मोदींचं माहित नाय पण भारतीय सिनेमा जगभर विस्तारण्यात नेहरूंचं ढीगभर योगदान आहे

एक बातमी वाचली, 

भारतीय सिनेमा जगभर विस्तारण्यात PM मोदींचा महत्वाचा वाटा आहे – अक्षय कुमार.

बॉलीवूडला खरी ओळख मोदींमुळे मिळाली असे विधान करत अक्षय कुमारने एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. झालं अक्षय कुमारने विषय काढला अन कट्ट्यावर दोन गटात वाद-विवाद सुरु झाला. मोदी समर्थक गटाचं म्हणणं होतं, मोदींनी देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विशेष ओळख मिळवून दिली आणि बॉलीवूड चित्रपटांना आता जागतिक स्तरावर खूप ओळख मिळतेय ते फक्त मोदींमुळे…

दुसरा गट हा दावा काय मान्य करायला तयार नव्हता..त्यातली काही पोरं स्पर्धा परीक्षेचे विध्यार्थी होते.  त्यांचं म्हणणं होतं की, भारताच्या चित्रपटसृष्टीला जगभरात तर नेहरूंनी पोहोचवलं..असं म्हणत त्यांनी नेहरूंच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाची यादीच दिली..

असो आम्ही या दोन्ही गटातले नसून गटात न बसणारे भिडू आहोत, आम्ही फक्त माहिती शोधतो आणि अगदी खरी ती माहितीच तुमच्यापर्यंत पोहचवतो…

आज भारतीय चित्रपटसृष्टीचा गाजावाजा जगभरात आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मिती करणारा देश बनला आहे, त्याच बरोबर जागतिक चित्रपटाच्या नकाशावर भारतीय चित्रपटांना जवळपास सर्वच देशांमध्ये पुरेपूर प्रसिद्धी, आदर मिळतोय.

पण भारतीय चित्रपटसृष्टीला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे स्वप्न देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाहिले होते, हे फार कमी लोकांना माहीत आहे

पंडित नेहरूंनी देशासाठी औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आपण चर्चा करतो, पण त्याचसोबत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

नेहरूंचं चित्रपट सृष्टीतलं योगदान जाणून घ्यायला इतिहासात जायला लागेल…

पंडित नेहरूंनी भारतीय चित्रपटसृष्टीला जगभर पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याला कारणीभूत ठरते ते म्हणजे नेहरू स्वतः रसिक आहेत. त्यांना कला, संस्कृती आणि साहित्यात प्रचंड रस होता. 

देशाला स्वातंत्र्य मिळालं अन नेहरू आणि त्यांचे सहकारी देशाच्या उभारणीला लागले.  त्यांनी देशाची सूत्रे हाती घेताच चित्रपटसृष्टीचा विकास हा त्यांच्या प्राधान्यक्रमांपैकी एक बनला. 

याचा पहिला पुरावा म्हणजे त्यांनी चित्रपट चौकशी समिती स्थापन केली.

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दिशा देण्यासाठी नेहरूंनी २९ ऑगस्ट १९४९ रोजी “फिल्म इन्क्वायरी कमिटी” स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष एस. के. पाटील होते तर या कमिटीच्या सदस्यांमध्ये व्ही. शांताराम आणि बी.एन. सरकार असे चित्रपट क्षेत्रातील दोन मोठे व्यक्ती होते.  

या समितीचे सदस्य होण्या-दरम्यानच प्रभात फिल्म कंपनी आणि राजकमल मंदिर या दोन मोठ्या चित्रपट निर्मिती गृहांचे संस्थापक असलेल्या व्ही. शांताराम यांचे  ‘अयोध्याचा राजा’, ‘दुनिया न माने’, ‘आदमी’,‘पड़ोसी’, ‘शकुंतला’ ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’ या सारखे चित्रपट करून त्यांनी देश-विदेशात चांगलाच नावलौकिक मिळवला होता

तेच दुसरीकडे, बी.एन. सरकार हे बंगाली चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव होते, जे तत्कालीन प्रसिद्ध चित्रपट कंपनी न्यू थिएटर्सचे संस्थापक होते. थोडक्यात कमिटीचे सदस्य म्हणून पंडित नेहरूंनी पात्र असलेले अनुभवी चित्रपट निर्माते निवडले होते.

याच चित्रपट चौकशी समितीने २ वर्षांचा काळ घेऊन १९५१ मध्ये आपला अहवाल सरकारला सादर केला. 

ज्यामध्ये सेन्सॉर बोर्डाकडून सिनेमाची सुधारणा, भारतीय सिनेमांचा विकास आणि जगभरात भारतीय सिनेमा कसा पोहचवता येईल याबाबतच्या विविध सूचना देण्यात आल्या होत्या. 

त्यातील काही सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीचे चित्र झपाट्याने बदलू लागले. त्यामुळेच भारतीय चित्रपट सातासमुद्रापार पोहोचून विदेशी प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करू शकलेय.

२. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

पंडित नेहरूंना हे पक्कं समजलं होतं कि, भारतीय संस्कृती जगभर पोहोचावी आणि विविध देशांची संस्कृती भारतामधील लोकांना कळावी आणि यासाठी सिनेमा हे उत्तम माध्यम आहे.

त्यामुळे १९५२ मध्ये देशात ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ ही संस्था सुरू करण्यात आली. 

सन १९५२ पर्यंत, व्हेनिस, कान्स, लोकार्नो आणि कार्लोवी वारी या सारखे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जगभरात सुरु होते. पण तोपर्यंत आशिया खंडात एकही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला नव्हता.

हेच लक्षात घेऊन नेहरूंनी वैयक्तिक रस दाखवत १९५२ मध्ये २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला होता. सुरुवातीला तो मुंबईत पार पडला आणि त्यानंतर नंतर दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि त्रिवेंद्रम येथे हलवण्यात आला होता. 

या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २३ देशांतील ४० फीचर फिल्म्स आणि १०० शॉर्ट फिल्म्स दाखवण्यात आल्या होत्या. या फेस्टिव्हलमध्ये अमेरिका, यूके, सोव्हिएत युनियन, जपान आणि इटलीमधील चित्रपटही दाखवण्यात आले होते. तसेच १९६१ मध्ये जवळपास नऊ वर्षांनी नवी दिल्ली येथे फेस्टिव्हल आयोजित झाला. हे दोन्ही फिल्म फेस्टिव्हल स्पर्धात्मक नव्हते मात्र तिसरा फिल्म फेस्टिव्हल जानेवारी १९६५ मध्ये दिल्लीत झाला आणि तो स्पर्धात्मक झाला. 

त्यानंतर भारताचे फिल्म फेस्टिव्हल जगभरात गाजू लागले. २०२१ मध्ये ५२ वे फिल्म फेस्टिव्हल गोव्यात पार पडले.

या महोत्सवामुळे फायदा असा होतो कि, जगभरातील चित्रपट निर्मात्यांना जगभरातील चित्रपट एकाच ठिकाणी पाहता येतात. त्याचबरोबर सर्व चित्रपट निर्माते देखील एकाच व्यासपीठावर चित्रपटांवर चर्चा करू शकतात आणि त्यामुळे त्यांना एकमेकांकडून खूप काही शिकता येते आणि सर्वजण आपापले चित्रपट इतर देशांत दाखवून व्यावसायिक लाभही मिळवत असतात.

यावरून नेहरूंनी किती दूरदृष्टीने या सोहळ्याबद्दल विचार केला होता ते आज कळते.  

३. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 

पंडित नेहरूंनी १९५३ मध्ये “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची” स्थापना करून चांगल्या सिनेमाच्या प्रचारासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले. देशातील हा एकमेव चित्रपट पुरस्कार सोहळा आहे जिथे संपूर्ण भारतातील चित्रपटाची झलक पाहायला मिळते. तसेच कलाकारांना आणि निर्मात्यांना प्रसिद्धी आणि सन्मान मिळतो. तर इतर चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमध्ये एकतर हिंदी चित्रपट किंवा प्रादेशिक चित्रपट असतो. 

४. चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीची स्थापना.

नेहरूजींना मुलांवर खूप प्रेम होते. त्याच प्रेमाखातर त्यांनी १९५५ मध्ये मध्ये चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीची स्थापनाही केली, जेणेकरून मुलांसाठी चांगले चित्रपट बनवून त्यांच्यात चांगले संस्कार रुजवता येतील, त्यांना जीवनमूल्ये शिकवता येतील.

या समितीच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सर्वोत्कृष्ट बालचित्रपट देशाच्या कानाकोपऱ्यात निर्माण केले जात आहेत आणि प्रदर्शितही केले जात आहेत.

५. फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन

नेहरूंच्या नेतृत्वात १९६० च्या दरम्यान ‘फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन (FCC)’ चीही स्थापना झाली. आर्थिक अडचणींमुळे साकार होऊ न शकलेल्या चांगल्या आणि उद्देशपूर्ण पटकथा असलेल्या चित्रपटांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, अशी नेहरूंची इच्छा होती. १९६८ मध्ये FFC च्या धोरणात्मक निर्णयामुळे नवीन चित्रपट निर्मात्यांना चित्रपटांसाठी कर्ज मिळण्यास सुरुवात झाली. आणि आर्थिक अडचणी दूर झाल्यामुळे निर्मितीची साधने आमूलाग्र वाढवली गेली आणि बिगबजेट पिक्चर भारतात निर्मित होऊ लागले.  

६. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची स्थापना

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकारातून जी समिती स्थापन झाली होती त्या समितीने नेहरूंच्या जाण्यानंतरही आपले कार्य सुरु ठेवले. सिनेमाचे महत्त्व ओळखून केवळ त्याच्या गुणवत्ता वाढीकडेच लक्ष दिले नाही, तर त्याच्या विकासासाठी ज्या शिफारशी समितीकडून देण्यात आल्या त्याच आधारे १९७५ मध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची स्थापना झाली. 

