काश्मिरी पंडीत असणाऱ्या जीवनकुमारची ओळख “नारदमुनी” अशीच झाली

निवेदिका तबस्सुमचा दूरदर्शनवरील ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ हा मुलाखतीचा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय. तिच्यासमोर मुलाखतीसाठी एक कलाकार होता. तबस्सुमने प्रश्न विचारला,

“तुम्ही पौराणिक सिनेमांमध्ये गेली कित्येक वर्ष चतुर अशा नारदमुनींची भुमिका करताय. माझ्या अंदाजाने जवळपास ४० वेळा तुम्ही नारदमुनी साकारलाय.”

मुलाखत देणा-या कलाकाराने अत्यंत विनयाने आणि थोड्या अभिमानाने तबस्सुमला सांगीतलं, “४० नाही ४९ वेळा नारदमुनी रंगवलाय.”

उत्तर देणा-या कलाकाराचं नाव जीवन कुमार.

नारदमुनी आणि जीवन हे हिंदी सिनेमांमधलं जणु एक समीकरण झालं आहे. जीवन यांनी तबस्सुमला उत्तर देताना पुढे सांगीतलं,

“मी ४९ वेळा नारदमुनी साकारलाय. हा जो एक वेगळ्या प्रकारचा रेकाॅर्ड आहे तो दुसरा कोणीतरी कलाकार मोडेल किंवा तसाच अबाधित राहिल, याची पर्वा मी कधी केली नाही. परंतु इतक्या वेळा नारदमुनींची भुमिका केल्यामुळे मी नारदमुनींची लोकप्रियता मात्र नक्कीच वाढवलीय.”

काहीशा मिश्किलतेने जीवन कुमार म्हणाले.

महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कथाकथन करणारी व्यक्ती म्हणुन नारदमुनींना स्थान दिलं गेलं आहे. म्हणजेच इकडे काय घडलं, ते तिकडे जाऊन सांगणं. मराठीमध्ये तर नारदमुनींसाठी ‘कळलाव्या’ हा शब्द वापरला जातो. जीवन कुमार यांनी याच नारदमुनींची भुमिका ४९ वेळा रंगवली.

एका वृत्तपत्राने जीवन यांच्या नारदमुनींचं कौतुक करताना लिहिलं होतं… समजा, नंतर कधी चमत्कार घडला आणि साक्षात नारदमुनी पृश्वीवर अवतरले, आणि जर त्यांनी जीवन कुमार ज्या पद्धतीने “नारायण नारायण” उच्चारायचे तसं उच्चारलं नाही, तर लोकांना पृश्वीवर अवतरलेले हे नारदमुनी खोटे वाटतील.

केवळ नारदमुनीच नाही तर हिंदी सिनेमांमधील एक लोकप्रिय खलनायक म्हणुनही जीवन ओळखले जातात.

जीवन यांचा हिंदी सिनेमांमध्ये प्रवेश कसा झाला, यामागची कहाणी सुद्धा रंजक आहे. जीवन कुमार यांचं मुळ नाव ओमकारनाथ धर. श्रीनगर येथील काश्मिरी पंडीत कुटूंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गिलगीट (हा भाग आता पाकीस्तानव्याप्त काश्मिरमध्ये येतो.) भागाचे प्रशासकीय अधिकारी होते. जीवन कुमार यांच्या जन्माच्या वेळेस त्यांच्या आईचं निधन झालं तर वयाच्या तिस-या वर्षी वडिल निवर्तले.

जीवन यांचं लहानपणापासुन फोटोग्राफर बनायचं स्वप्न होतं.

गाठीशी २६ रुपये बांधुन स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवन कुमार मायानगरी मुंबईत दाखल झाले. मुंबईत स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्ट्रगल करता करता त्यांना सिनेमाच्या सेटवर एक वेगळाच जाॅब मिळाला. हा जॉब होता रिफ्लेक्टर बॉयचा. शुटींगच्या वेळेस कलाकारांच्या चेह-यावर येणारा प्रकाश नीट परावर्तित व्हावा यासाठी रिफ्लेक्टर वापरतात. अशा रिफ्लेक्टरचं नियंत्रण करणारी माणसं असतात. जीवन कुमार सिनेमाच्या सेटवर अशा माणसांपैकी एक झाले.

नशीब म्हणा की योगायोग, दिग्दर्शक मोहन सिन्हा यांची नजर जीवन कुमार यांच्यावर पडली.

मोहनजींनी जीवनकडुन सिनेमातले काही संवाद म्हणवुन घेतले. जीवन यांनी त्यांच्या खास अंदाजात ते संवाद म्हणुन दाखवले. मोहन सिन्हांना जीवन कुमार यांची संवादफेक आवडल्याने १९३५ साली आलेल्या ‘फॅशनेबल इंडीया’ या सिनेमात जीवन यांना त्यांनी भुमिका दिली. अशाप्रकारे सिनेसृष्टीत जीवन कुमार यांचा प्रवेश झाला.

जीवन यांचा मुलगा किरण कुमारने एका मुलाखतीत सांगीतलं होतं,

“प्रत्येकाची स्वतःची एक शैली असते. माझे वडील लहानपणापासुनच त्यांच्या विशिष्ट शैलीसाठी ओळखले जात असत. एखाद्या भुमिकेकडे बघण्याचा त्यांचा वेगळा दृष्टीकोन असायचा. ती भुमिका त्यांच्या खास अंदाजात ते रंगवायचे. जेव्हा मी अभिनेता व्हायचं ठरवलं तेव्हा त्यांचा या खास अंदाजाचा मी कधी वापर केला नाही, परंतु तत्कालिन अनेक कलाकारांनी अभिनय करताना त्यांच्या या शैलीची नक्कल केली. यासाठी ते अजुनही बाबांप्रती ॠणी आहेत.”

याच मुलाखतीत ते पुढे म्हणाले, “त्यांनी जवळपास ६१ वेळा विविध माध्यमांतुन नारदमुनींना साकारलंय. जागतिक सिनेमांकडे पाहिल्यास हि एक अभुतपुर्व गोष्टच असेल.”

‘गंगामैया’, ‘हर हर महादेव’, ‘नारदलीला’ अशा अनेक सिनेमांमध्ये जीवन कुमार नारदमुनी म्हणुन झळकले. याचबरोबर १९७७ साली आलेल्या ‘अमर अकबर अँथनी’ सिनेमात त्यांनी रंगवलेला राॅबर्ट हा खलनायक, १९६० साली आलेल्या ‘कानुन’ सिनेमातली वेगळी भुमिका, १९७३ सालच्या ‘तीन चोर’ मधली काहीशी विनोदी धाटणीची भुमिका, जीवन कुमारांनी रंगवलेल्या अशा अनेक भुमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

प्रत्यक्ष नारदमुनी भुतलावर कधी अवतरतील, याबाबत कल्पना नाही. परंतु जीवन कुमार यांनी साकारलेले नारदमुनी बघितल्यावर ‘हो! मी नारदमुनींना पाहिलंय’ असं छातीठोकपणे सांगु शकतो.

हे ही  वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.