टिळकांचे नातू हिंदू महासभेतून आले आणि काँग्रेसचे दिग्गज नेते बनले…

आजची पिढी काहीही म्हणो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे देशाचे सर्वोच्च नेते होते आणि ते काँग्रेसचे पुढारी होते. लोकमान्य स्वतःला तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणवून घेत. त्यांचे काही विचार जुन्या काळाप्रमाणे कर्मठ जरी असले तरी नव्या जगाप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यास लोकमान्य सदैव तयार असायचे.

टिळकांच्या निधनानंतर मात्र त्यांचे अनुयायी काँग्रेसच्या राजकारणातून बाहेर पडले. महात्मा गांधींचे नेतृत्व स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. हिंदू मुस्लिम ऐक्याच्या नावाखाली मुस्लिम तुष्टीकरणाचे धोरण गांधी राबवत आहेत असं म्हणत त्यांनी वेगळी वाट चोखाळली.

लोकमान्यांचे दोन्ही चिरंजीव मात्र अत्यंत पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी टिळक वाड्यात आंबेडकरांसह दलित सहभोजन आयोजित केलं होतं. केसरीच्या ट्रस्टींनी किती जरी विरोध केला तरी त्यांनी माघार घेतली नाही. प्रसंगी पोलिसांशी लढा दिला मात्र मागे हटले नाहीत.

पण लोकमान्य टिळकांच्या तथाकथित अनुयायी व केसरीच्या ट्रस्टींकडून होणाऱ्या अन्यायाला वैतागून धाकट्या श्रीधरपंतानी रेल्वेच्या रुळावर उडी मारून जीव दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी लिहिलेल्या आपल्या लेखात म्हणाले होते,

“जर टिळकांच्या घराण्यात खरा लोकमान्य कोण असेल तर ते म्हणजे श्रीधर टिळक”

याच श्रीधरपंत टिळकांचे सुपुत्र म्हणजे जयंतराव टिळक. 

जयंतराव टिळक हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अनुयायो होते. सावरकरांना राजकीय वारसा हा लोकमान्य टिळकांचाच लाभला होता. टिळकांच्याच आशीर्वादाने ते लंडनला गेले आणि राजकीय क्रांतिकारी चळवळी चालू ठेवल्या. मात्र पुढे त्यांची अंदमानच्या तुरुंगात रवानगी झाली. तिथून परत आल्यावर त्यांच्यावर राजकीय कार्यक्रमात भाग घेण्यास बंदी घालण्यात आली होती.

याच काळात त्यांनी पुस्तके लिहून हिंदुत्वाची भूमिका कठोर केली. काँग्रेसचे नेते हिंदू धर्माकडे दुर्लक्ष करतात आणि याचा राजकीय तोटा बहुसंख्येने असलेल्या हिंदू लोकसंख्येला भोगावा लागत आहे असे त्यांचे म्हणणे होते. मुस्लिम लीगच्या भूमिकेला उत्तर म्हणून हिंदू महासभा या पक्षाची स्थापना करण्यात आली.

 अनेक हिंदुत्ववादी विचारांचे तरुण या पक्षाकडे आकर्षित झाले. त्यांनी देशभरात निवडणुका देखील लढवल्या. 

सावरकरांची अमोघ वाणी, त्यांचे लिखाण, त्यांचा जाज्वल्य राष्ट्राभिमान याकडे जयंतराव टिळक आकर्षित झाले. त्यांनी अगदी तरुण वयातच हिंदूमहासभेत प्रवेश केला.

तोपर्यंत केसरीचे ट्रस्टी आणि टिळक कुटूंब यातील वाद देखील शमला होता. केसरीची जबाबदारी जयंतराव टिळकांकडे आली. त्यांनी आपल्या मेहनतीने लोकमान्यांनी स्थापन केलेल्या केसरी या साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर करण्यात यश मिळवले. लोकमान्यांच्या काळात केसरीची जी प्रतिष्ठा होती ती जपली आणि वाढवली.

हे सगळं चालू असताना गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ या चळवळींमध्ये त्यांनी हिंदू महासभेच्या वतीने सहभाग घेतला. गांधीजींच्या हत्येनंतर सावरकरांवर आणि हिंदू महासभेवर अनेक आरोप झाले होते. कित्येकांनी पक्ष सोडून देखील दिला होता. मात्र तरीही पक्षात राहून विधायक कार्य करत राहणाऱ्यांमध्ये जयंतराव टिळक यांचा समावेश व्हायचा.

