समाजवाद्यांमुळेच खऱ्या अर्थांने संघाचा राजकारणात प्रवेश होऊ शकला…

जयप्रकाश नारायण यांची ख्याती इंदिरा गांधींच्या एकहाती सत्तेला तडा देणारी भारतातील एकमेव व्यक्ती म्हणून होती. काँग्रेसच्या विरोधात असणाऱ्या सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन त्यांची मोट बांधायची संकल्पना जयप्रकाश यांनीच काढली होती.

कम्युनिस्ट लोकांना बाजूला सारून इतर सर्व पक्षांनी एकत्र यावे आणि सत्ता स्थापन करावी या मताचे ते होते.

काँग्रेस ओ, जनसंघ, सोशलिस्ट म्हणजे समाजवादी पक्ष, लोकदल आणि काँग्रेस फोर डेमोक्रसी अशा वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष त्यांनी एकत्र आणले. टोकाचे राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी विचार असणारा जनसंघ यांची सांगड समाजवादी लोकांशी घालणे फक्त जयप्रकाश यांनाच शक्य होते.

त्यासाठी त्यांनी मार्ग निवडला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा…

त्यामुळेच आपला उत्तराधिकारी निवडताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असणारा माणूस निवडला. लोक संघर्ष समिती बनवताना त्यांनी या चळवळीच्या दिशा स्पष्ट केल्या होत्या. जयप्रकाश नारायण हे तेव्हा देशातील विरोधी पक्षाचे सगळ्यात मोठे नेते होते. पण आपल्या नंतर या चळवळीची सगळी जबाबदारी नानाजी देशमुखांकडे देण्यात यावी हे त्यांनी आधीच ठरवून ठेवले होते.

“जर आपल्याला अटक झाली तरी या समितीचे नेतृत्व नानाजी करतील”

हे त्यांनी सर्वांना स्पष्ट बजावून ठेवले होते. नानाजी देशमुख यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आजन्मसंबंध होता ही गोष्ट कुणापासूनच लपून नव्हती. नानाजी स्वतः जहाल राष्ट्रवादी हिंदुत्ववादी विचारांचे नेते होते. यांच्याकडे नेतृत्व गेल्यावर लोकसंघर्ष समितीमध्ये संघातील लोकांचा प्रवेश होईल ही बाब त्यांना चांगलीच माहीत होती. तरीही त्यांनी हा निर्णय घेतला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खर्‍या अर्थाने राजकारणात प्रवेश झाला तो इथूनच.

जयप्रकाश नारायण यांच्या अनुपस्थितीत या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नानाजी देशमुख यांच्यामार्फत मुख्य धारेतील राजकारणात प्रवेश करता आला. आपल्या काँग्रेसला विरोध करण्याच्या मोहिमेमध्ये त्यांनी संघाला मुख्य धारेत आणून सोडले.

1977 सालच्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव होण्यामागे जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन होते. पण या आंदोलनातून अजून एक गोष्ट समोर आली म्हणजे वर्षानुवर्षाच्या राजकीय संन्यासातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बाहेर पडला.

काँग्रेस विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या कामात जेव्हा जनसंघाला त्यांनी सामावून घेतले तेव्हाच सामान्य कष्टकरी जनतेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दारे खुली झाली. समाजवादी आणि लोकशाहीवादी लोकांच्या मांडीला मांडी लावून बसताना सुरुवातीला संघात असलेल्या आणि नंतर राजकीय क्षेत्रात उतरलेल्या लोकांना चांगले व्यासपीठ मिळाले.

आधी फक्त उच्चवर्णीय जातींमध्ये आणि देशातील काही ठराविक लोकसंख्येत आणि विभागात प्रभुत्व असणारा जनसंघ जयप्रकाश नारायण यांच्या पाठिंब्याने सर्वसामान्य जनतेसाठी पहिल्यांदा मोठा पर्याय बनला.

अर्थात जनता पक्षाचे अडीच वर्षातच तुकडे झाले यामागे “दुहेरी सदस्यता ठेवायचे की नाही ठेवायची” हे साधे कारण होते. म्हणजेच विरोधी पक्षांची झालेली ही युती फक्त काँग्रेसला हरवण्यासाठी केलेली जुळवाजुळव होती.

