भारताचा एक खेळाडू ज्याचा जगभरात बोलबाला होता, पण आपणाला त्याबद्दल माहिती नाही.

8 मार्च 1955 साली केरळ मधील मलबार येथील पेरावूर येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील व्हॉलीबॉल खेळाडू होते, त्याच्या वडिलांनी आपल्या सातही मुलांना व्हॉलीबॉल खेळ शिकवला. वयाच्या 16 व्या वर्षीच 1971 मध्ये तो केरळच्या राज्यस्तरीय टीम मध्ये दाखल झाला. पुढे तो जागतिक स्तरावर गौरवला गेला. त्याच्या मृत्यूनंतर इटलीमध्ये त्याच्या स्मरणार्थ स्टेडियम बांधण्यात आले.

आणि आजही भारतात व्हॉलीबॉलचा विषय निघतो त्यावेळी त्याचं नाव अभिमानाने घेण्यात येतं,

त्याच नाव होतं जिम्मी जार्ज.  

जिम्मी जार्ज याने केरळ राज्याचे 9 वेळा प्रतिनिधित्व केले. एक उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू असण्याबरोबरच तो एक चांगला जलतरणपटू देखील होता. पोहण्याच्या विविध स्पर्धांमधून त्याने ४ गोल्ड मेडल देखील जिंकले होते.

1976 साली मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या जिम्मीने शिक्षण सोडले आणि पोलीसात भरती झाला. 1979 साली एका प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून तो प्रोफेशनली व्हॉलीबॉल खेळायला लागला. आंतराष्ट्रीय पातळीवर त्याने अबू दाबी स्पोर्ट्स क्लब कडून खेळण्यास सुरवात केली.

त्यानंतर इटलीच्या एका क्लब सोबत करार केला, या क्लब कडून खेळताना पहिल्या सहा मॅच मध्येच त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली.

1978 साली बँकॉक येथे झालेल्या आशियन गेम्स मध्ये आणि 1986 साली सियोल येथे झालेल्या स्पर्धेत जिम्मी भरतीय संघाकडून खेळला. याच दरम्यान सियोल येथे झालेल्या आशियन गेम्स मध्ये भारतीय संघाने कास्यपदक जिंकले. 1986 साली सौदी अरेबियात गेलेल्या भारतीय व्हॉलीबॉल संघाचा तोच कॅप्टन होता. त्यानंतर हैद्राबाद येथे झालेल्या इंडियन गोल्ड कप इंटरनॅशनल व्हॉलीबॉल मॅच मध्ये 1986 साली भारतीय संघाने गोल्ड मेडल जिंकले, यात सगळ्यात मोठे योगदान जिम्मी जॉर्ज याचेच होते.

व्हॉलीबॉल खेळातील योगदानासाठी वयाच्या २१ व्या वर्षी जम्मी जॉर्ज यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानीत केले .

अबू द्बी स्पोर्ट्स क्लब कडून खेळत असतांना गल्फ भागातील सर्वात उत्कृष्ट खेळाडू म्हणून जिम्मीची ओळख निर्माण झाली. त्यानंतर फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील लोक जिम्मी जॉर्ज यांना ओळखू लागले, आणि ते खेळताना पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरायला लागलीत.

व्हॉलीबॉल या खेळाच्या माध्यमातून जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात जम्मी हे नाव पोहचले होते पण १९८७ साली इटली येथे एका मॅचसाठी गेलेल्या जम्मी जॉर्ज यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना जेवढी जॉर्ज कुटुंबासाठी दुख:दायक होती तितकीच ती जगभरातील व्हॉलीबॉल प्रेमींसाठी देखील धक्कादायक बातमी होती. इटली आणि केरळ मध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक स्टेडियम देखील बांधण्यात आले आहे. याबरोबरच केरळच्या पोलीस मुख्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलला देखील त्यांचेच नाव देण्यात आले आहे.

जॉर्ज परिवाराने जिम्मी जॉर्ज नावाने एक फौंडेशन देखील सुरू केले आहे, या माध्यमातून केरळ मध्ये क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या खेळाडूंना “जिम्मी जॉर्ज अवॉर्ड” देखील दिला जातो. व्हॉलीबॉल या खेळात भारताचे नाव जागतिक पातळीवर पोहचविणाऱ्या या खेळाडूचे आयुष्य प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे, पुढील कित्येक पिढ्या त्यांना लक्षात ठेवतील यात शंका नाही. कारण जेव्हा जेव्हा भारतात व्हॉलीबॉलची चर्चा होईल तेव्हा जिम्मी जॉर्ज हे नाव प्रत्येकाला नक्कीच आठवेल.

हे ही वाचा भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.