक कल्पना सांगितल्या. पण त्यांच्या डोक्यात एक गोष्ट बसलेली होती. त्यांनी आम्हाला सूचना केली की तुम्ही फक्त दिल्लीतल्या मुलांचा विचार करू नका. संपूर्ण देशातील मुलांपर्यंत हे धोरण पोहचले पाहिजे.

अनेक चर्चा झाल्या, वाद झाले पण बैठकीचा शेवट  काही मोठे निर्णय घेऊन झाला. नाराज होऊन मीटिंगला आलेले नरसिंहराव हसत हसत पंतप्रधानांच्या ऑफिसमधून बाहेर आले होते. याच ऐतिहासिक बैठकीमध्ये झालेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे केंद्र शासनाच्या अखत्यारित एक शाळा सुरु करणे. ती शाळा म्हणजेच,

जवाहर नवोदय विद्यालय

हि फक्त एक शाळा नव्हती तर संपूर्ण देशातील मुलांना एका धाग्यात जोडणारा एक दूरदर्शी निर्णय होता. ज्याप्रमाणे नेहरूंनी देशभरात आयआयटी, आयआयएम सुरु करून उच्चशिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणलं. त्याप्रमाणेच गरिबातल्या गरीब मुलांना चांगल्या दर्जाचे माध्यमिक शिक्षण मिळावे म्हणून नवोदय सुरु करायचे हे राजीव गांधी आणि नरसिंहराव यांच्या डोक्यात आलं होतं.

नरसिंह राव जमिनीवरचे कार्यकर्ते होते. आंध्र प्रदेशात ते शिक्षणमंत्री असताना अनेकदा एकटे जीप घेऊन खेडय़ापाडय़ांत जात असत. म्हणूनच योजनेचे प्रारूप तयार होईपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांना विचारणा न करताच त्यांनी शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांशी, कुलगुरूंशी चर्चा सुरू केली. दौऱ्यांचासुद्धा यासाठी ते उपयोग करीत. मध्येच शाळा सोडणाऱ्यांची संख्या जाणून घेण्यासाठी त्यांनी खासगी व्यक्तींचे सहकार्य घेतले होते.

यातूनच नवं शिक्षण धोरण साकार होत गेलं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जन्मशताब्दीच्या आधी देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालय सुरु करण्याचं टार्गेट होतं.

शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नवोदय विद्यालय समिती स्थापन करण्यात आली. त्याचे पदसिद्ध अध्यक्षपद देशाच्या शिक्षणमंत्र्यांकडे देण्यात आलं होतं. हरियाणातील झझ्झर  आणि महाराष्ट्रातील अमरावती येथे पायलट प्रोजेक्ट म्हणून नवोदय विद्यालय सुरु करण्यात आले.

तो प्रयोग यशस्वी झाल्यावर देशभरात या शाळा सुरु करण्यात आल्या. या शाळांमध्ये ६ वी  ते १२ वी पर्यंतच शिक्षण पूर्णपणे मोफत दिलं जातं. फक्त इतकंच नाही तर राहण्या खाण्याचा शाळेचे दफ्तर, वह्या पुस्तके शाळेकडूनच दिली जातात. प्रत्येक जिल्ह्याचे कलेक्टर यांच्याकडे या शाळेची जबाबदारी दिलेली असते.

मात्र येथे प्रवेश मिळण्यासाठी कोणताही वशिला चालत नाही. नवोदयमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. याचे निकष म्हणजे विद्यार्थी पाचवी मध्ये शिकत असावा. ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला आहे त्याच जिल्ह्याचा रहिवासी असावा आणि वयाचे निकष पूर्ण केलेले असावेत.

प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास १० हजार विद्यार्थी नवोदय ची परीक्षा देतात ज्या परीक्षेत गुणानुक्रमे आघाडीवर असणाऱ्या ८० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. विशेष म्हणजे या शाळांमध्ये ७५% जागा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित केलेल्या असतात.

आज देशभरात जवळपास ६५० च्या वर नवोदय विद्यालय आहेत. अगदी अंदमान निकोबारच्या बेटांपासून ते अरुणाचलच्या पहाडापर्यंत सर्वत्र नवोदय विद्यालय आहेत. संपूर्ण देशभरात एकच सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला जातो. हिंदी इंग्रजी व स्थानिक भाषापासून ते विज्ञान गणित याचं सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी दर्जेदार शिक्षक नियुक्त केलेले असतात. सरकारी शाळा असूनही स्मार्ट स्कुलसारख्या अत्याधुनिक सुविधा या नवोदय शाळांमध्ये पुरवलेल्या आहेत.

नवोदयचा आणखी एक कौतुकास्पद उपक्रम म्हणजे मायग्रेशन.

दोन वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या राज्यातील एकमेकांशी कनेक्ट असणाऱ्या शाळा आपल्या नववीच्या वर्गात शिकणाऱ्या ३०% मुलांना एक वर्षासाठी आपापसात एक्स्चेंज करतात. यातून वेगळ्या भागातील संस्कृती, आचारविचार, भाषा यांची या विद्यार्थ्यांना ओळख होते व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी देखील प्रचंड फायदा होतो.

म्हणूनच फक्त अकॅडमिक्स मध्ये नाही तर इतर क्षेत्रातही नवोदयचे विद्यार्थी गाजत असतात.

भारताची गोल्डन गर्ल हिमा दास, सुप्रसिद्ध मराठी अभिनेता ललित प्रभाकर हे नवोदयचे विद्यार्थी आहेत.

राजीव गांधी आणि पीव्ही नरसिंहराव यांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न आज देशभराच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत अभिमानाने उभे आहे. सरकारी पातळीवर घेतलेला एक धडाडीचा निर्णय कित्येकांचं आयुष्य बदलून टाकू शकतो याच उदाहरण म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.