JNU स्थापन करणाऱ्या इंदिराजींना विद्यार्थ्यांनी आंदोलन करून राजीनामा द्यायला लावला.

आज भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती. त्याच्या नावाने सुरु झालेले विद्यापीठ म्हणजेच जेएनयुचाही आज स्थापना दिवस. या विद्यापीठाला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहे.
या विद्यापीठाने आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे. जेएनयू जसा डाव्याच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तसा तो उजव्याचाही आहे. कारण इथे देशभरातून आणि समाजाच्या विविध स्तरातून विद्यार्थी उच्च-शिक्षणासाठी खडतर प्रवेश परीक्षा देऊन येतात.
अस म्हणतात की इथे चर्चेला मोकळ वातावरण असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक विद्यार्थी आपले सामाजिक अनुभव, तसंच पूर्वग्रह व्यक्त करतात. जगभरातून आलेले मोठमोठे अभ्यासक मार्गदर्शक यांच्याबरोबर वादविवाद करून आपल मत तपासू शकतात.

इथे विद्यार्थी बेधडकपणे अनेकदा आंदोलने करतात. त्यांच्या सामाजिक राजकीय बाजूची जडणघडण तिथे होते. त्यामुळे जेएनयू अनेक अर्थांनी देशाचा आरसा आहे.

जेएनयुची सुरवातही खूप इंटरेस्टिंग होती.

सालं होतं १९६९ देशाला स्वातंत्र्य मिळून दोन दशकं उलटली होती. भारताचा गाडा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत होता. देशाची सुत्रे इंदिरा गांधीच्या हातात होती. त्यावेळी भारतात मोजकीच अशी विद्यापीठ नावाजलेली होती. ही सगळी विद्यापीठं ब्रिटीशकालीन होती. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या तरुणांना त्यांच्या वैचारिक अवकाशाला जागा देणार विद्यापीठ सुरु करण्याची गरज होती.
नेहरूंनी म्हटलं होतं, विद्यापीठाचा उद्देश मानवी मूल्यांचे संवर्धन आहे. सहिष्णुतेचे, तर्काचे, संकल्पनांच्या शोधाचे माहेरघर आणि सत्याचा शोध म्हणजे विद्यापीठ. मानवी संस्कृतीच्या उच्च आदर्शप्राप्तीची अविरत चाललेली शोधयात्रा म्हणजे विद्यापीठ.

त्यामुळे इंदिराजींनी पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या जन्मदिवशी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी दिल्लीत जेएनयूूची मुहुर्तमेढ रोवली. इथून पुढं सुरू झाला जेएनयू विद्यापीठाचा प्रवास.

१९७० सालं हे भारतात राजकीय संघर्षाचा काळ होता. या राजकीय संघर्षांचा परिणाम जेएनयूच्या जडणघडणीत पडला. कारण या दशकात डाव्या आणि समाजवादी चळवळीचा भारतात बोलबाला होता, त्याला जेएनयुमधील वादविवादांनी वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले. त्या
दशकांमध्ये जेएनयुचे बुद्धिजीवी हे नक्षलवादी चळवळ, संसदीय डाव्यांमधील डावे-उजवे आणि लोहियाप्रेरित समाजवादी यांच्यात विभागलेले होते.
जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन उभा केले, संपूर्ण देशात संप सुरु केला आणि संतापलेल्या इंदिरा गांधीनी  आणीबाणी लागू केली. आणीबाणीचे २१ महिने सरकारने प्रचंड दडपशाही केली. राजकीय विरोधकांना , विचारवंतांनां तुरुंगात टाकले, वर्तमानपत्रावर निर्बंध लादले. इंदिरा गांधींचा हुकुमशाही चेहरा लोकांच्या समोर आला.
वैचारिक स्वातंत्र्यावर घाला आल्यावर जेएनयुमधले विद्यार्थी शांत बसने शक्य नव्हते. तेथेही आंदोलने झाली. इंदिरा गांधीनी CRPF जवानांच्या मदतीने ती दडपण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देश सरकारच्या विरोधात पेटून उठला होता.

