आणि अशा रीतीने जय शहा यांनी बीसीसीआयवर आपलं साम्राज्य स्थापन केलं.

जय अमित शहा. भारतातील सर्वात दोन नंबरच्या पॉवरफुल व्यक्तीचे एकुलते एक चिरंजीव. कधी आपल्या बिझनेस मध्ये एका वर्षात ५ कोटींचे ८०कोटी  करणारे जादूगर म्हणून त्यांना ओळखलं जातं तर कधी भाजपच्या राजकारणाचा भावी चेहरा म्हणून म्हणून त्यांच्या कडे पाहिलं जातं.

पण वडिलांचा सध्या देशभरात कितीही दबदबा असला तरी जय भाई राजकीय पिचवर बॅटिंग करताना दिसत नाहीत. ते आपल्या वडिलांचा वारसा राजकारणात चालवण्या ऐवजी क्रिकेटच्या प्रशासनात आपलं साम्राज्य स्थापन करताना दिसत आहेत.

बीसीसीआयचे ते सचिव तर आहेतच पण आशिया क्रिकेट कौन्सिलचे ते अध्यक्ष बनले आहेत. अशावेळी प्रश्न पडतो की या युवराजांना क्रिकेटची आवड कधी पासून लागली ?

२ सप्टेंबर १९८८ रोजी अमित शहा आणि सोनल शहा या दाम्पत्याच्या पदरी या पुत्ररत्नाचा जन्म झाला. त्यांचे फॅमिली मेम्बर सांगतात की जय शहा लहानपणापासून लाजाळू होते. मात्र अभ्यासात आणि खेळात प्रचंड उत्साही. नव्वदच्या दशकात सचिन गांगुली यांनी शेन वॉर्नची केलेली पिटाई बघत ते मोठे झाले.

लहानपणी प्रत्येकाला पडत तसं मोठा झाल्यावर क्रिकेटर व्हायचं स्वप्न जय शहाला देखील पडायचं. घरच्यांच्या मागे लागून त्यांनी अहमदाबादचे फेमस क्रिकेट कोच जयेंद्र सहगल यांच्या समर कॅम्पमध्ये नाव नोंदवलं होतं. तिथल्या लॉयला हॉल जवळच्या ग्राउंडवर हा कॅम्प भरायचा. इतर पालकांप्रमाणे आपल्या मुलाला सकाळी प्रॅक्टिससाठी सोडायला स्वतः अमित शहा यायचे.

जयेंद्र सेहगल सांगतात की,

“जय शहा एक चांगला बॅट्समन होता. जर त्याने क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केलं असतं तर त्याचं भविष्य उज्वल होतं.” 

तस बघायला गेलं तर गुजरातच्या राजकारणात अजून अमित शहा हे आपले पाय मजबूत करत होते. अहमदाबाद मध्ये त्यांचं चांगलंच वजन निर्माण झालेलं. अमितभाई तेव्हा देखील नरेंद्र मोदी यांचे सर्वात विश्वासू म्हणून ओळखले जायचे. दोघांनी मिळून गुजरातच्या कानाकोपऱ्यात भाजपाला पोहचवण्याचं काम केलं होतं. राम रथ यात्रेच्या नियोजनामुळे या दोघांचं नाव भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर पोहचलेलं.

अमित शहा यांच्यामुळे जय शहा यांच्या भोवती शाळा कॉलेजमध्ये देखील एक मोठं वलय असायचं.

पुढे २००१ साली नरेंद्र मोदी जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा अमित शहा सुद्धा गुजरातच्या मंत्रिमंडळात आले. सर्वात तरुण असूनही नरेंद्र मोदींनी त्यांच्याकडे तब्बल १२ मंत्रीपदे सोपवली होती. गुजरात दंगलीच्या वेळी टीका होत असताना मोदींच्या पाठीशी राहणारे हे अमित शहाच होते.

