जयसूर्याने एका ओव्हरमध्ये मनोज प्रभाकरचं क्रिकेटमधलं करीयर संपवल

गोष्ट आहे १९९६ च्या वर्ल्डकपची. भारत श्रीलंका मॅच. नाही नाही तो कुप्रसिद्ध सेमीफायनल नाही. त्याच्या आधी दिल्लीमध्ये झालेल्या साखळी सामन्यात आपण समोरासमोर आलो होतो. नुकताच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवामुळे हा सामना जिंकणे आपल्याला गरजेचे होते.

अर्जुन रणतुंगाने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग स्वीकारली. फॉर्ममध्ये असलेल्या सचिन तेंडुलकर सोबत ओपनिंगला उतरला लोकल बॉय मनोज प्रभाकर.  

मनोज प्रभाकर एक मिडीयम पेसर होता.स्विंग गोलंदाजी मध्ये तो एक्सपर्टहोता. पण त्याची बॅटींग देखील चांगली होती. कामचलाऊ खेळता खेळता त्याने २-३ शतक ठोकले होते. म्हणूनच अझरूद्दीनने त्याला वनडेमध्ये थेट ओपनिंगला पाठवायला केली होती. भारतातर्फे पहिली ओव्हर टाकणारा आणि बॅटिंग करताना पहिला बॉल खेळणारा एक मेव खेळाडू अशी त्याची प्रसिद्धी झाली .

त्यामुळे झाल अस होत की तो स्वतःला कपिल पेक्षा ही आपण भारी ऑलराउंडर आहे या गैरसमजात राहू लागला होता.

पण त्यादिवशी मनोज प्रभाकरला आपल्या समोर कांय वाढून ठेवलंय हे ठाऊक नव्हत.

चामिंडा वासची तुफानी बॉलिंग त्याला झेपतच नव्हती. सगळे बॉल त्याच्या कानाजवळून जात होते. त्यामानाने सचिन नेहमीच्या फ्लोमध्ये चांगला खेळत होता. प्रभाकरचं घरच ग्राउंड असूनही दिल्लीकरांनी त्याची हुर्यो उडवायला सुरवात केली. तो अजून जास्त प्रेशर मध्ये आला.

९ ओव्हर मध्ये भारताच्या फक्त २७ धावा झाल्या होत्या. प्रभाकरने ३६ बॉल मध्ये फक्त ७ धावा काढल्या होत्या. प्रेशर खाली येऊन त्याने अखेर पुढ येऊन मारायचा प्रयत्न केला आणि त्यात तो आउट झाला. भारतीय पब्लिकने तो आउट झाल्याबद्दल टाळ्या वाजवल्या.

पुढे सचिनची सेंच्युरी आणि अझरच अर्धशतक याच्या जोरावर भारताने २७१ धावा काढल्या. त्या काळच्या मानाने हा धावांचा डोंगर होता. श्रीलंकेला तो झेपणार नाही असच सगळ्यांना वाटत होतं. पण झाल उलटच.

रणतुंगाच्या कप्तानीखाली लंकन बॅट्समननी वेगळीच स्ट्रॅटेजी आखली होती. पहिल्या १५ ओव्हर मध्ये फटकेबाजी करून १०० धावा काढणे.

पहिली ओव्हर टाकायला आलेल्या प्रभाकरला कालूवितरनाने सलग दोन बाऊंड्री हाणली. पहिल्या ओव्हरलाच प्रभाकरने ११ धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरला श्रीनाथने ८ धावा दिल्या. तिसरी ओव्हर टाकायला प्रभाकर परत आला. यावेळी मात्र त्याच्या समोर घातक जयसूर्या होता.

