जीनांच्या लग्नादिवशी मुंबईच्या पारशांनी ब्लॅक फ्रायडे साजरा केला होता.

१९ एप्रिल १९१८. सकाळची वेळ. सर दिनशॉ पेटिट नेहमी प्रमाणे ब्रेकफास्ट टेबलवर आले. आवडता नाश्ता आणि त्यांचा लाडका पेपर द बॉम्बे क्रोनिकल सजवून ठेवला होता. त्यांनी पेपर वाचत ब्रेकफास्टचा पहिला घास मोडला आणि ती बातमी दिसली.

रतनबाई, सर दिनशॉ पेटीट यांची कन्या, धर्मपरिवर्तन करून मुस्लीम झाली आणि तिचे आज मा. एम. ए. जिनांशी लग्न होत आहे.

सर पेटिट यांना दातखीळच बसली. त्यांची लाडकी लेक पळून जाऊन एका मुस्लिम म्हाताऱ्याशी लग्न करत होती. 

सर दिनशॉ पेटीट म्हणजे त्याकाळचं मुंबईचं मोठे प्रस्थ. अगदी इराण पर्यंत त्यांचा व्यापार चालायचा. ‘बॉम्बे प्रेसिडेंसी असोसिएशन’चे ते अध्यक्षदेखील होते. अफाट संपत्ती असल्यामुळे फक्त पारशी समाजातच नाही तर ब्रिटिश सरकारमध्येदेखील त्यांचं मोठं वजन होतं. राणी कडून त्यांच्या घराण्याला सर ही मानाची उपाधी देखील देण्यात आली होती. 

या दिनशॉ पेटिट यांना राजकारणातही प्रचंड रस होता. भारताचा स्वातंत्र्यलढा तेव्हा उभा राहत होता. काँग्रेस मध्ये गांधीजींचे नेतृत्व नव्याने उदयास येत होते. दिनशॉ पेटिट यांचा एक राजकारणातील मित्र होता.

नाव बॅरिस्टर मोहम्मद अली जिना.

कधीही कोणतीही केस हरू शकत नाही अशी त्यांची कीर्ती होती. मुंबईत त्यांनी चांगलाच जम बसवला होता. अगदी देशाच्या राजकारणात मोठा नेता म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. गप्पिष्ट स्वभाव प्रचंड ज्ञान या मुळे त्यांनी सर दिनशॉ यांचं मन जिंकून घेतलं. मुंबईच्या राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडीपर्यंत त्यांच्या गप्पा चालायच्या.

सर दिनशॉ यांच्या सभेत जिना मुख्य वक्ते म्हणून असायचे. त्यांच्यामुळेच मुस्लिम असूनही जिना यांची पारशी समुदायातील उच्च्भ्रू लोकांशी गट्टी जमली.

दादरच्या पारशी क्लब मध्ये प्रवेश असणारे एकमेव व्यक्ती म्हणजे मोहम्मद अली जिना हे होते.

हळूहळू पेटिट यांच्या घरात देखील जिना यांचा वावर सुरु झाला. ते त्यांच्या कुटुंबाचा देखील भाग बनले. दिनशॉ यांचा पुण्यात बंगला होता आणि विकएंडला संपूर्ण कुटुंब तिकडे जात असे. त्यांच्या मुलाचं लग्न जमशेदजी टाटा यांच्या बहिणीशी झालं होत. ही सगळी मंडळी पुण्याला जायची तेव्हा मोहम्मद अली जिना देखील त्यांच्यासोबत या बंगल्यात दिसू लागले.

सर दिनशॉ यांना एकुलती एक मुलगी होती नाव रतनबाई उर्फ रत्ती.

ही रतन प्रचंड लाडाकोडात वाढली होती. पेटिट यांच्या घरात तिचा शब्द कधी पडू दिला जात नसे. अतिशय उत्साही, हुशार, खळेकर स्वभावाची रत्ती फक्त चौदा पंधरा वर्षांची होती पण तिची समज खूप मोठी होती. या रतनला टेनिस खेळायची आणि वाचनाची भारी आवड होती. मोठमोठ्या इंग्रजी लेखकांच्या रोमँटिक कादंबऱ्या वाचनात ती रमून जायची. मोठमोठ्या इंग्रजी कविता तिला पाठ असायच्या. वाढदिवसाला गिफ्ट म्हणून तिला दागिने, कपडे नाही तर पुस्तकं हवी असायची.

