मुंबई अंडरवर्ल्ड मधील सगळेच डॉन तिला घाबरायचे, दाऊद तिला मावशी मानायचा..

मुंबई अंडरवर्ल्डच्या विश्वात अनेक डॉन होऊन गेले. आपल्या अस्तित्वासाठी अनेक लोकांनी टोळ्या सुरु केल्या. टोळीयुद्धातून अनेक कुख्यात गुंड आणि गुन्हेगार निर्माण झाले. मुंबईत ठिकठिकाणी टोळ्या तयार झाल्या होत्या. विभागानुसार या टोळ्यांचे वाद असायचे. प्रत्येक टोळीला वाटायचं कि मुंबईवर आपल्या टोळीच राज्य असावं म्हणजे मुंबई आपल्या मालकीची. पण हा अंडरवर्ल्डचा खेळ इतका सुपीक डोक्याने खेळला जायचा कि यात बायकाही सामील व्हायच्या.

आज अशा एका स्त्रीचा किस्सा

जिने मुंबईत जितके मोठे गुन्हेगार तयार झाले त्यांच्यावर पकड ठेवण्याचं काम या स्त्रीने केलं ती म्हणजे जेनाबाई दारुवाली.

१९२० साली एका मुस्लिम कुटुंबात तिचा जन्म झाला. मुंबईत महंमद अली रोडवरच्या डोंगरीतील एका चाळीत त्यांचं कुटुंब होतं. १९३० साली डोंगरी भाग मात्र त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचं प्रमुख केंद्र बनलं होतं.

त्यावेळी स्वातंत्र्यसाठी जाती धर्माची बंधन आडवी येत नसत. स्वातंत्र्यासाठी स्त्री पुरुष सरसकट रस्त्यावर उतरत असत. या मध्ये जेनाबाई सुद्धा असायची. गांधीजी आणि स्वातंत्र्य चळवळीची ती एक खंदी समर्थक होती. ती शाळेत जात नसल्याने तिला रस्त्यावर या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं सोपं जात असे.

चौदा वर्षाची जेनाबाई असताना तिचा निकाह मोहमद शाह दरवेशबरोबर झाला. याना एकूण पाच पाच अपत्य झाली. हिंदू मुस्लिम दंगल उसळल्यावर ती हिंदूंना संरक्षण द्यायची यावरून तिचा नवरा तिला बेदम मारत असायचा.फाळणी झाल्यावर तिच्या नवऱ्याने तिला पाकिस्तानला नेण्याचा विचार सांगितला मात्र जेनाबाईने मुंबई सोडण्यास ठाम नकार दिला. जेनाबाई आणि पाच मुलांना सोडून तिचा नवरा एकटाच निघून गेला.

पुढे पोटापाण्यासाठी ती दानाबाजारात चढ्या भावाने धान्य विकणारे दुकानदार आणि घाऊक धान्यविक्रेते यांच्यात दलाल म्हणून काम करू लागली. यातून तिची ओळख वाढू लागली. तिचा धान्याच्या काळाबाजाराचा व्यवसाय वाढला आणि तिची ओळख थेट तेव्हाचा डॉन असलेल्या हाजी मस्तानबरोबर झाली. हाजी मस्तान साठी ती एकदम विश्वासाची बाई होती. याच कारण मात्र स्पेशल होतं. वरदराजनने जेनाबाईची ओळख हाजी मस्तानला करून दिली होती.

मस्तानचे अनेक टोळ्यांशी आणि नेत्यांशी चांगले संबंध होते. ज्यावेळी मुंबईतील वर्चस्वासाठी टोळीयुद्धे सुरु झाली त्यावेळी या त्रासाला वैतागून मस्तानने हे सगळं थांबवण्याची जबाबदारी जेनाबाई दारुवालीवर टाकली. जेनाबाई दारुवाली हि महत्वकांक्षी बाई होती. सुरवातीला धान्याचा काळाबाजार करून ती जगत होती पण पुढे तिने तत्कालीन मद्यविक्रेता वरदराजन याच्याशी संगत वाढवली आणि तिथून ती दारूचा काळाबाजार करू लागल्याने तिला जेनाबाई दारूवाली म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

मस्तानला ज्यावेळी सगळे बेकायदेशीर धंदे बंद करायचे होते तेव्हा त्याने जेनाबाई दारुवालीला बोलावून सगळं सत्य सांगितलं होतं. ज्यावेळी चित्रपटांमध्ये हाजी मस्तान पैसे गुंतवत होता तेव्हा जेनाबाईने त्याला सांगितलं चित्रपटांमध्ये पैसे गुंतवणं फारच  जोखमीचं काम आहे यापासून लांब रहा.

जेनाबाई दारूवाली सगळ्यांसाठी काम करायची. तिला एक कळून चुकलं होतं कि आपला धंदा व्यवस्थित चालू ठेवायचा असेल तर कायद्याचे संरक्षक आणि दादालोक या दोघांनाही खुश ठेवता आलं पाहिजे.

दाऊद इब्राहिम तिला स्वतःची मावशी मानायचा. जितके टोळीचे लोक होते सगळे तिला मुंबई अंडरवर्ल्डची सगळ्यात महत्वाची बाई मानायचा. टोळ्यांमधले वाद सुद्धा ती मिरवायची. डोंगरातील सगळ्यात महाधूर्त बाई म्हणून जेनाबाई दारुवाली कुप्रसिद्ध होती. पठाण टोळी आणि दाऊद टोळीचा सगळ्यात मोठा समेट तिने घडवून आणून मस्तानच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं.

१९९३च्या दंगलीत मात्र तिथला रक्तपात पाहून जेनाबाईचं मन द्रवलं त्यावेळी डोंगरीतल्या उसळलेल्या दंगलीत ती दोन समाजमधल्या लोकांना शांत करण्यासाठी हातात पांढरा झेंडा घेऊन लोकांना शांत करत होती. एकीकडे मशिदी आणि एकीकडे मंदिर असलेल्या गल्लीच्या मध्यात उभी राहून जेनाबाई शांततेचं आवाहन करत होती.

संदर्भ ; माफिया क्वीन्स ऑफ मुंबई -हुसेन झैदी 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.