शिवजयंती साजरी करण्यावरून जेएनयूमध्ये राडा; या राड्यांना ४० वर्षांचा इतिहास आहे…

काल १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अगदी पहिल्यांदाच आग्र्याच्या किल्ल्यात सुद्धा शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या सगळ्या उत्साहाच्या वातावरणात देशाच्या राजधानीत असलेल्या जेएनयूमध्ये मात्र शिवजयंती उत्सवावरून राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

शिवयंती उत्सवादिनी एबीव्हीपी आणि एसएफआय या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, एबीव्हीपीने आरोप केलाय की, शिवजयंती उत्सवावेळी छत्रपती शिवरायांची प्रतिमा ही डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यंनी खाली फेकली. प्रतिमा खाली पडलेली काही छायाचित्रही माध्यमांनी समोर आणली आहेत. दरम्यान, एबीव्हीपीने आरोप केले असले तरी, एसएफआयने हे सर्व आरोप फेटाळलेत.
एसएफआयचं असं म्हणणं आहे, ‘दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी एसएफआयने कँडल मार्च आयोजित केला होता. या मार्चमध्ये एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनीच आम्हाला मारहाण केली.’

या सगळ्या राड्यामध्ये एनएसयूआय संघटनेनं आपली प्रतिक्रिया दिलीये. एबीव्हीपीवर आरोप करताना एनएसयूआयने म्हटलंय,

“कँपसमध्ये शिवरायांची प्रतिमा ठेवण्यासाठी एबीव्हीपीने विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक होतं, पण एबीव्हीपीनं अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. मात्र या ठिकाणी पुर्वीच काही कार्यक्रम नियोजीत होते त्यामुळं, विद्यार्थ्यांनी प्रतिमा हटवली.”

गेल्या काही वर्षांमध्ये जेएनयूमध्ये वाद वाढलेले आहेत आणि त्यामुळे जेएनयू वादात सापडत आहे असं सांगितलं जातं. मात्र ५३ वर्ष पूर्ण होणाऱ्या जेएनयूमधील वादांना तब्बल ४२ वर्षांचा इतिहास आहे. १९८० मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून जेएनयूमध्ये वाद होत आहेत. 

जेएनयूमध्ये १९८० सालात पहिला वाद झाला होता.

जेएनयूची स्थापना होऊन अवघी ११ वर्ष झाली होती. तेव्हा इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या.  १९८० च्या नोव्हेंबर महिन्यात उजव्या विचारांची विद्यार्थी संघटना आणि डाव्या विचारांची विद्यार्थी संघटना या दोन्ही संघटनांमध्ये काही मुद्यांवरून वाद सुरु झाला. लवकरच हा वाद इतका विकोपाला गेला की, देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना या वादात हस्तक्षेप करावा लागला. 

इंदिरा गांधींनी १६ नोव्हेंबर १९८० ते ३ जानेवारी १९८१ पर्यंत एकूण ४६ दिवस विद्यापीठ बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. सोबतच जेएनयू स्टूडेंट युनियनचे अध्यक्ष राजन यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं. 

त्यानंतर देखील दोन्ही गटातील वाद कायम राहिला पण मोठ्या प्रमाणावर उफाळून आला नाही. जेनयुमध्ये डाव्या विचारांच्या संघटनांकडून घडवण्यात आलेल्या हिंसक घटनांचा मोठा इतिहास राहिला आहे, असं  राजीव गांधींचे चरित्रकार मिन्हाज मर्चंट यांनी माध्यमांना सांगितलं. 

त्यानंतर २० वर्षांनी २००० साली दुसरा वाद झाला होता.

