हिशोबाला पक्के “जयंत पाटील”

यंदा जयंत पाटलांना अस्मान दाखवायचं म्हणून विरोधकांनी कंबर कसलेली. वैभव नायकवडी रोड रोलर घेवूनच मैदानात उतरलेलं. शिट धोक्यात वाटत्या म्हणून गावागावात पैजा लागायला चालू झालत्या. मुळात जयंत पाटलांच्या विरोधात पैजा लागणंच टेन्शन वाढवणारी गोष्ट होती. अशात राजू शेट्टी नावाचं वादळ नव्यानं धूरळा उडवत होतं. राजू शेट्टींनी वैभव नायकवडींच्यासाठी सभा घेतली. शेट्टींनी वैभव नायकवडींचा हात हातात घेतलां आणि गर्जना केली,

“ह्या दाढ्याचं प्रस्थापितांच थडगं बांधल्याशिवाय राहणार नाहीत..”

निकालं लागलां. नेहमीप्रमाणे जयंत पाटील निवडून आले. त्यानंतर पुलाखालनं बरच पाणी गेलं. परवाचं राजू शेट्टी आणि जयंत पाटील एकाच गाडीतून फिरले. एका अर्थानं जयंत पाटलांनी राजकारणाचा हिशोब चुकता केला. पण हिशोब चुकता करण्याची हि पहिली वेळ नव्हती. जयंत पाटील कसा हिशोब चुकता करतात हे संपुर्ण सांगली जिल्ह्यानं दहा वर्षांपुर्वीच पाहिलं होतं. पण हा हिशोब सांगण्यासाठी आपणाला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल.

राजारामबापू आणि वसंतदादा हा वाद पुर्ण महाराष्ट्राच्या परिचयाचा. या वादातून राजारामबापूंच्या विरोधात सर्वसामान्य समजल्या जाणाऱ्या विलासराव शिंदेना ताकद देण्याचं काम वसंतदादांनी केलं. राजारामबापू निवडणूकीत पडले. एका पिढीनंतर जयंत पाटील हे माननीय जयंत पाटील झाले होते. पतंगराव आणि आर.आर आबा यांच्या राजकारणात स्वत:च नाणं खणखणीत वाजवाय सुरवात झाली होती. पण या सगळ्यात कुठतरी बापाच्या पराभवाचा वचपा काढायचं शिल्लक राहिलं असावं. जयंत पाटलांनी सांगली महानगर पालिकेत लक्ष घातलं. स्वत: चौकाचौकात खुर्च्या टाकून सभा घ्यायला सुरवात केली. आणि सांगली महानगर पालिका दादा घराण्याच्या ताब्यातून हिसकावून घेतली. एकेकाळचां हिशोब जयंत पाटलांनी जिल्ह्याचा नेता होवूनच पुर्ण केला.

राजकारणाचा हिशोब जयंत पाटलांना चांगला जमतो पण प्रशासनाचा हिशोब पण या माणसानं तितक्याचं ताकदिनं पेललां आहे. संपुर्ण महाराष्ट्राच्या हे लक्षात आलं ते जयंत पाटलांनी व्हिलचेअरवर बसून अर्थसंकल्प मांडला तेव्हा. २००१ सालच्या सुरवातील जयंत पाटील तिरूपतीला गेले होते. तसे ते सत्यसाईबाबांचे भक्त. सत्यसाईबाबा आणि बालाजी असं एकत्रित दर्शन घेवून साहेबांची गाडी महाराष्ट्राच्या दिशेनं येवू लागली. तोच पुटपुर्थीच्या दरम्यान जयंत पाटलांचा अॅक्सीडेंट झाला. जीवावर आलेल्या या धक्यातून जयंत पाटील बचावले पण गावागावात अफवांनी जोर पकडला. अॅक्सीडेंट देखील तसाच होता. याच काळात त्यांना अर्थमंत्री म्हणून विधानसभेत अर्थसंकल्प सादर करायचा होता. गंभीर असणाऱ्या जयंत पाटलांनी हा हिशोब देखील पाठीमागं ठेवला नाही. ते व्हिलचेअरवरुन मंत्रालयात आले आणि अर्थसंकल्प जाहिर केला…

असा हा हिशोबाला पक्का असणारा नदिकाठचा माणूस. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले म्हणून इस्लामपूरच्या मित्राला फोन केला आणि म्हणालो, “अरे तुमचे साहेब आत्ता हिशोब चुकता करतील का ? तर तो म्हणला, ” आमच्या सायबांनी दूष्काळ पडल्यावं कृत्रिम पाऊस पाडून ढगांचा हिशोब चुकता केलाय तर भाजप काय जिझए.”

असो येणाऱ्या दिवसात कोण कुणाचं हिशोब चुकतं करतय ते समजेलच तुर्तास जयंत पाटलांना योग्य तिकीटवाटपासाठी शुभेच्छा !!!

2 Comments
  1. Anonymous says

    छान

  2. साबीर जमादार says

    आमच्या साहेबांनी १९९९ ला अर्थ मंत्री असताना अर्थ तज्ञ केन्स चा हिशेब पूर्ण केला होता

Leave A Reply

Your email address will not be published.