आज भारतीय जनता पक्ष देशाच्या राजकारणावर वरचष्मा ठेवून आहे. त्याची सुरुवात इथूनच झाली होती.

जयप्रकाश नारायण यांच्या पाठिंब्याने जनता पक्षात जनसंघाला झुकते माप मिळाले.

1977 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार उभे करण्याचा बहुमान जनता पक्षाकडून जनसंघाला मिळाला होता. देशातील 31 टक्के मतदारसंघात जनसंघाचे उमेदवार उभे होते. जनता पक्षातील इतर कोणत्याही गटाला एवढी तिकीटे मिळाली नव्हती.

ज्या ठिकाणी आधी जनसंघाला उमेदवार मिळत नव्हते त्या ठिकाणी देखील जनसंघ जाऊन पोहोचला. इतकेच नव्हे तर जयप्रकाश यांच्या कृपाशीर्वादाने निवडूनही आला. मोरारजी देसाई यांच्या प्रशासनात विदेश मंत्रालय सांभाळणारे अटल बिहारी वाजपेयी यांचे नेतृत्वही संघाच्याच मुशीत तयार झाले होते.

याच्या बरोबर पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे 1962 च्या निवडणुकीत दीनदयाळ उपाध्याय यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारणात आणण्यासाठी असाच प्रयत्न केला होता. पण ते प्रयत्न अपुरे ठरले होते.जनसंघाने हिंदुमहासभा आणि तत्सम धर्मवादी पक्षांशी युती केली होती. पण जनतेकडून या आघाडीला काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता.

पण जनसंघाला यश केव्हा मिळाले? तर जेव्हा त्यांची युती राम मनोहर लोहिया या समाजवादी नेत्याशी झाली तेव्हा..!

यासंदर्भात स्वतः जनसंघाच्या काही लोकांनी किस्से सांगितले आहेत,

काही जागी काँग्रेस सोडून दुसरा पक्ष अस्तित्वात आहे हेच लोकांना माहित नव्हते. तेव्हा काँग्रेसचे उमेदवार सभा घेत आणि त्यातून जनसंघावर टीका करत. तेव्हा ते जयप्रकाश नारायण यांच्या विरोधातही बोलत.

म्हणजेच जयप्रकाश नारायण हे जनसंघाच्या सोबत आहेत हे लोकांच्या लक्षात येई.

जयप्रकाश नारायण यांच्या विचारांवर लोकांचा विश्वास होता. त्यामुळे काही ठिकाणी उमेदवार न जाताही जनसंघाला प्रचंड मतदान मिळाले.

देशभर प्रचंड मोठे आंदोलन उभारण्यासाठी जयप्रकाश यांनाही काँग्रेस विरुद्ध तितक्याच तगड्या सोबत्याची गरज होती. तेव्हा देशात काँग्रेसला शह देऊ शकेल अशी एकमेव संघटना होती ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

संघातील लोकांनी पाठिंबा दिला तरच हे आंदोलन लोकप्रिय होणार होते.

1974 च्या पोटनिवडणुकीत पासूनच जनसंघाचा जनता पार्टी बनवण्याचा इरादा होता. बाबुलाल गौर आणि शरद यादव हे दोन नेते या पोटनिवडणुकीत “जनता उमेदवार” या नावानेच निवडून आले होते. त्यामुळे आणीबाणी लागताच ही प्रक्रिया फक्त अजून वेगाने सुरू झाली. आणीबाणीच्या काळात जनसंघाचे नाव उजळून निघाले.

1977 साली इंदिरा गांधींनी निवडणुका जाहीर केल्या तोपर्यंत जनसंघाची प्रतिमा एक निर्मळ मनाच्या लोकांचा पक्ष म्हणून तयार झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत जनसंघाला त्याचा प्रचंड फायदा झाला.