त्याने पहिलाच बॉल मिडओनला उचलून मारला. वन बाउन्स फोर गेला. दुसऱ्या बॉलला मात्र जयसूर्याने मिडऑफला सिक्स हाणला. तिसरा बॉल डॉट गेला. चौथ्या पाचव्या आणि सहाव्या बॉलला सलग तीन फोर टोलवले. प्रभाकरच तोंड बघण्यासारखं झाल होतं. यावेळी एका ओव्हर मध्ये त्याने २२ धावा दिल्या होत्या.

आजकाल अशोक डिंडा वगैरे ची बॉलिंग बघून आपल्याला सवय झाली आहे. पण त्याकाळात एखाद्या बॉलरची इतकी पिटाई सहसा होत नव्हती.

फिरोजशहा कोटलाच्या पॅव्हेलीयनमधून प्रभाकरला दिलेल्या अस्सल दिल्लीवाल्या शिव्या ऐकू येऊ लागल्या.

अझरने त्याच्या हातातून बॉल काढून घेतला आणि वेंकटेश प्रसादकडे दिला.

वेंकटेश प्रसाद, कुंबळे या दोघांनी जयसूर्याला बरयापैकी जखडून ठेवल होतं. पार्टटाईम बॉलिंग करणाऱ्या सचिनने देखील चांगली बॉलिंग टाकली. जयसूर्याला कुंबळेने आउट काढले.

अझरने मिडल ओव्हरमध्ये प्रभाकरला परत बोलावले. तो भारताचा मुख्य बॉलर होता आणि त्याच्या अजून ८ ओव्हर उरल्या होत्या. त्या भरून काढणारा दुसरा बॉलर नव्हता आणि आता प्रभाकरचा कर्दनकाळ जयसूर्या देखील समोर नव्हता.

प्रभाकर परत आला मात्र त्याने लांब रणअप घेऊन वेगवान बॉलिंग करायच्या ऐवजी स्पिन टाकायला सुरवात केली.

कुंबळे आणि सचिनला खेळायला लंकन बॉलरना अडचण येत आहे ते बघून प्रभाकरने ही आयडिया केली होती. कॉमेंट्री करणारे सुद्धा हसत होते. फास्टर बॉलर स्पिन बॉलिंग टाकतोय हे चित्र जागतिक क्रिकेटमध्ये फार कमी वेळा पाहायला मिळत होतं.

प्रभाकरच दुर्दैव त्याला पुढच्या 2 ओव्हर मध्ये सुद्धा रणतुंगा आणि कंपनीने फोडून काढल. टोटल ४ ओव्हर मध्ये प्रभाकरने ४७ धावा दिल्या होत्या.

भारताने ती मॅच गमावली. याच सगळ श्रेय मिळालं मनोज प्रभाकरला.ग्राउंडवर आणि टीव्हीवर ज्यांनी मॅच बघितली त्यांनी तर त्याला शिव्या दिल्याच होत्या, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातदेखील समीक्षकांनी त्याच्यावर टिकेचा पाउस पाडला.

“मनोज प्रभाकर सिरीयस नाही. त्याची फिटनेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी कमी पडतेय. त्यामुळेच तो दमून स्पिन बॉलिंग करू लागला आहे.”

या टीकेचा परिणाम झाला. ती प्रभाकरच्या आयुष्यातली शेवटची मॅच ठरली. पुढच्या वर्ल्डकपच्या एकही सामन्यात त्याला घेतल गेल नाही.

वयाच्या ३२ व्या वर्षी त्याने निवृत्ती घेतली. पुढे त्याने देखील मान्य केल की त्या एका ओव्हरमध्ये जयसूर्याने त्याचे जे हाल केले त्यामुळे त्याला निवृत्ती घ्यावी लागली. 

पुढे त्याने राजकारणात हातपाय मारून घेतले. त्यातही अयशस्वी झाला. मचफिक्सिंग प्रकरणातही त्याने स्टिंग ऑपरेशन करून स्वतःच हस करून घेतल. आता कधी कोचिंग तर कधी टीव्ही वर विश्लेषक म्हणून तो दिसतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.