१९८० मध्ये मध्ये फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन देखील चित्रपट विकास महामंडळात विलीन करण्यात आले. या महामंडळाच्या सहकार्याने आतापर्यंत कितीतरी चित्रपटांची निर्मिती शक्य झालीय. 

७. नॅशनल फिल्म म्युझियम ऑफ इंडियाची स्थापना 

आपल्या मृत्यूच्या सुमारे तीन महिने आधी पंडित नेहरूंनी फेब्रुवारी १९६४ मध्ये भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय उभारण्याचे स्वप्नही पूर्ण केले. त्यांनी स्थापन केलेले  नॅशनल फिल्म म्युझियम ऑफ इंडिया हे आजही भारतीयांना सिनेमाचे महत्त्व पटवून देत आहे.

८. फिल्म ॲंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII पुणे . 

नेहरूंनी १९६० मध्ये पुण्यात फिल्म आणि टीव्ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. नेहरूंचा असा उद्देश होता कि, महाराष्ट्रात चित्रपट क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना चित्रपटसृष्टीच्या विविध क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानासोबत चित्रपटसृष्टीच्या विविध पैलूंचे चांगले प्रबोधन करता येईल.

९. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा वारसा जपण्यासाठी आणि चित्रपट संशोधन इत्यादींना प्रोत्साहन देण्यासाठी नेहरूंनी पुण्यात भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय उभारून जे महान कार्य केले त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. फिल्म ॲंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेच्या प्रांगणात हे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आहे.

१०. नॅशनल फिल्म अर्काइव्हज् ऑफ इंडिया.

FTII संस्थेच्याच आवारात नॅशनल फिल्म अर्काइव्हज् ऑफ इंडियाचे कार्यालय आहे. या ठिकाणच्या फिल्मस व व्हिडीओ विद्यार्थांना उपलब्ध करून दिले जातात

११. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा

जवाहरलाल नेहरू यांनाही साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमीच्या स्थापनेदरम्यान स्वतंत्रपणे चित्रपट अकादमी स्थापन करायची होती. पण त्यानंतर त्यांनी एकीकडे संगीत नाटक अकादमी अंतर्गत १९५९ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना केली.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही जगातील अग्रगण्य थिएटर प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे आणि भारतातील अशा प्रकारची एकमेव संस्था आहे. पुढे जाऊन १९७५ मध्ये  ती एक स्वतंत्र संस्था बनली. या संस्थेला भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून पूर्ण अर्थसहाय्य दिले जाते. 

या शाळेमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण आणि सुनियोजित अभ्यासक्रम शिकवलं जातो. ज्यामध्ये थिएटरच्या प्रत्येक पैलूचा समावेश असतो.  नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या माध्यमातून आज चित्रपटसृष्टीला रंगभूमीसोबतच अनेक उत्कृष्ट कलाकार मिळाले आहेत.

नेहरूंनी सिने कलाकारांना महत्त्व दिले होते..

पंडित नेहरू अधूनमधून चित्रपट पाहत असत. त्यांना सिनेमा आणि सिने कलाकारांचे महत्त्व चांगलेच कळले. पृथ्वीराज कपूर, देविका राणी, चेतन आनंद आणि लता मंगेशकर यांच्यासह अनेक कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांना पंडित नेहरूंनी खूप आदर दिला. 

पहिल्यांदाच पंडित नेहरूंनी पृथ्वीराज कपूर यांना १९५२ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकित केले चित्रपटसृष्टीला राज्यसभेत स्थान दिले. 

फेब्रुवारी १९५५ च्या अकादमीच्या पहिल्या चित्रपट परिसंवादाच्या उद्घाटनाच्या वेळी नेहरूंनी एक स्वप्न पहिले होते, 

नेहरू म्हणाले- “मला भारतीय चित्रपटांसाठी एक उत्तम आणि भव्य भविष्य दिसत आहे. जगभरातील गर्दीच्या सिनेमागृहांमध्ये भारतीय चित्रपट दाखवले जातील. आपले हे चित्रपट केवळ आपल्या देशासाठी पैसाच कमावतील असं नाही तर सौंदर्य, चांगुलपणा आणि सत्याचा आदरही करतील. भारत जगासाठी चित्रपटसृष्टीत एक वेगळे आणि महत्त्वपूर्ण योगदान देईल याची मला खात्री आहे”.

त्या वेळी नेहरूंनी काय स्वप्न पाहिले होते त्यावर तेंव्हा कदाचित अनेकांना विश्वास ठेवायला कठीण गेलं असेल मात्र आज त्यांचं ते स्वप्न सत्यात उतरले आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा भारतातीय सिनेमांच्या विकासाबाबत बोललं जातं तेंव्हा तेंव्हा जवाहरलाल नेहरूंचे नाव निःसंशयपणे घ्यावंच लागेल.

भारतीय सिनेमा जगभर विस्तारण्यात आणि त्याचा विकास करण्यात नेहरूंचं ढीगभर योगदान आहे हे आम्ही थोडक्यात स्पष्ट करायचा प्रयत्न केला.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.