जावेद अख्तरची जादू.

जां निसार अख्तर एक मोठे शायर आणि सिनेगीतकार होते.  शायरी त्यांच्या रक्तात होती.  त्यांचे खापर पणजोबा फज्ल ए हक खैराबादी यांनी गालिबच्या शायरीचे संकलन केले होते. जां निसार अख्तर यांचे वडील देखील मोठे कवी होते. त्यांची बायको साफिया कविता करायची. मेहुणा मजाज लखनवी नावाजलेला शायर होता. हे सगळे स्वातंत्र्यापूर्वीच्या प्रोग्रेसिव रायटर्स मुव्हमेंट या चळवळीमुळे एकत्र आले होते.

 जां निसार अख्तर यांची एक शायरी खूप प्रसिद्ध होती.

” लम्हा किसी जादू का फसाना होगा”

त्यांनी आपल्या मुलाचं नाव देखील जादू ठेवलं. जादू म्हणजेच आघाडीचे गीतकार जावेद अख्तर. जादू लहानपणी खूप हुशार पण वांड होता. आपल्या मामा सारखी बंडखोरी त्याच्यात होती. घरात चोहोबाजूंनी  शायरी असल्यामुळे त्याच्यावरही शायरीचेच संस्कार झाले. चौदा पंधरा वर्षाचा असताना त्याला बाकीच्या शायरांची हजारो नज्मे पाठ होती.

पण जावेद अख्तरला शायर बनायचं नव्हत. 

कारण काय तर बंडखोरी. मास्तरच्या पोराला मास्तर व्हायला नको असते, दुकानदाराच्या पोराला गल्ल्यावर बसने नको असते तसेच शायरच्या या पोराला शायर व्हायचं नव्हत. शिवाय जादूचं वाचन चांगल असल्यामुळे त्याला चांगली  आणि वाईट शायरी कळत होती. त्यामुळे आपल्याला चांगलं लिहिता येईल की नाही या भीतीमुळे तो शायरी करायच्या फंदात पडायचा नाही. त्याला व्हायचं होत गुरुदत्तसारखा मोठा डायरेक्टर.

तारुण्याच्या जोशात तो मुंबईला आला. त्याचं आणि वडिलांचा छत्तीसचा आकडा.

बापाशी त्याचं काय वैर होत काय माहित? त्यांच नाव काढलं तरी त्याच तोंड वाईट व्हायचं. बापाच्या अपेक्षेला आपण उतरत नाही याची कुठे तर आत वेदना होती. त्यांना तो टाळायचा. गुरुदत्त यांचा असिस्टंट व्हायचं म्हणून तो आला खरा पण त्याच्या काहीच दिवसात गुरुदत्त गेले. जावेदला कळेनास झालं आता काय करायचं.

चिडक्या स्वभावामुळे छोट्या छोट्या गोष्टीमुळे भांडून घरातून निघून जायचा. तिथून त्याची स्वारी थेट जेष्ठ शायर साहीर लुधियानवी यांच्या घरी थडकायची. साहीर हे काही त्याच्या वयाचे नव्हते. ते खरं त्याच्या वडिलांचे दोस्त. पण साहीरचं आणि जादूची गट्टी चांगली जुळायची.

डोक्यात राख घालून आलेल्या जादूला शांत करणे साहीर साबनां व्यवस्थित जमायचं. साहीर नावाचा अर्थच होतो जादुगार.

साहीर लुधियानवी त्यावेळी प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यांना हा हजारो शायरी पाठ असलेला तरुण खूप आवडायचा.
सकाळ सकाळी जादू आपल्या घरी आला की त्याच्या चेहऱ्यावरून साहिरला कळायचं की आज जोरात वाजलं आहे. ते त्याला काहीच न बोलता नाश्ता करायला लावायचे. तो बडबड करून अखेर शांत व्हायचा.

साहीरला त्याने आपला बाप मानलं होत. त्यांच्याच घरात रात्रंदिवस पडून राहायचा. काही वेळा जां निसान अख्तर साहीरला भेटायला येणार असायचे. ते कळल्यावर जादू करदवायचा,

” ये बाप हर जगह हर वक्त क्यू? “

साहीर त्याला मुव्ही बघायला पैसे देऊन तिथून घालवायचे.

