या माणसाने दिलेला जय भीमचा नारा दलित उद्धाराचा जीवनमंत्र बनला

आज महापरिनिर्वाणदिन. भारतभरातील आंबेडकरी जनता जेव्हा एकमेकांना भेटते तेव्हा एकच आवाज घुमत असतो ” जय भीम” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक असणाऱ्या प्रत्येकासाठी हे दोन शब्द म्हणजे साधी घोषणा नाही तर ते जीवनमंत्र आहे.

दिनदलितांना पायदळी तुडविणाऱ्या अमानुष रूढींविरुद्ध क्रांती पेटवणारे हे दोन शब्द. समस्त आंबेडकरी जनतेला एकत्र बांधून ठेवणारा हा धागा कोणी बनवला हा प्रश्न अनेकांना पडत असतो.

या घोषणेची निर्मिती केली होती बाबू हरदास एल. एन. म्हणजेच हरदास लक्ष्मण नगराळे यांनी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निष्ठावंत सेवक असलेल्या या वीरपुरुषाचा जन्म नागपूरपासून १५ कि.मी. अंतरावर सैनिकी छावणी असलेल्या कामठी शहरात ६ जानेवारी १९०४ रोजी झाला.

त्यांचे वडील रेल्वे खात्यात होते पण घरची परिस्थिती गरिबीचीच होती. बाबू हरदास मुळातच हुशार होते. गावातल्याच प्राथमिक शाळेत शिकत असताना अस्पृश्यतेच्या प्रथेमुळे त्याकाळी वर्गाच्या दाराजवळ बसून शिक्षण घ्यावे लागले.

या विषमतेविरुद्ध आपण कठोर संघर्ष केला पाहिजे ही भावना त्यांना याच वयात जागी झाली.

पुढे हायस्कुलचे शिक्षण घेण्यासाठी नागपूरला आले मात्र याच काळात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. कुटुंबाचा मुख्य आधार गेल्या मुळे अगदी लहान वयात बाबू हरदास यांच्यावर मोठी जबाबदारी पडली. शिक्षण निम्म्यात सोडावे लागले.

बाबू हरदास स्वतःच्या पायावर उभे राहिले पण सोबतच आपल्या समाज बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी कार्य सुरू केले.

अवघ्या सतराव्या वर्षी महाराठ्ठ नावाचे साप्ताहिक सुरू करून सामाजिक चळवळीत उडी घेतली. कामठी येथे रात्र शाळा सुरू केली. गावात सामूहिक सहभोजन घडवून आणले. मंडल महात्मे हा ग्रंथ लिहिला.

याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उदय होत होता.

हा महामानव दलितांच्या उध्दारासाठी, आर्थिक, सामाजिक विकासासाठी झगडतो आहे या बातम्या नागपुरात येऊन पोहचल्या होत्या. त्यावेळी नागपूरच्या परिसरात अनेक कार्यकर्ते जे आपल्या अल्प शक्तीनुसार कार्य करीत होते ते सर्व एकवटले.

बाबू हरदास यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अ.भा. अस्पृश्य परिषद भरवली. ही परिषद प्रचंड यशस्वी ठरली. बाबासाहेबांचे नेतृत्व सर्वमान्य आहे हे नागपूरमधल्या या परिषदेने संपूर्ण जगापर्यंत पोहचवले.

बाबू हरदास यांनी आंबेडकरांचे विचार आपल्या ‘महारट्ठा’ या साप्ताहिकातून प्रसारित करण्यास सुरुवात केली. त्यांची लेखणी जहाल होती. अल्पावधीतच हे साप्ताहिक तत्कालीन अस्पृश्य वर्गात कमालीचे लोकप्रिय झाले.

१९३२ साली दुसरी गोलमेज परिषद भरत होती तेव्हा भारतातून सर्व पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते तेव्हा ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनॉल्ड यांनी ‘भारतातील अस्पृश्यांचा पुढारी कोण?’ असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा महात्मा गांधी या परिषदेला जाणार होते, तेच दलितांसकट संपूर्ण देशाचा नेता आहेत असा दावा केला गेला.

