विरारच्या शिवकालीन गडावर जीवदानी मातेचे मंदिर अनेक शतकांच्या आख्यायिका घेऊन उभे आहे .

किल्ला आणि किल्ल्यावरची देवी हे समीकरण आपल्याला काही नविन नाही. अस म्हणतात की,पुरातन काळापासून गड बांधायचा ठरल की पहिल्यांदा गडाची स्वामिनी म्हणजे गडाची देवी निर्माण केली जायची. एखादी मुख्य जागा पाहून, एक तांदळा स्थापन करून, एक योग्य पाषाण स्थापन करून, त्याची पूजा-अर्चना करून, त्यामध्ये देवत्व निर्माण केले जायचे. आणि मग किल्ला बांधला जायचा. हे असे करण्यामागचे कारण म्हणजे त्या जागेला एकदा का दैवत्व निर्माण झाले की मग त्या वास्तूला कसलच भय उरत नाही. असा त्याकाळी लोकांचा समज होता.

महाराष्ट्रात अशी बरीच उदाहरणे आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे शिवनेरीची शिवाई, लिंगाण्याची लिंगाई, रायगडावरील शिरकाई, तोरणाची तोरणजाई, तर काळदुर्गाची काळुबाई. संपुर्ण यादी काढायची झाली तर एक स्वतंत्र लेख तयार होईल. आज आपण अश्याच एका किल्याला व कालांतराने निर्माण झालेल्या देवी मंदिराला भेट देणार आहोत.

विरार येथील जीवदानी डोंगरावर वसलेली जीवदानी माता ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रातील अनेक शक्तीपीठांपैकी एक अशी तिची ओळख आहे. जीवदानी देवी ज्या डोंगरावर आहे, तो शिवकालीन जीवधन किल्ला आहे. आपल्या महाराष्ट्रात जीवधन नावाचे दोन किल्ले आहेत. पहिला पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ आणि दुसरा विरार येथील जीवदानी देवीचा डोंगर. येथे आजही तटाचे काही कोरीव दगड आपल्याला पाहायला मिळतात. काळाच्या ओघात या ऐतिहासिक किल्ल्याचे अस्तित्व नष्ट झाले.

या देवीबद्दल खुप अख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात. अस म्हणतात की, पाच पांडव भावांनी एका गुहेत या देवीची स्थापना केली होती. 

तर अस पण सांगितल जात की, गडाच्या पायथ्याशी शेतात अनोळखी गाय रोज चरण्यासाठी येत असे. पण ती गाय कोणाची हे समजले नाही. दिवसभर ती चरायची आणि निघून जायची. एक दिवस शेताच्या मालकाने त्या गाईचा पाठलाग केला. ती गाय पूर्वेकडील डोंगरावर चढू लागली. तसा तोही डोंगर चढून गेला. डोंगरावर जिथे मैदानी जागा होती तिथे ती गाय थांबली. त्याचक्षणी एक सुंदर स्त्री तिथे प्रकटली. 

शेतकऱ्याला वाटले हीच त्या गायीची मालकीण आहे, त्याने तिच्याजवळ चाऱ्याचे पैसे मागितले. पैसे काढून त्या शेतकऱ्याच्या हातावर ठेवणार तोच तो म्हणाला,

 ‘बाई, मी अस्पृश्य आहे. मला स्पर्श करू नकोस.’ 

हे शब्द कानावर पडताच ती स्त्री नाहीशी झाली.आणि गायीने कड्यावरून स्वत:ला झोकून दिले. या बलिदानाचे रहस्य अजून कोणाला उलगडले नाही. पण गाईने आपल्या जीवाचे दान केले म्हणून या डोंगराला जीवदानीचा डोंगर व तेथे वास करणारी जीवदानी देवी प्रसिद्ध झाली. 

१९४६ ते ५६ या काळात बारकीबाय नावाची भक्त रोज गडावर जाऊन नेमाने देवीची पूजा करु लागली. त्यानंतर १९५६ मध्ये देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. २३ फेब्रुवारी १९५६ मध्ये जीवदानी मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या गडावर जाण्यासाठी आज दोन मार्ग आहेत. एक वाट जीवदानीपाडा येथून आहे.

तर दुसरा ऐतिहासिक पुरातन मार्ग आज पाचपायरी या नावाने ओळखला जातो.

आज जुन्या गडाचा कायापालट होऊन सात मजली उंच जीवदानी मंदिर उभारले गेले आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून हवेशीर आहे. जीवदानी देवीचा गाभाराही प्रशस्त आहे. देवीला चांदीचे सुंदर असे मखर आहे. जीवदानी देवीची मूर्ती संगमरवरी असून मुद्रा प्रसन्न व रेखीव आहे. देवीच्या शेजारीच पुरातन त्रिशूळ ठेवलेला आहे.आज देवी जेथे उभी आहे त्या जागी पूर्वी लेणी होती असे म्हणतात.

तसेच देवीच्या डाव्या हाताला छोटी लेणी होती व उजव्या हाताला अंदाजे पंधरा फूट लांबीची एक गुहा आहे. या गुहेला कृष्णविवर म्हणतात. कृष्णविवर गुहा सोडुन सर्व ऐतिहासिक वास्तू नष्ट झाल्या आहेत.

माथ्यावर काळभैरव व कालिकामातेचे मंदिर आहे. पूर्वी या कालिकामातेच्या मंदिराच्या वरच्या भव्य शिळेवरून कोंबडे, बकरे कापून त्यांचे बळी देऊन त्यांचे अवशेष या शिळेवरून खाली टाकले जायचे. पण जीवदानी ट्रस्टने या प्रकाराला आळा घालून ही प्रथा कायमची बंद केलेली आहे.

जीवदानी डोंगराच्या पायथ्याखाली पापडखिंडी पाण्याचे धरण व या धरणाच्या पाठी डोंगर कपारीत जीवदानी देवीची भगिनी बारोंडा देवीचे कडय़ाकपारीत वसलेले स्वयंभू स्थान आपल्याला पाहायला मिळते.

इतिहास आणि आख्यायिका या दोघांचा अनोखा संगम असणारे विरारचे जीवदानी मातेचे मंदिर.

  •  कपिल जाधव

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.