जनतेच्या संतापाची अखेर इंदिरा गांधीना जाणीव झाली. त्यांनी आणिबाणी मागे घेतली. देशात निवडणुका झाल्या. त्यात कॉंग्रेसचा आणि इंदिरा गांधींचा मोठा पराभव झाला.

इंदिरा गांधी आपल्या प्रधानमन्त्रीपदाच्या काळात जेएनयुच्या कुलपती होत्या. मात्र पराभव झाल्यावर ही त्यांनी जेएनयुच्या कुलपतीपदाचा राजीनामा दिला नव्हता.
अखेर विद्यापीठातील मुलांनी इंदिरा गांधींच्या घरावर मोर्चा काढला. त्याचे नेतृत्व करत होते पुढे जाऊन कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष झालेले सीताराम येचुरी. त्यांनी या आधीच कुलगुरूंनां देखील राजीनामा द्यायला भाग पाडले होते. पराभूत झालेल्या इंदिराजी या विद्यार्थ्यांच्या मोर्चाला सामोरे गेल्या. त्यांना निवेदन देण्यात आले.

त्यांनां ही गोष्ट आवडली नाही पण दुसऱ्याच दिवशी जेएनयुच्या कुलपती पदाचा राजीनामा दिला.

IG1

१९९० च्या दशकात भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रव्यापी विस्ताराचे पडसाद जेएनयुमध्ये सुद्धा उमटले आणि उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीने लोहियाप्रेरित समाजवादाला संपवले. याच काळात आंबेडकरी चळवळीतून आलेल्या विद्यार्थी वर्गाने आपले आगळेवेगळे स्थान जेएनयुमध्ये तयार केले.

जेएनयु विद्यापीठाला आज 50 वर्ष पुर्ण झालीत. या 50 वर्षाच्या काळात जेएनयुने अनेक नामांकित आणि कर्तबगार माणसं घडवली.

भारताच्या सध्याच्य़ा अर्थमंत्री निर्मला सितारमण, सध्याचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर असतील. प्रकाश करात, सिताराम  येचूरी सारखी राजकारणी मंडळी किंवा काल परवा अर्थशास्त्रात नोबेल प्राईज मिळवणारे अभिजित बँनर्जी असतील ही सगळी मंडळी जेएनयूने घडवली आणि या सगळ्यांनी आपल्या कर्तबगारीवर जेएनयूची मान उंचावत ठेवली आहे.

राजकीय वाद विवाद जेएनयूच्या रोजच्या आयुष्याचा भाग होता. मात्र बाहेरच्या जगाकडून त्यावर प्रतिक्रीया दिली जात नव्हती.

मात्र गेल्याकाही काळापासून जेएनयुतील प्रत्येक घटनेला प्रसिद्धी मिळत गेली. त्यांचे देशविरोधी अशी चित्र रंगवण्यात आले. काहीवेळा वेगळे मार्ग अवलंबून दडपण्याचा प्रयत्न देखील केला गेला. पण एक गोष्ट कोण लक्षात घेत नाही की जेएनयुच्या विद्यार्थ्यांचा संघर्ष कधीच कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही तर अख्ख्या सिस्टीमच्या विरोधात सुरु असतो.
आज जेएनयु आपला सुवर्णमहोत्सव साजरा करतोय मात्र अजूनही तिथल्या विद्यार्थ्यांचे शुल्क वाढीचे आंदोलन सुरूच आहे. त्यांच्या छोट्या छोट्या मागण्यासाठी देखील पोलिसांना बोलवून सरकार लाठीमार करत आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचा अट्टाहास करून सध्याचे प्रशासन प्रश्न चिघळवत आहेत हे नक्की.
हे ही वाच भिडू.
Leave A Reply

Your email address will not be published.