जयंतराव टिळकांनी गोवा मुक्तिसंग्रामात पोर्तुगीजांच्या लाठ्या खाल्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कारावास सहन केला मात्र मागे हटले नाहीत. 

१९५७ साली जेव्हा विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीने एकत्र येऊन काँग्रेसचा मुकाबला करायचं ठरवलं. त्यावेळी हिंदू महासभेच्या वतीने जयंतराव टिळकांचं नाव पुढं आलं. ते समितीच्या तिकिटावर पुण्यातून पहिल्यांदाच विधानसभा लढले आणि निवडून देखील आले.

त्यांच्यासारख्या ऐहकडो कार्यकर्त्यांच्या त्यागाचा व बलिदानाचा परिणाम नेहरूंना संयुक्त महाराष्ट्र देणे भाग पडले. 

यशवंतराव चव्हाण यांच्याकडे संयुक्त महाराष्ट्राच्या मंगल कलश सुपूर्द करण्यात आला.

यशवंतराव चव्हाणांनी नवं महाराष्ट्र घडवताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे काँग्रेस पासून दूर गेलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचे  केले. यालाच बेरजेचे राजकारण म्हणून ओळखले जाते. मोरारजी देसाई यांच्या कारभारामुळे काँग्रेसपासून दूर गेलेली पिढी यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नामुळे पक्षाशी जोडली गेली. शेतकरी कामगार पक्ष, प्रजा समाजवादी, कम्युनिस्ट पार्टी अशा अनेक पक्षातून नेते काँग्रेस मध्ये सामील झाले.

यातच हिंदू महासभेतून येणाऱ्या जयंतराव टिळक यांचाही समावेश होता.

यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नामुळे टिळकांचा वारसदार काँग्रेस मध्ये आला. गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचा टिळकभक्तांशी तुटलेला संवाद या निमित्ताने पुन्हा दृढ झाला.

जयंतराव टिळक हिंदुमहासभेतून मानाने काँग्रेसमध्ये गेले. खासदार झाले, मंत्री झाले , विधान परिषदेचे सभापती झाले. विशेष म्हणजे ज्यांच्या मतावर इंदिरा गांधींचा पूर्णपणे विश्वास होता अशा फार थोड्या मराठी काँग्रेस नेत्यांपैकी एक जयंतराव होते.

त्यामुळे दिल्ली दरबारात जयंतरावांना मान होता. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री नेमण्याची प्रथा आहे. तसे म्हटले तर दिल्लीच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्राचे पालकमंत्री जयंतराव टिळक होते. असे असूनही जयंतरावांची हिंदुत्वनिष्ठा कधीही पातळ झाली नाही. ती त्यांना कधी लपवावीशी वाटली.

काँग्रेसमध्ये असूनही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक पुण्यात उभारले जावे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जयंतराव टिळक आघाडीवर होते. १९७५ साली, स्वातंत्र्यवीरांच्या  जयंतीच्या मुहूर्तावर स्मारकाच्या  प्रकल्प कार्यालयाचे   उदघाटन, गोव्याच्या तत्कालीन  मुख्यमंत्री सौ. शशिकला काकोडकर यांच्या हस्ते झाले. १९७९ साली, तत्कालीन उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री बाबू जगजीवनराम यांचे हस्ते प्रकट समारंभात भूमिपूजन झाले. 

टिळकांनी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद पवार यांना या कार्यक्रमाचे अध्यक्षपद दिले होते. पवारांनी त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्मारकाला अडीच लाख रुपयांची देणगी घोषित केली. 

इतकेच नाही तर जयंतराव टिळकांनी खुद्द इंदिरा गांधींना सावरकर स्मारकाची माहिती दिली आणि त्यांच्याकडून देखील निधी मिळवला.

काँग्रेस मध्ये राहून खुले आम आपले सावरकर प्रेम जपणाऱ्या जयंतराव टिळक यांच्या चारित्र्यावर कुठल्याच पक्षाने कधी शंका घेतली नाही. विधानपरिषदेचे सभापती म्हणून तब्बल तेरा वर्षे त्यांनी चालवलेला सभागृहाचा कामकाज आजही आदर्श समजला जातो.

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.