गांधीहत्या करण्याच्या आरोपावरून लोकांच्या मनात तोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी निगडित सर्वच संस्थांविषयी संभ्रम होता. पण जयप्रकाश यांनी थेट लोकांपर्यंत जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपल्या बरोबरीचे स्थान दिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्याशी जयप्रकाश नारायण यांचे चांगले संबंध होते. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि स्वतः सरसंघचालक देवरस यांनी “जयप्रकाश नारायण हे गांधीजींनी सांगितलेल्या वाटेवर पुढे जाऊन देशाला योग्य दिशेने नेत आहेत” असे जाहीररित्या म्हटले.

“महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि गोळवलकर गुरुजी हे तिघे संन्यासी होते. त्यांच्याप्रमाणेच संन्यासी धर्म स्वीकारून जयप्रकाश नारायण देशाचे नेतृत्व करत आहेत”

असेही त्यांनी सांगितले.

जयप्रकाश नारायण यांनीही जनसंघाच्या सभांना जायला व तेथे जनसंघाच्या उमेदवारांचा प्रचार करायला सुरुवात केली.

अशाच एका सभेमध्ये त्यांनी जोरदार भाषण ठोकले टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशासाठी काम करणारी संस्था म्हणून जाहीर करून टाकले.

3 नोव्हेंबर 1977 रोजी ही सभा भरली होती. बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांना मानणारे अनेक लोक गावोगाव जाऊन अनेक लोकांना सोबत घेऊन या सभेसाठी जमले होते. पटना शहरातील एका मोठ्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जयप्रकाश नारायण यांनी जनमानसामध्ये असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची छबी अवघ्या काही वाक्यांमध्ये बदलून टाकली.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नव्या भारताला तयार करण्यासाठी नवे आव्हान स्वीकारले आहे. या क्रांतिकारी संघटनेकडून मला मोठी आशा वाटते. तुमच्यामध्ये ऊर्जा आहे, निष्ठा आहे आणि तुम्ही देशासाठी काहीही करण्यासाठी समर्पित आहात.”

लाखो लोकांच्या जनसमुदायासमोर त्यांनी संघाची स्तुती केली.

मात्र त्यापुढे जाऊन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वतःच्या बरोबरीने उभे केले.

“जर तुम्ही त्यांना फॅसिस्ट म्हणत असाल, तर मी देखील फॅसिस्ट आहे”

अशी घोषणा त्यांनी केली. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी सुखद धक्का होता.

भारतातली जनता जयप्रकाश नारायण यांना दुसरा गांधी मानत होती. अशा माणसानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इतकी थेट ओळख दिल्यानंतर जनसंघाने याचा फायदा करून घेतला.

याच जनसंघाचे पुढे भारतीय जनता पक्षात रूपांतर झाले.

1989 च्या निवडणुकीत राजीव गांधी यांना पंतप्रधान पदावरून पायउतार करण्यात या गोष्टीचा मोठा वाटा होता. जनता पक्ष बनवणारे इतर सर्व पक्षांत फाटाफूट होऊन त्या गोंधळात हरवून गेले होते. पण जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या पाठिंब्याने जनसंघ मात्र सत्तेची चावी मिळवण्यात यशस्वी झाला.

काँग्रेसकडे या काळात जनसंघाच्या विरुद्ध बोलण्यासाठी एकच मुद्दा होता तो म्हणजे “ते फॅसिस्ट आहेत”. काँग्रेसचे मोठे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाला फॅसिस्ट म्हणून प्रत्येक सभेत संबोधित करत होते. काँग्रेसच्या या सगळ्या आरोपांचा निकाल जयप्रकाश नारायण यांनी आपल्या एकाच वाक्यात लावून टाकला.

इतकेच नाही तर आणीबाणी हटवल्यानंतर जेव्हा जयप्रकाश नारायण जेल मधून सुटले तेव्हा त्यांनी मुंबईमध्ये मोठी सभा घेतली. या सभेतही त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा केली.

“मी स्वतःच्या आत्म्याला साक्षी मानून सांगतो की जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि जनसंघाला फॅसिस्ट म्हणताहेत किंवा त्यांना जातीयवादी म्हणताहेत ते सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. देशाच्या हितासाठी केल्या जाणाऱ्या कामांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच मागे राहिला नाही. या लोकांवर असे आरोप करणे हा फक्त त्यांच्यावर चिखल उडवण्याचा नीच प्रयत्न आहे”

असे प्रतिपादन त्यांनी भर सभेत केले.