एकदा तो साहीर बरोबर सुद्धा भांडला.

“अपने मेरे बाप को थोडा ज्यादाही सर पे चढके रखा है.”

ते हसले. तेव्हा जादू म्हणाला,

“मेरा बाप भी मेरे उपर ऐसे ही हंसता है. तुम सब एक जैसे हो.”

आरडाओरडा करत तो तिथून निघून गेला.

कमाल अमरोहीच्या स्टुडीओचा प्रोडक्शन मनेजर त्याचा दोस्त होता. त्याच्या ओळखीवर अमरोहींच्या स्टुडीओच्या स्टोअर मध्ये रात्र काढायचा. तिथे वस्तू पडलेल्या असायच्या. यामध्येच मीनाकुमारी यांच्या दोन फिल्मफेअर ट्रॉफीसुद्धा होत्या.रात्री स्वप्न बघत जादू बेस्ट फिल्मसाठी ट्रॉफी स्वतःला द्यायचा. त्या स्टुडिओमध्ये बरेच दिवस काढले.

एक दिवस तो साहीर यांच्याकडे आला. अखेर अंगातल्या इगोला पोटातल्या भुकेने मारले.

साहिरनी त्याला पाहिलं. कित्येक दिवस व्यवस्थित जेवण अंघोळ केली नाही हे त्यांनी ओळखले. आधी त्याला अंघोळ करायला पाठवून दिल. तो जेव्हा बाहेर आला तेव्हा साहीर कुठे तरी जाण्याच्या तयारीत होते.

त्यांना माहित होत की जादूला पैसे लागणार पण तो मागणार नाही. त्यांनी ड्रेसिंग टेबलवर जावेदसाठी एक शंभरची नोट ठेवली होती. त्याकाळच्या मानाने ती खूप मोठी रक्कम होती. ते जादूला म्हणाले,

“ये पैसे रखले. मै तुझसे बाद मै ले लुंगा.”

पुढे जादूचा जावेद अख्तर झाला. तो सिनेमे लिहू लागला.

javed akhtar and salim khan 1

सलीम जावेद या जोडीने शोले दिवार असे अनेक जबरदस्त पिक्चर लिहिले. लाखो पैसे कमावले. सुपरहिरो बच्चन पेक्षा जास्त मानधन सलीम जावेद जोडी घ्यायची. पण जावेदने ते शंभर रुपये परत केले नाहीत. कधी साहीर साब भेटले तर तो त्यांना त्या नोटेची आठवण करून द्यायचा. तेव्हा ते त्याला गंमतीने  म्हणायचे,

” वो तो मै तुमसे निकलवा के रहूंगा.बेटा..”

एकदा साहीर एका मित्राची तब्येत बिघडली होती म्हणून त्याला भेटायला गेले. मात्र त्याची चौकशी करत असताना त्यांनाच हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टर आले तो पर्यंत साहीर जग सोडून निघून गेले होते.

त्यांच्या जवळच्या लोकांना निरोप देण्यात आले. सगळ्यात आधी जावेद अख्तर तिथे येऊन पोहचला. त्याच्या जवळ ड्रायव्हर नसल्यामुळे तो टॅक्सी घेऊन आला होता. साहीर ना पाहताच त्याचा बांध फुटला. त्यांच्या निश्चल देहाला गळ्याशी धरून तो आयुष्यभराचं रडून घेत होता.

जावेदने साहीरचा देह त्याच टॅक्सी मध्ये घालून तो त्यांच्या “परछांईयां” या घरी  घेऊन आला. रात्रीचे एक वाजले होते. तो एकटाच तिथे होता. सकाळी शेजारी पाजारी गोळा झाले. इतर लोकही येऊ लागले. जावेद मयताच्या तयारी करू लागला.

त्यावेळी त्याला टॅक्सी ड्रायव्हर अजून तिथेच चूपचाप उभा असलेला दिसला.  जावेदला त्याला पाहताच आठवल की त्याचे पैसे दिलेले नाही आहेत. जावेदने खिशात पाहिले, शंभरची नोट होती. त्याने ती नोट त्या टॅक्सीवाल्याला दिली आणि ओक्साबोक्सी रडू लागला. रडता रडता आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाला,

“ये लो… रखो सौ रुपए. मर के भी निकलवा लिये रुपए अपने!”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.