या सगळ्या घडामोडी घडत होत्या आणि जय शहा यांचा इंटरेस्ट क्रिकेटवरून कमी झाला. ग्राउंडवर खेळण्यापेक्षा स्टॉक मार्केट वर खेळण्यात ते बिझी राहू लागले. इंजिनियरिंग साठी अहमदाबादच्याच निरमा विद्यापीठात प्रवेश घेतला होता.

शिक्षण सुरु होतं पण सोबतच वडिलोपार्जित पीव्हीसी पाईपच्या व्यवसायात देखील जय शहा लक्ष घालत होते. याच काळात त्यांनी टेम्पल एन्टरप्राइजेस या कंपनीची स्थापना केली होती ज्याच्या वरून पुढे काही वाद झाले. असो तो विषय वेगळा.

साधारण २००९ साली गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र भाई मोदींनी आपल्या राज्याच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. त्यांनी मनात आणलं आणि लगेच ते गुजरातच्या क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष देखील बनले. आता जिथे जिथे नरेंद्र भाई तिथे तिथे त्यांच्या मदतीला अमितभाई या नियमाप्रमाणे गुजरात क्रिकेट मध्ये देखील या जोडगोळीला प्रवेश झाला.

अमित शहा यांनी गुजरात क्रिकेटच्या कारभारात मदतीसाठी म्हणून जय शहा यांच्याकडे विचारणा केली. क्रिकेटचा अनुभव आणि आवड असल्यामुळे जय भाई गुजरात क्रिकेट असोशिएशनची जबाबदारी सांभाळण्यास तयार झाले.

फक्त २१ वर्षाचे जय शहा जीसीएचे एक्झिक्युटिव्ह मेम्बर बनले.

मध्यंतरी जेव्हा अमित शाह यांच्यावर काही कोर्ट केसेस झाल्या, त्यांच्यावर तडीपारीची आदेश आले तेव्हा आपला इंजिनियरिंगचा अभ्यास मागे ठेवून जय शहा यांनी वकीलांच्या मदतीने अमित शहा यांचा लढा लढला. त्यात ते यशस्वी देखील झाले. आजही अमित शहा ते दिवस आठवून आपल्या मुलाच्या प्रति भावनिक होतात.

5da420bc200000580750079f

२०१३ साली जय शहा यांची गुजरात क्रिकेट असोशिएशनच्या जॉईंट सेक्रेटरीपदी निवड झाली. त्या वेळी त्यांच नाव पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले. विरोधकांनी जोरदार टीका केली नाही असं नाही पण गुजरात असोशिएशनचे लोक मात्र खुश होते. त्यांची नेमणूक झाली त्याच दिवशी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेची ट्रॉफी गुजरातने जिंकली. काही जणांचं म्हणणं होतं कि

हा जय अमित शहा यांचा चांगला पायगुण होता म्हणून आपल्याला हा विजय मिळाला. म्हणूनच त्यांची निवड सार्थ आहे, गुजरात क्रिकेट त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच करत राहणार.

पुढच्याच वर्षी देशभरात मोदी लाट आली आणि नरेंद्रभाई देशाचे पंतप्रधान बनले. गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडताना त्यांनी क्रिकेट असोसिएशनची देखील जबाबदारी सोडली. त्यांच्यानंतर अमित भाई जीसीएचे अध्यक्ष बनले. आजही तेच अध्यक्ष आहेत. पण भाजपचे अध्यक्ष पद, पंतप्रधानांना राजकारणात लागणारी मदत यामुळे अमित शहा यांना क्रिकेट असोशिएशनकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता.

तिथून पुढे जय शहा गुजरात क्रिकेटचे सर्वेसर्वा बनले.

