कोल्हापुरात जिलेबी खाण्याचा माहोल स्वातंत्र्यदिनी का सुरु होतो ?

स्वातंत्र्य दिन असला की जणू मोठा उत्सवच. शाळेत झेंडा वंदन झालं की कवायत अन् मग सगळी भाषणं.प्रमुख पाहुणे म्हणुन आलेल्या गावातल्याच पुढाऱ्याचं ते रटाळ भाषण अन् आपल्याच मित्रांचा अध्यक्ष महाशय पुज्य गुरुजन वर्ग असा पाढा. हे सगळं ऐकुन आपल्याला नुसतं बोअर झालेलं. आपलं लक्ष फक्त खाऊ कधी येतोय यावरच.

चिवडा,बिस्कीटं,लेमन गोळ्या मिळाल्या की आपला उत्सव साजरा… भिडूंनो,आठवलं का आपलं लहानपण ?

पण कोल्हापूरची गोष्टच वेगळीय राव!

या उत्सवाला जिलेबीचा नाद लागलाय.इथं प्रत्येक शाळेत,कार्यक्रमात अगदी पेठांच्या गल्ल्यांमध्ये जिलेबीच वाटली जाते… या दोन दिवशी कोल्हापुरातल्या घरा घरात जिलेबी… व्हंय तर कोल्हापुरकरांचा विषयच हार्ड असतोय ओ…

काय हाय व्ह्यो विषय ? सांगतो थांबा.

कोल्हापूर म्हणलं की कसं एकदम तांबडा पांढरा रस्सा,चरचरीत मिसळ,झुणका भाकर अन् खर्डा…
आठवडयातून दोन तीनदा झणझणीत मटणावर ताव मारणा-या कोल्हापुरकरांचं गुळमाट खाण्याकडे कानाडोळाच ओ. पण स्वातंत्र्य दिन अन् प्रजासत्ताक दिन जवळ आला की अख्या कोल्हापुरात जिलेबी खाण्याचा माहोल तयार होतो. पावशेर का होईना जिलेबी घरात येतेच येते. दिवसभर जिलेबीवर नुसता ताव.

IMG 20210126 WA0095

आता कोल्हापुरात हे जिलेबीच प्रकरण कधी सुरु झालं सांगतो…

कोल्हापुरातले अस्सल कुस्तीशौकिन रामचंद्र बाबाजी माळकर यांचं कोल्हापुर महापालिकेचे जवळ मिठाईचं दुकान.कुस्तीचं खासबाग मैदान,मोतीबाग तालीम,गंगावेस तालीम,काळा ईमाम तालीम तिथुन जवळच.या माळकरांना कुस्तीचा जबरी नाद.खासबागला झालेल्या लढतीत ज्या – ज्या पैलवानानं मैदान मारलं त्यांचं कौतुक करुन, तोंड गोड करण्यासाठी ते प्रत्येक मल्लाला जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम करत.

मग काय झालं की हे जिलेबीचं प्रकरण सुरु….

माळकरांची जिलेबी केली की पैलवानांना फेमस अन् यांचं लोण पोहचलं जिल्हाभर.या दोन उत्सवाला गावा गावात जिलेबीचे स्टॉल लागतात.

१०० वर्ष होत आली तरी कोल्हापुरकरांच्या जिभेवरचा या जिलेबीचा गोडवा काय कमी होतं नाही बघा.

आजही माळकर यांची चौथी पिढी या मिठाईच्या व्यवसायात आहेत. माळकरांचे दुकान आज ज्या महानगरपालिकेच्या इमारतीच्या चौकात आहे. त्यालाच माळकर तिकटी असे नाव पण पडलंय. जुन्या काळी महानगरपालिकेची इमारत इथं नव्हती, त्या आधीपासून माळकरांचा वाडा आणि दुकान या परिसरात फेमस आहे.

लोकराजे अन् कुस्तीगीरांचे आश्रदाते शाहू महाराज,राजाराम महाराजांच्या कालखंडा पासून ते आत्ता पर्यत शाही कार्यक्रमात, कुस्तीगीरांना तसेच सणासुदीला जिलेबी वाटण्याची ही प्रथा कायम आहे. शाहू महाराजांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी कोल्हापुरात जिलेबी वाटल्याचा संदर्भ ही इतिहासात आहे. राजाराम महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यातही माळकरांकडून आणलेली जिलेबी वाटण्यात आल्याचे संदर्भ सापडले आहेत.

राजघराण्यात माळकर यांच्याकडून किती शेर जिलेबी आणली याचे दस्त इतिहासकारांच्या संग्रही आहेत.

राजघराण्यात महाराजांकडे रोज हजारभर जनता भोजनासाठी पंगतीला असे. त्यांच्यासाठी विविध खाद्यपदार्थ तयार केले जात होते. शाहू महाराज मात्र पंगतीला बसताना आपल्या सवंगड्याच्या हातातले पिठले भाकर खात अन् त्यांच्यासाठी खास तयार केलेले जेवण तसेच जिलेबी त्यांना वाढत.

माळकरांची ही जिलेबी झाली फेमस. करवीरनगरीत कुस्तीसाठी देश विदेशातील मल्ल येथे येत.शिवाजी पुतळ्याजवळील चौक हा रहदारीचा. त्यामुळे येथे पैलवानांसाठी तेव्हा तुपातील खास जिलेबी बनवली जात.

प्रसिद्ध पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबी आणि गामा यांच्या कुस्तीवेळी त्यांनी रामचंद्र बाबाजी माळकर हॉटेलमध्ये जिलेबी खाल्या होत्या असं जुनी जाणती लोकं सांगतात.

IMG 20210126 WA0098

आता या जिलेबीचं वेड जिल्ह्यात पसरलं आहे. शेकडो स्टॉल जिलेबीच्या विक्रीसाठी उभारले जातात. या ठिकाणीही मोठी उलाढाल होते.पनीर जिलेबी, इमरती, डॉलर जिलेबी, केशर, दूध, वेलची जिलेबी व रसभर जिलेबी, मावा जिलेबी असे काही जिलेबीचे फेमस प्रकार कोल्हापुरात मिळता.स्वातंत्र्याचा आणि प्रजासत्ताकाचा आनंददायी उत्सव गोड करणाऱ्या कोल्हापुरी जिलेबीची अशी गोष्ट…

गुळमाट खाणाऱ्या भिडूंसाठी ही जिलेबीची गोष्ट नक्कीच भारी वाटलं असेल….

  • पहिलवान भिडू

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.