ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यू या तिन्ही धर्मियांसाठीं महत्त्वाचं असणे हाच जेरुसलेमसाठी शाप ठरलाय

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन वाद चिघळतच चालला आहे. मागच्या शुक्रवारी अल-अक्सा मशीद परिसरात हजारो लोक रमझानच्या शेवटच्या शुक्रवारी नमाजसाठी जमले होते, तेव्हा हिंसाचार उसळला ज्यात १६३ पॅलेस्टिनी आणि सहा इस्रायली पोलिस अधिकारी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सलग आठवडाभर चकमकी सुरु आहेत. शहरांवर क्षेपणास्त्र डागली जात आहेत. जेरुसलेम वादाच्या भोवऱ्यात असण्याचं नेमकं काय कारण आहे?

जेरुसलेमचा इतिहास तसा खूप जुना आहे. जगातलं सर्वात प्राचीन आणि धार्मिकदृष्टय़ा अत्यंत पवित्र असं हे शहर. ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यू या तिन्ही धर्मियांसाठीं हे शहर महत्त्वाचं आहे, पण का?

ओल्ड जेरुसलेममधील टेम्पल माऊंट हे तीनही धर्माच तीर्थक्षेत्र आहे.

मेडिटेरिअन समुद्र आणि मृत समुद्र यांच्यामध्ये ज्युडिअन डोंगररांगां पसरलेल्या आहेत. यातीलच एक मोराया डोंगरावर जेरुसलेम हे शहर वसलंय.

ज्यूंच्या इतिहासाप्रमाणे, देवाने एकदा जाफा येथे ज्यू धर्म संस्थापक अब्राहम याची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्याच्या मुलाचा बळी मागितला. अब्राहम बळी देण्यास तयार झाला आणि मुलाला या डोंगरावर घेऊन गेला. पण ऐन वेळी देवाने त्याच्या मुलाला बाजूला करून हातात बकरा ठेवला. देवाने दृष्टांत देऊन तेथे वस्ती करावयास सांगितले.

या वस्तीचा राजा किंग सोलोमन याने टेम्पल माऊंट डोंगरावर पहिले देऊळ ‘सेनेगॉग’ बांधले. ते बॅबेलिअन लोकांनी तोडले. त्यानंतर जे देऊळ बांधले ते रोमन राज्यकर्त्यांनी तोडले. ख्रिस्ताअगोदर १९ शतके राजा हेरॉड याने शहराभोवती चारही बाजूंनी भक्कम भिंत बांधून तटबंदी केली. त्याने बांधलेल्या देवळाच्या पश्चिमेकडील भिंतीच्या भागाला वेस्टर्न वॉल किंवा वेलिंग वॉल म्हणतात. ज्यूंसाठी तो अतिपवित्र भाग आहे.

त्याच्या अगदी मागोमाग डोम रॉकवर अल् अक्सा ही मुस्लीम काळातील निळ्या रंगाची अष्टकोनी मशीद आहे.

इस्लाम धर्मियांच्या इतिहासाप्रमाणे,

कुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे अल् अक्सा म्हणजे अतिदूरची मशीद. या ठिकाणी महंमद पैगंबरांना अल्लाचा साक्षात्कार झाला होता म्हणून टेम्पल माऊंट हा डोंगर पवित्र मानला जातो. हारम् अल शरीफ आणि अल् अक्सा मशीद त्या डोंगरावर आहे म्हणून तिला डोम ऑफ रॉक म्हटले जाते. आधी ती संपूर्णतया लाकडी होती. आठव्या शतकात खलीफ राशिदने बांधली होती. ही नेमक्या कोणत्या मुस्लीम खलिफाच्या काळात बांधली गेली हे नक्की सांगणे कठीण आहे असे म्हणतात. मशिदीमध्ये मुस्लिमेतर लोकांना जाता येत नाही.