२००० मध्ये जेएनयूमध्ये एका मुशायऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात वेगवगेळ्या अनेक गझला सादर करण्यात आल्या होत्या, पेक्षकांकडून भरपूर दाद सुद्धा मिळाली. मात्र त्यात काही गझला पाकिस्तानच्या समर्थनार्थ सादर करण्यात आल्या होत्या.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या दोन जवानांनी या पाकिस्तानसमर्थित गझलांचा विरोध केला. तेव्हा मुशायऱ्याचं आयोजन करणाऱ्या विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांनी जवानांना प्रचंड मारहाण केली होती असं सांगितलं जातं. जवानांना मारहाण करण्याचा हा मुद्दा भाजप नेते बी. सी. खंडुरी यांनी संसदेत सुद्धा मांडला होता. तेव्हा सुद्धा जेएनयूमध्ये वाद निर्माण झाला होता. 

२००५ मध्ये मनमोहन सिंग यांच्या निर्णयामुळे जेएनयूमध्ये तिसरा वाद निर्माण झाला होता. 

२००५ मध्ये इराणच्या न्यूक्लिअर टेस्टमुळे अमेरिकेने त्या देशावर प्रतिबंध घातले होते. अमेरिकेच्या या निर्णयाचं भारताने सुद्धा समर्थन केलं होतं. त्याचदरम्यान तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जेएनयूमध्ये एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. 

जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग जेएनयू कॅम्पसमध्ये पोहोचले तेव्हा जेएनयूच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. तसेच त्यांचा रास्ता अडवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला असं सांगितलं जातं. 

२०१० मध्ये नक्षली हल्यात जवान शहिद झाल्यानंतर उत्सव साजरा करण्यावरून वाद निर्माण झालेला.

२०१० सालात छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भीषण हल्ला केला होता. नक्षलवाद्यांच्या त्या हल्ल्यात सीआरपीएफ ७६ जवान शाहिद झाले होते. या घटनेनंतर डाव्या विचारांची विद्यार्थी संघटना एआयएसएने याचा जल्लोष साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं, असा आरोप काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआईने केला होता. 

एनएसयूआईने असा सुद्धा दावा केला होता की, या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा सुद्धा देण्यात आल्या आहेत. या प्रकरणामुळे जेएनयूमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापलं होतं.

२०१४ मध्ये कोजागिरी पौर्णिमेला साजऱ्या केलेल्या महिषासुर दिनावरून सुद्धा वाद निर्माण झाला होता.

नवरात्रीनंतर अवघ्या ५ दिवसांनी येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ऑल इंडिया बॅकवर्ड स्टूडेंट्स फोरमने महिषासुर बलिदान दिनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच आयोजन करण्यावरून कोणताही वाद नव्हता. मात्र कार्यक्रमात देवी दुर्गेबद्दल आक्षेपाहार्य भाषेचा वापर करण्यात आलेली पत्रकं वाटण्यात आली होती. या पत्रकांवरून विद्यार्थी संघटनांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यात विद्यार्थ्यांनी एकमेकांना मारहाण सुद्धा केली होती.

२०१६ सालात देशविरोधी नारे देण्याचा प्रकरणामुळे जेएनयू देशभरात चर्चेत आलं होतं. 

२००१ मध्ये भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरु याच्या तिसऱ्या मृत्युदिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चेहरा झाकलेल्या काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याचे व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली होती.

११ फेब्रुवारीला हे व्हिडीओ माध्यमात झळकल्यानंतर पोलिसांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि संघटनेचे सदस्य उमर खालिद यांच्यावर घोषणा दिल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी या आरोपांचं खंडन केलं होतं. त्यानंतर दिल्लीच्या वसंतकुंज पोलिसात स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

पोलिसांच्या या कारवाईत कन्हैय्या कुमार यांना अटक करण्यात आली तर उमर खालिद फरार झाला होता. या प्रकरणात कन्हैय्या कुमार आणि उमर खालिद सोबतच आणखी १० विद्यार्थ्यांवर आरोप करण्यात आले होते. मात्र त्यांनी देखील या आरोपांना नाकारलं आहे. 

२०१९ मध्ये जेएनयू प्रशासनाने होस्टेल आणि ट्युशनची फी वाढवल्यामुळे वाद सुरु झाला होता.

