कुस्तीच्या मैदानात हाकारी पेटली, “जिवा महाला आला !!”

रायगड जिल्ह्यातील छोटसं गाव उमरठ. हजारभर लोक रहात असतील. पण गावाची ओळख म्हणजे छ.शिवाजी महाराजांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांच गाव. तानाजींचा मोठा चौसोपी वाडा होता. उमरठ गावाची यात्रा सुप्रसिद्ध होती. यात्रेत संध्याकाळी कुस्तीची दंगल भरवली जायची.

त्या वर्षीची यात्रा खास होती. जनतेचं राजं छ. शिवाजी महाराज गावात येणार होते.

तस बघितल तर महाराज स्वराज्याच्या धामधुमीत होते. त्यातून त्यांना वेळ मिळेल की नाही असच गावकर्यांना वाटत होतं पण  राजांची आणि तानाजींची मैत्री लहानपणापासूनची. आपल्या सवंगड्यांचा आग्रह त्यांना टाळता आला नाही.

त्यादिवशीची कुस्ती होती  फुलाजी बांदलांचा हिरडस मावळातला पठ्ठ्या भिकाजी ढेरे विरुद्ध खुद्द बाजी पासलकरांचा पठ्ठ्या लखू बेरड. दोघेही नावाजलेले पैलवान होते. महाराज येणार म्हणून पंचक्रोशीतील रयत उमरठमध्ये गोळा झाली होती. कधी नव्हे ते बायाबापड्यानी देखील कुस्तीच्या दंगलीच्या इथे गर्दी केली होती. मैदान भरले होते.जिंकणाऱ्याला राजांच्या हस्ते सोन्याचे कडे देण्यात येणार होते.

छोट्या मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला. आणि वर्दी आली,

“राजं आलं, राज आलं”

दूरवरून घोड्याच्या टापांचा धुरळा उडत होता. महाराज खरोखर आले घोड्यावरून उतरले व झपझप मैदानाच्या दिशेने येऊ लागले. डोक्यावर बांधलेलं मंदिल, तेजस्वी मुद्रा, करारी डोळे, कमरेला लटकणारी तलवार. जमलेली लोकं डोळ्यात प्राण आणून त्यांच्याकडे पहात होते. राजांच्या जयजयकाराच्या ललकारी येत होत्या. महाराजांनी थेट जाऊन तानाजींना मिठी मारली.

कुस्ती सुरु व्हायची चिन्ह दिसत नव्हती. पैलवान लखू बेरड अजून पत्ताच नव्हता.

तेवढ्यात कोणी तरी खबर आणली की रात्री बाजी पासलकर यांच्या गावावर नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी लखू बेरड स्वत: गेला होता. त्याने नुसत्या हाताने वाघाला ठार केले. पण वाघाच्या हल्ल्यात लखू जबर जखमी झाला.

आता कुस्ती होणार नाही म्हणून लोक निराश झाले. खुद्द राजा आपल्या गावी आलाय आणि कुस्ती रद्द होते म्हणजे काय? गावकर्यांना हा आपला अपमान वाटत होता. भिकाजीला कुस्ती न खेळता बक्षीस मिळणार होते. कोणी तरी मैदानात घोषणा केली,

” मंडळी, लखू बेरडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. म्हणून तो आज लढू शकत नाही.या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल ?असेल तर समोर या.”

ऐनवेळी भिकाजीशी लढायला वाघाचं काळीज लागणार होतं. इतक्यात एका कोपर्यातून कुजबुज सुरु झाली. एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात ये होता. त्याला पाहून आरडाओरडा सुरु झाला.

“आरं आला रं जिवाजी आला ”

त्या घोषणा ऐकून महाराजांची ही उत्सुकता चाळवली. त्यांनी तानाजींच्यापाशी चौकशी केली. तानाजी म्हणाले, 

”राजं , ह्यो जिवाजी ,आपल्या हिकडचाच हाय, कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा. दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय. याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होतं..निजामशाहीचा दंगा झाला तवा ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला.तेनच याला तयार केलाय.”

शिवराय थोडसे चमकले. त्यांनी सावरून मैदानात तो काय करतो यावर लक्ष केंद्रित केलं.

कुस्तीची सलामी झडली. दोन्ही पैलवानांच्या अंगावर लाल माती टाकण्यात आली. अनुभवी भिकाजीने आक्रमण केलं. ठोक्यावर ठोके टाकून जिवाला खेचण्याचा प्रयत्न त्याने सुरु केला ,पण जिवाजी त्याच्या हातात गावत नव्हता. ताकद तर होतीच पण तेवढाच तो चपळ देखील होता. डाव-प्रतिडावात बराच वेळ चालला होता. प्रेक्षकांचा जीव खालीवर होत होता. इतक्यात भिकाजीने vवेगात पटात शिरायचा प्रयत्न केला ,पण सावध जिवाने फिरवून बाहेरची टांग लावली.

पैलवान भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.

सगळा गाव वेड्यासारखा ओरडू लागला. अनेक जण रिंगणात घुसले, जिवाला अक्षरशः डोक्यावर घेवून नाचू लागले.

तितक्यात शिंगे-करणे गरजू लागली. खुद्द राजे खाली आले. सगळी गर्दी पटापटा बाजूला झाली. शिवरायांनी हसत हसत जिवा महालाला मिठीच मारली. त्याला १० शेराचे सोन्याचे कडे बक्षीस दिल आणि विचारल,.

“जिवा काय करतोस ??”

जिवा उद्गारला ,” काय बी नाय, वरातीत दांडपट्टा फिरवतो, दंगलीत कुस्त्या खेळतो.”

राजे हसले. त्यांनी त्याची नियुक्ती आपला अंगरक्षक म्हणून केली. त्याच काम दांडपट्टा फिरवण्याचंच होत पण फक्त गनीमाच्या विरुद्ध. पुढे कायम महाराजांच्या शेजारी सावलीप्रमाणे  जिवा राहू लागला.

छ. शिवाजी महाराजांनी जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या भेटीत अफझलखानाचा कोथळा काढला तेव्हा खानाच्या ‘सय्यद बंडा’ नावाच्या रक्षकाने महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाने सय्यद बंडाचा महाराजांवर हल्ला करणारा हात वरच्यावर तोडून टाकला आणि स्वराज्याचे प्राण वाचवले.

“होता जिवा म्हणून वाचला शिवा’, ही म्हण या प्रसंगावरून पडली.

रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कान्होजी जेधे यांच्या जहागीर आंबवडे गावी, वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच जीवा महाला यांची समाधी आहे.

दांडपट्टा चालविण्यात महाले समुदाय हा पटाईत होता आजही महाले समुदायातील म्हातारे लोक दांडपट्टा चालवितात.

छ. शिवाजी महाराजांच्या आणि जिवा महालाच्या या पहिल्या भेटीचे ऐतिहासिक संदर्भ मिळतील किंवा नाही पण बारा मावळातल्या या जुन्या जाणत्या लोकांकडून ही कथा नक्की ऐकायला मिळते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.