मात्र बाबू हरदास व चळवळीतल्या नेत्यांनी ‘दलितांचे प्रश्न मांडण्यासाठी दलितांच्याच रक्ताचा नेता पाहिजे आणि तो म्हणजे डॉ. आंबेडकर!’ अशी भूमिका घेतली.

फक्त इतक्यावरच ते थांबले नाहीत तर इंग्लंडच्या पंतप्रधानांना अनेक तारा पाठवल्या. बाबू हरदास यांनी ३२ वेळा पत्रव्यवहार केला तेव्हा पंतप्रधानांना मानावे लागले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गोलमेज परिषदेचे निमंत्रण आले.

‘जेव्हा अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देणार नाही’ असा गांधींनी हट्ट धरला तेव्हा बाबासाहेबांनी बाबू हरदास यांना कामठी येथे एक परिषद बोलाविण्यास सांगितले. १९३२ साली कामठी येथे ही परिषद मुन्नास्वामी पिल्ले (मद्रास) यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. बाबू हरदास हे त्यावेळी स्वागताध्यक्ष होते. तेथे ‘अल्पसंख्याक जमात करार’ पास झाला.

याच प्रयत्नाचा परिणाम म्हणून पुढे पुणे करार झाला व अस्पृश्यांना स्वतंत्र जागा प्राप्त झाल्या.

बाबू हरदास यांनी कामठीतील बिडी कामगारांना न्याय्य हक्क मिळविण्यासाठी कामगार संघटना उभारली. या संगटनेने १९३२ साली एक मोठा सत्याग्रह केला. हजारो मजूर यात सहभागी झाले होते. ‘बिडी मजदूर संघटना’ रजिस्टर करण्यात आली.

चळवळीत काम करत असताना बाबू हरदास यांनी निरिक्षण केले की मुस्लिम कार्यकर्ते एकमेकांना ‘अस्सलाम-अलेकुम’ व ‘अलेकुम-अस्सलाम’ असे अभिवादन करायचे.

मुस्लिम बांधवांप्रमाणे आपणसुद्धा एकमेकांना अभिवादन केले पाहिजे हा विचार बाबू हरदास यांच्या मनात आला.

त्यावेळी त्यांनी ठरवले की आपण ‘जय भीम’ बोलून एकमेकांना अभिवादन करू. आपल्या संघटनेतील कामगारांना त्यांनी ही कल्पना सांगितली,

मी ‘जय भीम’ बोलेन आणि तुम्ही ‘बल भीम’ म्हणा. तेव्हापासून हे अभिवादन सुरू झाले.

तथापि, नंतर ‘बल भीम’ हा शब्द गाळला गेला, केवळ ‘जय भीम’ प्रचलित राहिले. तेव्हापासून आजपर्यंत ‘जय भीम’ अभिवादन सुरू आहे.

१९३३-३४ मध्ये बाबू हरदास यांनी नागपूरमधील समता सैनिक दलाला ‘जय भीम’ ची घोषणा दिली. अशा प्रकारे सर्वत्र ‘जय भीम’ नारा सुरू झाला.

पुढे जेव्हा डॉ. आंबेडकरांनी १९३७ साली ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन केला. तेव्हा नागपूरला बाबू हरदास यांची कार्यवाहपदी त्यांनी निवड केली. या पक्षाच्या वतीने प्रांतिक असेम्बलीची निवडणूक लढविण्यात आली. त्यात बाबू हरदास यांच्यासह चौदांपैकी सात उमेदवार विजयी झाले.

आमदार म्हणून देखील त्यांनी अस्पृश्यांच्या विकासासाठी बराच प्रयत्न केला.

पण दुर्दैवाने बाबू हरदास यांचे १९४० साली वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी निधन झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दलित चळवळीतला हा धडाडीचा कार्यकर्ता हरपला हे ऐकून अतीव दुःख झाले.

बाबू हरदास यांना अल्पायुष्य लाभले पण त्यांनी दिलेली जय भीम ही घोषणा प्रत्येक दलित बांधवांच्या मनात अजरामर राहिली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.