हातात अर्थसंकल्पाची बॅग घेतलेले जयंतराव व्हीलचेयरवरून विधानभवनात अवतरले.

२००१ सालचा फेब्रुवारी महिना होता.

पुटटापर्थीवरून बँगलोरकडे येणाऱ्या रस्त्यावर एक लाल दिव्याची पांढरी ९९९९ क्रमांकाची अॅम्बॅसॅडोर गाडी येत होती. त्यात मागे बसलेले महाराष्ट्राचे आत्तापर्यंतचे सर्वात तरुण अर्थमंत्री जयंत पाटील. वय अवघं ३८. येत्या दोन महिन्यांत अर्थसंकल्प सादर करायचा होता अन राज्य प्रचंड आर्थिक संकटांमध्ये होतं. कठोर उपयायोजना केल्या तरच राज्याची आर्थिक स्थिती दुरुस्त होऊ शकत होती.

दुपारी दोन अडीचच्या सुमारास ओव्हरटेक करत असताना समोरून एक ट्रक अचानक आल्याने दोन गाड्यांची अगदी ‘हेड ऑन’ धडक झाली. जयंत पाटील मागे बसलेले, दुपारची वेळ असल्याने थोडीशी डुलकी लागलेली. काही कळायच्या आत हा मोठा अपघात घडला.

लाल दिव्याची गाडी दिसल्याने आजूबाजूचे गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले. गाडीतून त्यांना काढताना प्रचंड वेदना होत होत्या. गाडीतून काढल्यावर मात्र ते लगेच बेशुद्ध पडले. दोन्ही पायांना प्रचंड इजा, डोक्यालाही चांगलाच मार लागला होता.

त्या ठिकाणी अॅम्ब्यूलन्स मिळण्याची शकयता तशीही नव्हतीच. तिथेच मिळालेल्या दोन्ही बाजूनी उघड्या असणाऱ्या टॅम्पोत जयंतरावांना टाकून बंगलोर कडे नेलं गेलं. समोर बसलेल्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डलाही या अपघातात जबरदस्त मार लागलेला ड्रायव्हरच्या छातीला इजा झाली तर बॉडीगार्डच्या गुडघ्याच्या वाटीचा अक्षरशः चुराडा झाला. जयंतरावांच्या दोन्ही मांड्यांची हाडे मोडली होती, त्यामुळे प्रचंड वेदना त्यांना होत होत्या.

बँगलोरच्या मल्ल्या हॉस्पिटल मध्ये त्यांना आणण्यात आलं. तोवर ते शुद्धीवर आले होते, शुद्धीवर आल्या आल्या त्यांनी त्यांच्या पत्नीला, मोठ्या भावाला स्वतःहून फोन करून घडलेली घटना सांगितली,

“तुम्ही इकडे निघून या पण काय झालंय हे आईला आत्ता लगेच सांगू नका’”

शुद्धीवर आल्यावरही जयंतराव, ‘माझा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर कसे आहेत ?’ याचीच वारंवार विचारणा करत होते. ऑपरेशन पार पडल्यावर मात्र अक्षरशः हजारो माणसं त्यांना भेटायला बंगलोरमध्ये यायला लागली, अनेक लोकांना भेटल्याने जयंतरावांना इन्फेक्शन झालं आणि त्यातूनच त्यांचा ताप प्रचंड वाढू लागला.

तिथून त्यांना मुंबईला आणण्यात आलं. प्रचंड वेदना होत असताना तो प्रवासही त्यांना मूकपणे सहन केला.

इकडे सारा वाळवा तालुका मात्र सुन्न झाला होता. वाळव्यातील घराघरात रोजच ‘सायबांची तब्येत कशी आहे’ याच्या चर्चा झडत होत्या. जयंत पाटलांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचं मनापासून प्रेम असलेल्या ‘सायबांना’ भेटायचं होतं.

मुंबईला आल्या आल्या डॉ. उद्वाडिया नावाच्या ब्रीच कॅन्डीच्या डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि स्पष्ट शब्दांत सांगितलं,

“तुम्ही लगेच अॅडमीट झाला नाहीत तर तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही”

घरात येऊन दोन तास होत नाहीत तोवर त्यांना पुन्हा लगेच ब्रीच कॅन्डीला अॅडमिट करावं लागलं. इन्फेक्शन झाल्याने ताप वाढत होता, ब्रीच कॅन्डीमध्ये डॉ. संगीत गव्हाणे नावाच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा जयंतरावांच ऑपरेशन केलं. टाके घातलेल्या सर्व जखमा पुन्हा एकदा खोलून हे ऑपेरेशन करावं लागणार होतं.

