गांधीगिरी स्टाईल आंदोलन करुन चर्चेत आलेल्या भावेंनी आता पर्यंत रुग्णांचे ५ कोटी वाचवले आहेत

अर्धनग्न होऊन गांधीगिरी करत केलेल्या आंदोलनाच्या फेसबुक लाईव्हचा एक व्हिडीओ कालपासून राज्यात प्रचंड व्हायरल होतं आहे. प्रचंड म्हणजे आकडेवारीत सांगायचं झालं तर आता पर्यंत त्या व्हिडीओला रिच आहे १ कोटी पेक्षा जास्त. त्यातील व्हिव्ज आहेत तब्बल २२ लाख, तर शेअर्स आहेत जवळपास ३४ हजारांच्या घरात. लाईक्स सांगायचे झाले तर ते आहेत साधारण १ लाख २५ हजारच्या घरात.

हा एक कोटी लोकांपर्यंत पोहोचलेला आंदोलनाचा व्हिडीओ आहे नाशिकच्या जितेंद्र भावे यांचा. 

कोण हे जितेंद्र भावे या प्रश्नाचं उत्तर सांगायचं झालं तर ते आहेत महाराष्ट्रातील आम आदमी पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आहेत. सोबतच नाशिक आणि इतर जिल्ह्यांमध्ये ते दिल्लीच्या धर्तीवर ‘मिशन हॉस्पिटल’ नावाची एक चळवळ चालवतात. यातून ते रुग्णांना ऑक्सिजन, रेमडिसीव्हिर, अशा गोष्टी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. सोबतच ते रुग्णांचं हॉस्पिटलमधील बिलं कमी व्हावं म्हणून देखील प्रयत्न करतात.

असाच एक प्रयत्न त्यांनी मंगळवारी २५ मे रोजी केला होता.

त्याचं झालेलं असं की, नाशिकमधील व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये अमोल जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना उपचारासाठी दाखल केलं होतं. दाखल करते वेळी हॉस्पिटलने त्यांच्याकडून दिड लाख रुपये डिपॉझिट भरून घेतलं. डिस्चार्ज झाल्यानंतर अमोल जाधव यांच्या हातात सगळं मिळून तब्बल १० लाखांचं बिल देण्यात आलं, त्यांनी ते भरलं देखील.

पण यानंतर जाधव यांनी डिपॉझिट म्हणून भरलेल्या दिड लाख रुपयांची मागणी केली, पण त्यांच्या म्हणण्यानुसार हॉस्पिटल प्रशासनानं हे डिपॉझिट देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी भावेंना मदतीची मागणी केली. भावेंनी तात्काळ हॉस्पिटल जातं प्रशासनाशी चर्चा सुरु केली. हो-नाही म्हणतं गोष्ट आंदोलनावर आली.

यावर उपाय म्हणून भावेंनी तिथंच फेसबुक लाईव्ह केलं आणि अंगावरील कपडे काढत अर्धनग्न आंदोलन सुरु केलं. 

आंदोलन सुरु झाल्यानंतर काही वेळातच हॉस्पिटल प्रशासनानं हे दिड लाख रुपये परत करण्याची तयारी दाखवली, आणि ते जाधव यांना परत केले. यानंतर ही मोहीम फत्ते झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच तिथं मुंबई नाका पोलिस दाखल झाले आणि त्यांनी भावे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

तब्बल सहा तासाच्या चौकशीनंतर भावे यांना सोडण्यात आले. यात त्यांच्यावर विनापरवना आंदोलन करणे तसेच असभ्य वर्तन करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान जितेंद्र भावे यांच्या समर्थनार्थ आलेल्या २५ जणांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन, बेकायदेशीर जमाव गोळा करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

IMA ला आव्हान :

मात्र यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी नाशिक मधील डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनला आव्हान दिलं आहे. ते म्हणाले नाशिक मधील १०० टक्के खाजगी हॉस्पिटल्समध्ये पारदर्शक कारभार चालतो हे जाहीर करावं आणि सिद्ध करावे. तसं झालं तर ‘मिशन हॉस्पिटल’ हि चळवळ बंद केली जाईल.

खरंच रुग्णांसाठी आंदोलन कि स्टंट?

माध्यमांशी बोलताना जितेंद्र भावे यांनी दावा केला कि या मिशन हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही आता पर्यंत कमीत कमी ४०० रुग्णांचे ५ कोटी रुपये वाचवले आहेत.

मात्र यादरम्यान जितेंद्र भावे यांचं नाव चर्चेत आलं नव्हतं. पण मंगळवारी  केलेल्या आंदोलनानंतर ते राज्यभरात चर्चेत आले. त्यामुळेच एका बाजूला लोक जरी भावे यांना पाठिंबा देत असले तरी दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर स्टंटबाजी केल्याचा आरोप करत आहेत.

त्यामुळेच या सगळ्याची सत्यता जाणून घेण्यासाठी ‘बोल भिडू’ने नाशिक मधील नामवंत वृत्तपत्राच्या स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 

नाशिकमध्ये जितेंद्र भावे यांची आंदोलन नवी नाहीत. याआधी देखील २१ मे रोजी त्यांच्यावर विजन हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी आंदोलन केले होते. यात त्यांच्यावर काल दुसरा गुन्हा पण दाखल झाला आहे. ते मागच्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये मिशन हॉस्पिटलची चळवळ चालवत आहेत. यात ते रुग्णांना शक्य असेल ती सर्व मदत करतात.

काल त्यांचा वाद झाला त्यामुळे त्यांनी कदाचित हे कपडे काढण्याचं आंदोलन केलं असावं. पण त्याला स्टंट म्हणता येणार नाही. कारण याआधी त्यांनी ३५० ते ४०० रुग्णांना मदत केली आहे, यात त्यांनी रुग्णांचे ४ ते ४.५० कोटी रुपये वाचवले आहेत. त्याचा गाजावाजा कधी हि केला नव्हता. त्यामुळे तो आता करायचा म्हणून त्यांनी हे आंदोलन असं म्हणता येणार नाही.   

नाशिकमध्ये बिलाच्या तक्रारी नवीन नाहीत..

नाशिकमध्ये बोळाच्या बाबतीत तक्रार येण्याचे प्रकार नवीन नाहीत. प्रशासनाकडून प्रत्येक खाजगी रुग्णालयावर ऑडिटरची नेमणूक केली आहे. या दरम्यान २ हॉस्पिटलची मान्यता देखील रद्द करण्यात आली आहे. तर व्होकार्टच्या बाबतीत देखील या पूर्वी अशा तक्रारी आल्याचं स्थानिक सांगतात.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.