प्रेषित महंमदांनी स्वर्गात जाण्यापूर्वीच्या रात्री येथेच देवाबरोबर संवाद साधला होता, असे मानले जाते.

मुस्लिमांमध्ये ‘अल-हरम-अल-शरीफ’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र परिसरात एका पठारावर दगडी घुमट आणि अल-अक्सा मशीद आहे. इस्लामच्या मते, मोहम्मद पैगंबर एका रात्रीत प्रवास करून मक्काहून इथं आले होते. या प्रवासात सर्व पंथांच्या भक्तांबरोबर त्यांनी प्रार्थना केली होती.

याठिकाणी असलेल्या दगडी घुमटामध्ये पायाचा दगड आहे जिथून पैंगबर मोहम्मद यांनी स्वर्गात प्रस्थान ठेवलं असं मानलं जातं.

तर ज्यू धर्मियांचं पवित्र स्थळ हे पश्चिमेकडील भिंतीच्या भागाला लागून वेस्टर्न वॉल किंवा वेलिंग वॉल हे आहे. कधीकाळी तिथं उभ्या असलेल्या पवित्र मंदिराच्या भिंतीचे ते अवशेष आहेत. अनेक ज्यूंच्या मते, दगडी घुमट हे त्यांचं पवित्र स्थळ आहे. या दगडी घुमटामध्ये असलेला पायाचा तो दगड आहे जिथून जगाची निर्मिती झाली होती. जिथं अब्राहम यांनी मुलगा इसाकचा त्याग करण्याची तयारी केली होती.

हा पायाचा दगडच आहे वादाचा मुद्दा..

धार्मिक इतिहास आणि धार्मिक वादाचा मुद्दा तर आपण पाहिला. पण खरा इतिहास तर दुसऱ्या महायुद्धानंतर सुरु झाला.

१९४७ मध्ये, युनायटेड नेशन्सने ब्रिटीशांच्या अखत्यारीत असलेल्या पॅलेस्टाईनला, दोन राज्यांमध्ये विभक्त करण्याची विभाजन योजना आणली. एक भाग ज्यू लोकांसाठी, जे दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधून विस्थापित झाले होते. आणि एक पॅलेस्टीनी लोकांसाठी जे बहुतांशी मुस्लिम होते. यात ज्यूंसाठी 55 टक्के जमीन देण्यात आली. तर उर्वरित 45 टक्के जमीन पॅलेस्टाईन राज्यासाठी होती.

त्याकाळात जेरुसलेम हे पवित्र शहर (तिन्ही धर्मीयांसाठी) हे आंतरराष्ट्रीय समुदायाकडे होते. तीन धर्मासाठी महत्त्वपूर्ण असल्याकारणाने त्याला विशेष दर्जा देण्यात आला.

पण १९४८ मध्ये पहिले अरब-इस्त्रायली युद्ध सुरू झाले. या युद्धात इस्रायलने पश्चिम किनारपट्टी, पूर्व जेरुसलेम, इजिप्शियन व जॉर्डनच्या ताब्यात असलेली गाझा पट्टी आपल्या ताब्यात घेतली. १९६७ च्या दरम्यान पुन्हा अरब-इस्त्रायली युद्ध सुरू झाले. यावेळी मात्र इस्रायलने संपूर्ण जेरुसलेम सोबतच ओल्ड सिटी आणि अल-अक्सा यांचा ताबा घेतला.

इस्रायलने घेतलेला ताबा हा बेकायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारा होता.

याच कालखंडात, सावकाश पाऊल उचलत इस्रायली सरकारने ओल्ड सिटी आणि पूर्व जेरुसलेमवर नियंत्रण मिळवले. १९८० मध्ये, इस्रायलने एक कायदा पास केला. यात जेरुसलेमला सार्वभौम असलेल्या इस्रायलची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले.