पुण्याच्या पेटिट बंगल्याच्या लॉनवर ती जेव्हा टेनिस खेळायला जायची तेव्हा ऑफिसच्या कामात गुंतलेले मोहम्मद अली जिना हळूच सगळ्या फायली बाजूला टाकून टेरेस वरून तिला पाहत बसायचे.

१९१६ सालच्या सुट्टीत पेटीट कुटुंब दार्जिलिंगला फिरायला गेले, तेव्हा जिनाही त्यांच्यासोबत होते. दार्जिलिंगच्या गुलाबी थंडीत जिन्ना यांनी रतनला आपल्या प्रेमात पाडलं. जिना यांची भाषणे ती लहानपणापासून ऐकत आली होती, त्यांच्या बुद्धिमत्तेवर वडिलांप्रमाणे रतन देखील भाळली होती.

मुंबईत परतले आणि त्यांचं प्रेम आकार घेऊ लागलं. रतन कधी क्लबमध्ये, कधी हायकोर्टाच्या चेंबरमध्ये जिनांना भेटायला येई. यांचं काही चाललंय या बद्दल पेटिट यांच्या घरात कोणालाच कल्पना नव्हती. त्यांना वाटायचं रतन आपल्या जिना काकांकडे काही कामासाठी भेटत आहे.

खरं तर वयाची चाळीशी ओलांडून गेलेल्या मोहम्मद अली जिना यांचं यापूर्वी एक लग्न झालं होतं.

एमीबाई नावाच्या मामेबहिणीशी ते २५ वर्षांचे असताना लग्न झालं होतं. मात्र ते लग्नानंतर बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले आणि काही महिन्यातच एमीबाईचं निधन झालं. तिच्या मृत्यूचा जीनांवर इतका मोठा धक्का बसला की त्यांनी पुन्हा कधी लग्न करायचं नाही असा निर्णय घेतला.

मात्र रतन आली आणि त्यांच्या रखरखीत आयुष्यात पुन्हा हिरवळ फुलून आली.

मात्र त्यांच्या प्रेमकहाणीत दोन गोष्टींचा अडसर होता. एक तर वयातील फरक आणि दुसरा म्हणजे धर्म. खरंतर दिनशॉ पेटिट हे विचारांनी सेक्युलर होते. पाश्चात्य मॉडर्न विचारांचा त्यांच्यावर प्रचंड पगडा होता. जिना हे देखील काय कट्टर मुसलमान नव्हते.

एकदा पेटिट आणि जिना गप्पा मारत बसले होते.राजकारणावर चर्चा होत असताना अचानक जिनांनी विचारले,

सर, तुम्हाला आंतरजातीय विवाहांबद्दल काय वाटतं?”

पेटीट यांना काहीच कल्पना नव्हती. ते म्हणाले,

“मी तर आंतरजातीय विवाहांना उत्तेजन देण्याच्या विचारांचा आहे. देशात जेवढे जास्त आंतरजातीय विवाह होतील तेवढंच राष्ट्रवादाला पोषक.”

इथंच जिना यांनी सर दिनशॉ यांना खिंडीत पकडलं. ते म्हणाले,  ” खूपच छान! मग मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे.”

दिनशॉ पेटिट यांना धक्काच बसला. त्यांनी तिथल्या तिथे जिना यांना घरातून हाकलून लावले. पुन्हा माझ्या पोरीशी संपर्क ठेवायचा नाही अशी ताकीद दिली. घरी आल्यावर रतनची देखील खरडपट्टी काढली. तिने तर स्पष्ट सांगितलं, लग्न करीन तर जिना यांच्याशीच. दिनशॉ यांनी डोक्याला हातच लावला.

जिनांना रोखण्यासाठी पेटिट यांनी कायदेशीर आयडिया वापरायचं ठरवलं. त्यांनी थेट हायकोर्टाकडून मनाईहुकूम मिळविला, त्यात असे म्हटले होते की,

रतनबाई अल्पवयीन आहे म्हणून तिच्याशी लग्न करणे बेकायदेशीर आहे, शिवाय जिनांनी अल्पवयीन रतनशी संपर्क ठेवू नये.

त्यानंतर जवळजवळ दीड दोन वर्षे जिना-रतनमध्ये संपर्क नव्हता.

घरच्यांचा विरोध आणि कोर्टाच्या हुकुमानंतर त्यांनी लग्नाचा निर्धार आणखी पक्का केला. कोर्टात सुनावणीच्या वेळी हे दोघे हळूच एकमेकाला संदेश पाठवत असत. यातूनच त्यांनी पुढच्या योजना आखल्या असाव्यात. पेटिट यांना देखील शंका होती म्हणून त्यांनी रतनला घरातून बाहेर पडायचं पूर्ण बंद करून टाकलं.