जेएनयू हे भारतातील टॉप विद्यापीठांपैकी एक असले तरी इथली फी फार कमी आहे. देशभरातील गरीब कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्तम संधी मिळावी हाच यामागचा उद्देश आहे. जेएनयूच्या एका विद्यार्थ्यावर सरकारकडून दरवर्षी अंदाजे ३ लाख रुपये खर्च केले जातात.

परंतु २०१९ मध्ये प्रशासनाने होस्टेल, मेस आणि ट्युशन फी मध्ये वाढ केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं. विद्यार्थ्यांनी पायी मार्च काढला. त्याचदरम्यान विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये हिंसक झडप झाली. यात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला असं सांगितलं जातं.

तर २०२० मध्ये तोंड झाकलेल्या काही जणांनी जेएनयूमध्ये मारहाण केली होती.

जानेवारी २०२० मध्ये स्कार्फ आणि कापडाने तोंड झालेल्या काही जणांनी रात्री कॅम्पसमध्ये प्रवेश केला. त्यांनी रॉड, दांडके, लाठ्या घेऊन विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये एकूण ३५ जण जखमी झाले होते. तर विद्यापीठाच्या अनेक वस्तूंचं नुकसान देखील झालं होतं.

या सगळ्या प्रकारामागे उजव्या विचारांच्या संघटनेचा हात आहे असे आरोप डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेने केले होते. उजव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेने हे आरोप नाकारले होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा जेएनयूमधील वाद चर्चेत आला होता.  

याच वादांच्या कडीमध्ये आज जेएनयूमधील नवीन वाद समोर आला आहे. परंतु आजवरच्या ४२ वर्षांमध्ये जे वाद झाले आहेत. ते फक्त वेगवगेळ्या विचारांच्या विद्यार्थी संघटनामध्ये झाल्याचे दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांसोबत दुसऱ्यांच्या विचारांचा सन्मान करणे हेच या समस्येवरील उपाय आहे असं विश्लेषक सांगतात. 

डिसेंबर २०२२ मध्ये जेएनयूच्या भिंतीवर जातीवाचक नारे लिहील्यानं वाद झाला होता.

जेएनयू पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. जेएनयूच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये फॅकल्टी रूमच्या गेटवर काही जातीवाचक नारे लिहिण्यात आले होते. या नाऱ्यांमुळे जेएनयूमध्ये पुन्हा एकदा वाद सुरु झाला होता.

‘ब्राह्मण गो बॅक’, ‘ब्राह्मण भारत छोडो’, ‘गो बॅक टू शाखा’, ‘ब्राह्मो-बनिया वुई आर गोमिंग फॉर यु’ 

लाल रंगात भिंतीवर लिहिण्यात आलेल्या या नाऱ्यांमुळे पुन्हा एकदा विद्यार्थी संघटना एकमेकांच्या विरोधात उभ्या झाल्या होत्या

या सर्व प्रकारामागे डाव्या विचारांची विद्यार्थी संघटना एआयएसएच्या विद्यार्थ्यांचा हात आहे, असा आरोप एबीव्हीपीने केला होता.

जानेवारी २०२३ मध्ये बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून जेएनयूमध्ये वाद झाला होता.

बीबीसीची डॉक्युमेंट्री इंडिया: द मोदी क्वेश्चन ही डॉक्युमेंट्री मुळातच काँट्रेव्हर्सीमध्ये असताना या डॉक्युमेंट्रीचं दिल्लीतल्या जेएनयू मध्ये या डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांसाठी असलेलं हे स्क्रीनिंग सुरू असताना एबीव्हीपी विद्यार्थी संघटनेकडून दगडफेक करण्यात आली असा आरोप झला होता.

त्यानंतर जेएनयूएसयू या विद्यार्थी संघटनेनं प्रशासनाला सवाल विचारले होते तर, एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने देशभरातल्या विविध शिक्षणसंस्थांमध्ये या डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग करणार अशी घोषणा केली होती.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.