या काळात वेदना असह्य होत असायच्या. जयंतराव त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचे. त्याची विचारपूस करायचे. वारंवार त्यांच्यावर अँटीबायोटिकचा प्रचंड मारा सुरु असायचा. जयंतरावांचं सारं कुटुंब या काळात त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. त्यांच्या आईचा त्यांच्यावर आणि त्यांचा त्यांच्या आईवर स्वतःपेक्षाही जास्त जीव ! आई अनेकदा त्यांच्या डोक्याला, पायाला तेल लावून द्यायची.

हे सारं घडत असताना दुसरीकडे अर्थसंकल्पाची तयारी सुरु होती.  आयुष्यातील एवढ्या प्रचंड वेदनेच्या काळात जयंतराव हॉस्पिटलमध्ये प्रत्येक फाईल मागवायचे आणि ती वाचून ते सही करायचे. वेदना असह्य होत असल्याने डॉक्टरांना मधून अधून येऊन इंजेक्शन द्यावं लागायचं.

अर्थ आणि नियोजन खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी हॉस्पिटलमध्येच बोलवून घेऊन बजेटविषयी सूचना द्यायला सुरुवात केली. स्वतः सगळी माहिती ते वाचून काढायला लागले. मधल्या काळात उपमुख्यमंत्री असलेल्या छगन भुजबळांनी येऊन धीर दिला आणि अगदी निक्षून सांगितलं,

‘जयंत, तू बजेट मांडणार आहेस’

त्यावेळी तो धीर जयंतरावांसाठी मोठा होता.

अर्थसंकल्पाचा दिवस उजाडल्यावर जोधपुरी घातलेले आणि हातात अर्थसंकल्पाची बॅग घेतलेले जयंतराव व्हीलचेयरवरून विधानभवनात अवतरले ! त्यांच्या एका हाताला जोधपुरीच्या आतून सलाईन लावलेलं होतं आणि दुसरीकडे अँटीबायोटिकची सुई टोचली होती. अर्थात, ते कोणालाही दिसत नव्हतं.पायही प्रचंड सुजलेले होते. जयंतरावांची व्हीलचेयर त्यांच्या नेहमीच्या बसण्याच्या स्थानापर्यंत जावी याची व्यवस्था स्वतः मुख्यमंत्री विलासराव आणि उपमुख्यमंत्री असलेल्या भुजबळांनी पाहिली होती.  

प्रचंड वेदना होत असताना चेहऱ्यावर काहीही न दाखवता जयंतरावांनी तो अर्थसंकल्प मांडला. राज्य प्रचंड आर्थिक संकटात असल्याने अत्यंत कठोर उपाययोजना त्यात केल्या होत्या, लोकानुनयी घोषणा टाळल्या होत्या. पण अत्यंत योग्य अशा या अर्थसंकल्पाचं राज्यातील सर्व वर्गांनी स्वागत केलं. प्रसारमाध्यमांनी जयंतराव आणि त्यांच्या अर्थसंकल्पावर रकानेच्या रकाने भरून लिहिलं.

अर्थसंकल्प मांडून झाल्यावर संपूर्ण सभागृहाने जयंतरावांना दाद तर दिलीच, पण सारं सभागृह त्यांच्या भोवती गोळा होऊन त्याचं अभिनंदन करू लागलं. अभिनंदन करताना लोक हातात हात घेत होते आणि हात दाबल्याने जयंतरावांच्या वेदना वाढत  होत्या, चेहऱ्यावर कोणतीही वेदना न दाखवण्याचा त्यांचा स्वभाव तेव्हाही कायम होताच. अर्थसंकल्प मांडून घरी आल्यावर मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी होतं !

हॉस्पिटल मध्ये तयार झालेलं आणि व्हीलचेयरवरून मांडलेलं हे देशातील पहिलच बजेट !

पुढे जयंतराव व्हीलचेयर वरूनच मंत्रालयात जाऊ लागले, हळूहळू काठीवर चालू लागले आणि त्यानंतर काठीशिवाय चालू लागले, तेव्हा चालू लागलेले जयंतराव अजूनही चालत अन पळत आहेतच. एवढा मोठा अपघात होऊन त्यांचा प्रवास कमी झालेला नाही. उलट तो वाढतच आहे.

अशा या हरहुन्नरी नेत्याचा आज  ५७ वा वाढदिवस, आपल्या सत्तावनाव्या वाढदिवशी त्यांना हार्वर्ड मध्ये भाषणाला बोलावलंय आणि तुम्ही हा लेख वाचत असताना जयंतराव हार्वर्डमध्ये जगभरातील विद्वानांसमोर भाषण देत असतील !

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.