एका जंगलात भारतातली पहिली स्मार्ट ट्रेड सिटी उभा राहिली तेच आजच ‘जयसिंगपूर’

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एक प्रजाहितदक्ष्य राजा होता. त्यांना शिकारीचा छंद होता. भल्या भल्या मोठ्या वाघाच्या शिकारी त्यांनी सहज केल्या होत्या. एकदा असच ते मोहिमेवर निघाले. पण त्या दिवशी काही केल्या शिकारच सापडत नव्हती.

पाठलाग करत करत ते खूप दूरवर आले. निबिड जंगल लागल होतं. थोड पुढ गेल की नदीच्या पलीकडे राज्य संपणार होतं.

ऊन डोक्यावर आलं होतं. राजाचा लवाजमा एका झाडा खाली थांबला. राजे खूप दूरदृष्टीचे होते. डोक्यात कायम प्रजेचा विचार सुरु असायचा.त्यांच्या लक्षात आलं की इथे आसपास छोटी छोटी खेडी आहेत. भाजीपाला प्रचंड पिकतो. पण इथल्या शेतकऱ्याना आपला माल विकण्यासाठी दूरवर जावे लागते नाहीतर शेजारच्या राज्याचा आसरा घ्यावा लागतो.

राजांनी त्याच क्षणी आपल्या कारभाऱ्याना आदेश सोडला की या जंगलात एक व्यापारी नगर वसवायचं.

कोण म्हणतं इथेपुर्वी जंगल होतं तर कोण म्हणतं माळरान होतं. पण इथच एक व्यापारी नगर वसलं.

ही कुठली पंचतंत्रातली गोष्ट नाही. ही घटना आहे १०० वर्षापूर्वीची.

हे गाव म्हणजे जयसिंगपूर आणि तो दूरदृष्टीचा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज.

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कृष्णा पंचगंगेच्या पाण्यामुळे सुपीक  झालेला प्रदेश. विशेषतः शिरोळ तालुक्यात ऊसापासून ते भाजीपाल्या पर्यंत सगळ्याच दर्जेदार उत्पादन घेतल जात. पण त्या काळच्या करवीर संस्थानात मोठी बाजारपेठच नव्हती.

कोल्हापूरचा गुळ कोकणात राजापूरच्या व्यापारी पेठेत पाठवला जाई आणि तेथून तो राजापुरी गुळ म्हणून मुंबई वगैरे ठिकाणी पाठवला जाई.

याचाच अर्थ गुळ कोल्हापूरचा आणि नाव राजापूरच !

याच बरोबर शेजारीच असलेया पटवर्धनांच्या संस्थानात सांगली शहर देखील हळदीची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध झाल होतं. कोल्हापूर या स्पर्धेत मागे पडत आहे हे शाहू महाराजांच्या अगदी तरुण वयातच लक्षात आलं. म्हणूनच त्यांनी राज्यकारभार हाती आल्यावर आपल्या राज्यात व्यापारी पेठा वसवायला सुरवात केली. पहिली पेठ म्हणजे शाहूपुरी.

याचच पुढचं पाऊल म्हणजे जयसिंगपूर ही व्यापारी पेठेची नगरी. 

जयसिंगपूर म्हणजे शाहू महाराजांची स्वप्न नगरी होती. त्यांना हे शहर अतिशय आदर्शपणे उभं करायचं होतं. शाहू महाराजांच्या डोक्यात गावाचा आराखडा तयार होता. तो साकारण्यासाठी युरोपच्या आर्किटेक्टची मदत घेण्यात आली. अनेक नगर रचनाकार यांचा सल्ला घेतला. एक मुख्य रस्ता आणि त्याला काटकोनात छेदनाऱ्या एकवीस गल्ल्यांचे हे टुमदार शहर वसवलं.

सौजन्य – अप्पा चौगुले जयसिंगपूर

हे साल होतं १९१६. शाहुरायांच्या जनक पित्याचा म्हणजेच कागलचे महाराज जयसिंगराव घाटगे याचं नाव या शहराला देण्यात आलं.

“जयसिंगपूर”

कोल्हापूर, सांगली, निपाणी कागल येथील व्यापाऱ्यांना खास सवलती देऊन वखारी घालण्यास प्रोत्साहन देण्यात आलं. 

स्वच्छ व सुंदर हवामान. आसपासच्या खेड्यातून येणार दुधदुभत आणि ताजा भाजीपाला यामुळे व्यापाऱ्यांची वस्ती वाढली. आर्थिक व्यवहार वाढले. विशेषतः तंबाखू व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या पेढ्या सुरु केल्या. ही पेठ हळूहळू भरभराटीस आली. संस्थानातील शेतमालास बाहेरच्या राज्यात जाण्याची गरज उरली नाही.

शाहू महाराजांनी केलेले सामाजिक प्रबोधनाच काम, त्यांनी शिक्षणाचा तळागाळातल्या समाजात प्रसार व्हावा यासाठी केलेले कष्ट, त्यांनी कुस्तीला मिळवून दिलेली राज्यमान्यता, त्यांनी उभारलेले धरणे यासगळ्याची आपल्याला माहिती असते.

मात्र शाहू महाराजांनी कोल्हापुरात व्यापारी क्षेत्रात केलेलं काम आपल्याला माहिती नसते.

जयसिंगपूर ही भारतातली पहिली स्मार्ट ट्रेड सिटी शाहू महाराजांच्या स्वप्नातून साकार झाली.

सांगली कोल्हापूरला जोडणाऱ्या मार्गावरील प्रमुख शहर म्हणून जयसिंगपूर उदयास आलं. या शहरात रेल्वेस्थानकाची निर्मिती करण्यात आली. जयसिंगपूरचा माल भारतभर पोहचवला जाऊ लागला.  जवळ असलेल्या कर्नाटकातून निपाणी पेक्षा जयसिंगपूरला तंबाखूच्या सौद्यासाठी प्राधान्य मिळू लागल.

सौजन्य- अप्पा चौगुले जयसिंगपूर

 

साधारण १९४१सालच्या दरम्यान इथे नगरपालिका स्थापन झाली.

स्वातंत्र्यानंतर जयसिंगपुरात अनेक उद्योगधंदे स्थापन झाले. पारंपारिक तंबाखू व्यवसायाबरोबर गुटखा उद्योग सुद्धा सुरु झाला. याच गावातील संजय घोडावत यांचा स्टार गुटखा तर प्रचंड लोकप्रिय होता.

आसपासचे सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, ग्रीन हाउस, कुलकर्णी पॉवर टूल्स, गणेश बेकरी सारखे उद्योगसमूह यांनी जयसिंगपूरच्या व्यापार नगरीचा वारसा जपून ठेवलेला आहे.

संदर्भ- शैलजा अजित निटवे (जयसिंगपूर)

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. संतोष सुभाष बामणे says

    जयसिंगपूर शहर उदगांव गावातून फोडून निर्माण केले त्याचा यात कुठेही उल्लेख नाही

Leave A Reply

Your email address will not be published.