रजनीकांतच्या त्या एका वाक्यानं जयललितांची सत्ता घालवली 

१९९१ सालच्या तमिळनाडू विधानसभा निवडणुका. सत्तेत असलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघमला पक्षाला आजवरचा सगळ्यात वाईट पराभव काय असतो हे दाखवून देत, जे. जयललिता यांनी पहिल्यांदाचं मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली होती. २२५ पैकी तब्बल १७२ जागांवर एआयएडीएमके आपला करिष्मा दाखवला होता.

त्यावर्षींच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पण काँग्रेस आणि एआयएडीएमके युतीनं राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे ३९ जागा जिंकल्या होत्या. एकूणच सगळ्या राज्यात जयललितामय वातावरण होतं.

तमिळनाडूमधल्या लोकांवर सिनेमाचा प्रभाव किती आणि कसा असतो हे तर जगजाहीर आहे. इतर ठिकाणी राजकारण करण्यासाठी फेसबुक, ट्विटरचा वापर करतात पण तिथं आजही सिनेमाचा वापर होतो. जयललिता यांनी पण असचं सिनेमातून राजकारणातलं आपलं वजन वाढवाल होतं. तिथं अम्मा म्हणून ओळख मिळवली होती.

अगदी त्याच प्रमाणे दुसऱ्या बाजूला रजनीकांत यांना पण सिनेमानचं दैवत्व दिलं होतं. तिथल्या प्रेक्षकांमध्ये ‘थलैवा’ म्हणून ओळख मिळवली होती. पण त्यांची राजकीय भूमिका मात्र काहीशी जयललिता विरोधी होती. 

मात्र पुढच्या काही काळात ही भूमिका एवढी विरोधाची झाली होती की, १९९१ मध्ये बहुमतात सत्तेत आलेल्या जयललितांची रजनीकांत यांनी पुढच्या ५ वर्षातच आपल्या एका वाक्यावर सत्ता घालवली होती. 

१९९१ मध्ये सत्तेत आल्यावर जयललिता यांच्यावर काहीच दिवसात इतर कामांच्या कौतुकापेक्षा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप जास्त व्हायला लागले. यात २ मोठे आरोप होते ते म्हणजे कलर टीव्ही स्कॅम आणि दत्तक मुलाच्या लग्नाच्या खर्चाची चर्चा.

जयललिता सरकारने ग्रामपंचायतींमध्ये कलर टीव्ही लावण्यासाठी त्याच टेंडर काढलं, आरोप झाले कि, यात खरेदी करताना मार्केट प्राईझ पेक्षा जास्त किमतीने खरेदी केले. यांच्यात त्यांच्या निकटवर्तीय शशिकला यांच्यावर पण आरोप झाले. याच केसमध्ये पुढे त्यांना जेलमध्ये देखील जायला लागलं.

याच दरम्यान १९९५ मध्ये जयललितांनी आपला दत्तक पुत्र सुधाकरनच लग्न लावून दिलं. त्यावेळच्या अंदाजानुसार साधारण १०० कोटी रुपये या लग्नावर खर्च झाले होते.

देशाच्या राजकारण्यांपासून, बॉलिवूड, क्रिकेट अशा सगळ्यांची उपस्थिती होती.

इथूनच जयललितांचे ग्रहमान फिरायला सुरुवात झाली होती, निवडणुकांच्या तोंडावर भ्रष्टाचाराच्या आरोपांनी राळ उठली. विरोधक आरोप करत होते, पण यात सगळ्यात पुढे होते रजनीकांत.

रजनीकांत प्रत्यक्षात प्रचारात उतरले नव्हते, पण पडद्यामागून मात्र ते प्रचंड सक्रिय झाले होते. त्यावेळी त्यांनी आपला ‘बाशा’ हा बहुचर्चित सिनेमा निवडणुकांच्या तोंडावर रिलीज केला. याच दरम्यान त्यांनी जयललितांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं. ते म्हणाले, 

जर तामिळनाडूच्या जनतेने पुन्हा जयललितांच्या हातात सत्ता दिली तर देव पण तामिळनाडूला वाचवू शकणार नाही. 

रजनीकांत यांचं ते वाक्य म्हणजे डीएमकेसाठी टॅगलाईन बनली, प्रत्येक सभेत आणि प्रत्येक नेत्याच्या तोंडात ‘…तर देव पण तामिळनाडूला वाचवू शकणार नाही’ हे एकच वाक्य होतं. डीएमकेनं आपला सगळा प्रचार या एका वाक्याभोवती केंद्रित केला होता.

जेव्हा निवडणूक पार पडली, निकाल लागला तेव्हा १९९१ जो पराभव डीएमकेला बघावा लागला होता, त्याहून वाईट पराभव १९९६ ला जयललिता आणि त्यांच्या पक्षाला पाहायला लागला होता. लोकसभेत ३९ जागांवर पराभव स्वीकारावा लागला, विधानसभेत तर डीएमकेने २२१ पैकी तब्बल २१९ जागा जिंकल्या. जयललिता स्वतः ‘बरगुर’ जागेवरून निवडणूक हरल्या.  

१९९६ मध्ये जेव्हा त्यांच्या संपत्तीवर धाड पडली तेव्हा तमिळनाडूमध्ये जमीन, हैदराबाद मध्ये एक फार्महाऊस, निलगिरीमध्ये चहाचा मळा, लक्झरी गाड्या अशी सगळी संपत्ती समोर आली. तर घरी ८०० किलो चांदी, २८ किलो सोनं, चपलांच्या शेकडो जोड्या, दहा हजारांपेक्षा जास्त साड्या, ९१ महागडी घड्याळ असं सगळं साहित्य जप्त करण्यात आलं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.