इस्रायलची ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारी होती. आज जरी इस्रायल जेरुसलेमवर मालकी हक्क दाखवत असले तरी, इस्रायलच्या या राजधानीला कोणत्याही सार्वभौम आणि लोकशाही देशाने पाठिंबा दिलेला नाही. तसेच जगाच्या मॅपवर ही तसं काही दिसत नाही.

जैसे थे कराराचा भंग

१९६७ नंतर झालेल्या युद्धबंदी करारात जॉर्डन आणि इस्त्रायलने सहमतीने अल-अक्साच्या अंतर्गत बाबींवर वक्फ किंवा इस्लामिक ट्रस्टचे नियंत्रण असेल आणि इस्राईल हे अल-अक्साच्या बाह्य सुरक्षेवर नियंत्रण ठेवेल असा करार केला. या करारात इतर धर्मियांना (मुस्लिम सोडून) भेट देता येऊ शकत होती मात्र प्रार्थना करण्याची परवानगी नाकारण्यात आली.

या कराराला ‘टेम्पल माउंट फेथफुल’ आणि ‘टेम्पल इन्स्टिट्यूट’ यासारख्या जुईश चळवळींनी चॅलेंज दिल.

त्यांनी कंपाऊंडमध्ये प्रवेश करण्यास परवानगी नाकारणाऱ्या इस्रायली सरकारच्या बंदीला आव्हान दिले आहे. घुमटात असलेल्या दगडावरच तिसरे ज्यू मंदिर उभारणार असा नारा दिला. असं म्हणतात कि, जैसे थे करार करून शांततेचा आव आणणाऱ्या इस्त्रायली सरकारकडूनच पॅलेस्टीनी विरोधी कारवायांना पैसा पुरविला जायचा.

१९९० ते आजअखेर इस्रायलने बऱ्याच मार्गांनी जेरुसलेम हस्तगत करण्याचा प्रयत्न चालविला. जस की जेरुसलेममध्ये पॅलेस्टाईन लोकांची संख्या जवळपास ४ लाखांच्या घरात होती. (म्हणजे जन्माने मूळ रहिवासी) पण तरीही त्यांना तेथील नागरिकत्व नसून केवळ रहिवासी असा दर्जा आहे. याउलट ज्युईश इस्रायली लोकांचे आहे. त्यांना रहिवासी नसूनही नागरिकत्व मिळते. बरं हे सगळं केवळ पॅलेस्टिनींचा छळ करण्यासाठी नसून, त्यांच्यावर कठीण परिस्थिती लादून शांतपणे जेरुसलेम शहराच्या बाहेर पॅलेस्टिनींना हद्दपार करणे हे मुख्य उद्दिष्ट असावे.

इस्त्राईलने पूर्व जेरुसलेममध्ये आंतरराष्ट्रीय नियम पायदळी तुडवत ज्यूंसाठी १२ बेकायदेशीर वस्त्या बांधल्या आहेत. तर पॅलेस्टाईनच्या लोकांना इमारतीसाठी परवानग्या नाकारल्या आहेत आणि बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याबद्दल शिक्षा म्हणून त्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.

१९९० नंतर सन २०००, २०१५, २०१७, आणि आत्ताही सातत्याने हा जेरुसलेमचा वाद पेटतच आहे. थोडक्यात हे प्रकरण थोडंफार आपल्या रामलल्ला आणि बाबरी मशिदीच्या किश्श्यासारखंच आहे. नव्याने होत असलेल्या या हिंसाचारामागचं मूळ कारण जुनंच आहे. ज्यू आणि पॅलेस्टाईन मुस्लिमांची ही भळभळती जखम आहे. या वादातून पॅलेस्टाईन आणि इस्रायलींच्या पिढ्यान पिढ्या खपल्या. वरून जरी हा भूभागाचा वाद दिसत असला तरी त्याच मूळ “प्रार्थना कुठं करायची आणि कोणत्या धर्माने करायची” याच समस्येत आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Pravin says

    ख्रिस्ती धर्मियांच्या विषयी पण माहिती द्या

Leave A Reply

Your email address will not be published.