२० फेब्रुवारी १९१८ रोजी रतन १८ वर्षाची होणार होती. काही वावगं घडू नये म्हणून दिनशॉ पेटीट यांनी तिच्यावर पाळत ठेवली होती.  ती रोज फक्त कुत्र्याला फिरवण्यासाठी घरातून बाहेर पडत असे. तिच्या मागावर काही नोकर ठेवले होते. पण बड्डेच्या दिवशी देखील काही झालं नाही.

दुसरा दिवस देखील असाच गेला. रोज केवळ कुत्रा फिरवण्यासाठीच रतन घरून बाहेर पडे. महिनाभर काहीच घडलं नाही म्हणून तिच्यावरच पाळत शिथिल करण्यात आली. पेटिट यांना वाटलं कि रतन जिना यांना विसरली. 

पण तस घडलं नव्हतं. चलाख जिना यांनी सगळं नियोजन करून ठेवलं होतं. १८ एप्रिल १९१८ च्या सकाळी रतन कुत्र्याला फिरवायला म्हणून बाहेर पडली पण घरी परतली नाही.  आपल्या कुत्र्याला घेऊन ती थेट जिना यांच्या बंगल्यावर पोहचली. तातडीने मौलवीला पाचारण करण्यात आले, जामिया मशिदीत तिचं धर्मांतर घडवून आणण्यात आले.

दुसऱ्या दिवशी १९ तारखेला हॉटेल ताजच्या बॉलरूममध्ये दोघांचं लग्न झाले. रतीला हुंडय़ात १००१ रुपये मिळाले आणि जिनांनी तिला १,२५,००० रुपये भेट स्वरूपात दिले.

रतनने धर्म बदलावा यासाठी जिनांनी दबाव टाकला यामागे एक कारण सांगितलं जातं. त्याकाळी जिना हे इंग्रज सरकारच्या इंपीरियल लेजेस्लेटिव कौन्सिल मध्ये मुस्लिम समुदायचे प्रतिनिधित्व करत होते त्यामुळे जर त्यांनी आपले पद शाबूत राहावे यासाठी रतनला धर्मांतर करायला भाग पाडलं.

लग्नाचा दिवस शुक्रवार होता त्यामुळे विरोध म्हणून पारसी समुदायाने मुंबईत, ‘ब्लॅक फ्रायडे’ पाळला.

पुढे आयुष्यभर सर दिनशॉ पेटिट मोहम्मद अली जिना यांच्याशी बोलले नाहीत. असं म्हणतात की जिना यांनी आपल्या बायकोला मुस्लिम धर्माचे कट्टरतेने पालन करायचा कधी आग्रह केला नाही. रतनला त्यांनी रोज पाळायला सांगितलं नाही किंवा कधी बुरखामध्ये परिधान करण्याचा आग्रह केला नाही. मुस्लिम लीगच्या सभेलादेखील ती मॉडर्न कपडे घालून यायची.

अगदी व्हॉईसरॉयला भेटीत देखील खणखणीत उत्तर देणारी रतन बाई स्वतंत्र विचारांची आधुनिक महिला होती. फक्त अंगावरचे कपडे आणि एक कुत्रा घेऊन जिना यांच्या बंगल्यात आलेल्या रतीने त्यांच्या घराला घरपण आणलं. त्यांना एक गोड मुलगी झाली.

पण पुढे मोहम्मद अली जिना राजकारणात पूर्णपणे गुरफटून गेले. महात्मा गांधींच्या व काँग्रेसच्या चळवळीमुळे त्यांची लोकप्रियता उतरणीस लागली होती. त्यामुळे त्यांनी नव्यानेच कट्टरतावाद स्वीकारला. विचारात फरक पडत असल्यामुळे रतन व त्यांच्यात भांडणे होऊ लागली.

दोघांच्यात दुरावा आला व यातच फक्त वयाच्या २८ व्या वर्षी रतन बाईचा मृत्यु झाला.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. मुबारक says

    अतिरंजित करून लिहिलेली प्रेम कहाणी. प्रत्येक वेळी मुस्लीम असून ही, हा शब्द म्हणजे मुस्लीम विरोधी मानसिकता! जीना हा बनिया होता आणि तो गाँधीच्या जातिचाच होता हे विसरु नका

Leave A Reply

Your email address will not be published.