२०१५ साली बीसीसीआय च्या फायनान्स आणि मार्केटिंग कमिटीमध्ये त्यांची निवड झाली. याच वर्षी आपली लहानपणापासूनची मैत्रीण रिषिता पटेल हिच्याशी धडाक्यात लग्न केलं. रिषिताचे वडील अहमदाबादचे मोठे बिझनेसमन म्हणून ओळखले जातात. दोघांचे लव्ह मॅरेज असल्याची चर्चा तेव्हा जोरात होती. नरेंद्र मोदींच्यापासून कित्येक दिग्गज नेते या शाही विवाह सोहळ्यास उपस्थित होते.

पुढच्या दोनच वर्षात जय शहा टेम्पल कंपनीच्या वादात अडकले. अगदी राहुल गांधींच्या पर्यंत त्यांच्यावर टीका झाली. जय शहा यांनी तर हि बातमी टाकणाऱ्या वृत्त संस्थेवर १०० कोटींचा मानहानीचा दावाच ठोकला. या प्रकरणातून काही निष्पन्न झाले नाही. जय शहा सहीसलामत आरोपातून बाहेर आले.

२०१९ साली त्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनचा राजीनामा दिला. अनेकांना वाटलं की जय शहा राजकारणात उतरतात कि काय पण झालं उलटच. जय शहा हे बीसीसीआयच्या निवडणुकीत उतरले. जिंकायचा वडिलांचा गुण होताच. या विजयामुळे ते बीसीसीआयचे सर्वात तरुण सेक्रेटरी  बनले. त्याच्याबरोबर भारतचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष बनला.

जेव्हा जय शहा यांच्यावर ते अमित शहा यांचे सुपुत्र असल्यामुळे बीसीसीआयचे सेक्रेटरी बनलेत अशी चोहोबाजूनी टीका झाली तेव्हा त्यांची बाजू मांडण्यासाठी खुद्द गांगुली समोर आला. त्याने मीडियाला सांगितलं,

“‘क्‍या सचिन के बेटे को खेलने से इसलिए रोका जाए क्‍योंकि वह क्‍योंकि वह तेंदुलकर के बेटे हैं. ऐसा ऑस्‍ट्रेलिया में नहीं होता है, इंग्‍लैंड में नहीं होता. मार्क वॉ, स्‍टीव वॉ ऑस्‍ट्रेलिया के लिए खेले. वे दोनों भाई थे और दोनों ने 100 टेस्‍ट खेले थे. इंग्‍लैंड के लिए टॉम कर्रन और सैम कर्रन खेल रहे हैं. प्रत्‍येक व्‍यक्ति को अलग तरह से जज किया जाना चाहिए.”

गांगुलीने त्यांच्या मेहनती असण्याबद्दल आणि बीसीसीआयचे काम उत्कृष्ट पद्धतीने करत असल्याबद्दल जय शहा यांच तोंडभरून कौतुक केलं. यापूर्वी देखील शरद पवार, अरुण जेटली, माधवराव सिंधिया असे राजकारणी क्रिकेटमध्ये आले आहेत तर जय शहा का नको असा सवाल त्याने मीडियाला विचारलाय.

गेल्या काही काळापासून गांगुली आजारी असल्यामुळे बीसीसीआयचा हंगामी कारभार जय शहा यांच्याकडेच आहे.

नुकतंच जय शहा यांनी थेट आशियाच्या क्रिकेटचे अध्यक्षपद स्विकारलं. फक्त ३२ वर्षाच्या वयात या पदावर त्यांची निवड होणे ही फक्त शहा यांच्या साठीच नाही तर अख्ख्या देशाच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

नाही म्हणायला मुलीला निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही म्हणून भडकलेले नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्यासारखे लोक आजही जयभाईंवर घराणेशाहीचा आरोप करतात मात्र वडिलांच्याप्रमाणे जय शहा देखील टीकाकारांकडे लक्ष देण्यापेक्षा आपले कार्य करण्यावर विश्वास ठेवतात हे नक्की. त्यांचं क्रिकेटमधील साम्राज्य उत्तरोत्तर वाढतच जाईल अशीच सध्या चिन्हे आहेत.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.