जयप्रकाश नारायण हे सुरुवातीला रशियन राज्यक्रांतीने प्रभावित झाले होते. नंतरच्या काळात त्यांनी गांधीवादाचा स्वीकार केला होता. त्यानंतरच्या काळात ते समाजवादी बनले व काँग्रेसपासून दूर गेले. या काळात ते गांधीजींची प्रतिकृती म्हणून त्याच्या समोर आले होते.

ज्या माणसाला जनता महात्मा मानत होती. त्यांनीच स्वतःच्या आत्म्याची शपथ घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला क्लीनचिट दिल्याने जनतेच्या मनातील संभ्रम मोठ्या प्रमाणात दूर झाला.

जयप्रकाश नारायण यांची ओळख तेव्हा जगभर पोचली होती. त्यामुळे आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नावही न ऐकणारे लोक अचानक संघाविषयी आत्मीयतेने व आदराने बोलू लागले.

‘द इकॉनॉमिस्ट’ हे जागतिक स्तरावर नावाजलेले नियतकालिक लंडन वरून प्रसिद्ध होते. त्यात लिहिल्या जाणाऱ्या गोष्टी जगभर ग्राह्य मानल्या जातात. जयप्रकाश नारायण यांच्या मुंबईत झालेल्या सभेनंतर त्याचे वृत्तांकन द इकॉनॉमिस्ट मध्ये आले. 4 डिसेंबर 1976 च्या अंकात या सभेचे वर्णन छापले गेले. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर एक विशेष लेख लिहिण्यात आला.

त्यात “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जगातील एकमेव कम्युनिस्ट नसणाऱ्या लोकांनी उभारलेले क्रांतिकारी संघटन आहे” असे वर्णन करण्यात आले. आपल्या स्थापनेपासून संघाला जागतिक स्तरावर ऐवढी दखल कधीच मिळाली नव्हती जेवढी जयप्रकाश नारायण यांनी आपल्या दोन सभांमधून त्यांना मिळवून दिली.

राजकारणात उतरणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी छात्र एवम् युवा संघर्ष वाहिनी या संस्थेची निर्मिती केली. ही संस्था थेट जयप्रकाश नारायण यांच्या आदेशाने काम करत असे.

अर्थातच या संस्थेतील नेते पुढे जाऊन भारताचे नेतृत्व करणार होते अशी जयप्रकाश नारायण यांची अपेक्षा होती.

संघ परिवाराशी जोडलेले अनेक कार्यकर्ते नंतरच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या जवळ गेले. त्यावेळी अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संयोजक होते. त्याचबरोबर दिल्ली विद्यापीठातील छात्र संघाचे अध्यक्ष होते. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर असणारे संबंध जगजाहीर होते.

समाजवादी म्हणवल्या जाणाऱ्या जयप्रकाश नारायण यांनी अरुण जेटली यांची नियुक्ती आपल्या छात्र एवम युवा संघर्ष वाहिनी संस्थेच्या राष्ट्रीय संयोजक पदावर केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असणाऱ्या लोकांना जयप्रकाश नारायण यांनी आपला मंच खुला केला.

जयप्रकाश नारायण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संबंधांवर फार कमी प्रमाणात बोलली जाते. आयुष्याच्या नंतरच्या काळात जयप्रकाश नारायण यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असलेला स्नेह वाढत गेला होता.

या सर्व घटनांचे परिणाम देशाच्या राजकारणावर दूर पर्यंत झाले.

“निवडणुकीच्या आधी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणे म्हणजे देशाच्या लोकशाहीला धक्का देणे होय” असे मत असणाऱ्या जयप्रकाश नारायण यांनी घडवलेला जनता पक्ष पुढे भारतीय जनता पक्षात रूपांतरित झाला.

हाच पक्ष 2014 पासून भारतात सत्तेत आहे.

  •  वैभव वाळुंज

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.