पुणे विद्यापिठाच्या प्राध्यापिकेने थेट दिल्ली गाठत जेएनयूचा इतिहास बदललाय

भारतामध्ये तसं बघितलं तर अनेक गाजलेली विद्यापीठं आहेत. मात्र टॉपच्या दहा विद्यापीठाचं नाव घेतलं तर जेएनयूचं (जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी) नाव त्यामध्ये असतंच. जेएनयूची अजून एक खासियत म्हणजे या युनिव्हर्सिटीचं नाव तुम्ही कुणालाही विचारलं तर माहित असतं, म्हणजे अगदी शाळेतला विद्यार्थिही या विद्यापीठाचं नाव सांगतो. यामागे या विद्यापीठाचा इतिहास तर आहेच मात्र वर्तमानही आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने हे विद्यापीठ नेहमीच चर्चेत राहातं.

गेल्या काही वर्षांमध्ये हे विद्यापीठ विद्यार्थी आंदोलनाचं केंद्रस्थान बनलं आहे. कन्हैया कुमार हे गाजलेल्या विद्यार्थी आंदोलनातील प्रचलित नाव. एनआरसीच्या आंदोलनातही या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. नेहमीच या विद्यापीठाचे विद्यार्थी बातम्यांमध्ये झळकत असतात म्हणून अगदी छोटीशी घटनाही झाली तरी माध्यमांचे कॅमेरे जेएनयूकडे वळतात. 

आताही हे विद्यापीठ पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आलं आहे, मात्र यामागे विद्यार्थी हे कारण नसून एक शिक्षक हे कारण आहे. जेएनयूच्या नवीन कुलगुरुंची घोषणा झाली आहे. नवीन कुलगुरूंच्या येण्याने जेएनयूचा इतिहास बदलला गेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच नवीन घटना घडल्याने जेएनयूच्या क्रांतीमध्ये भर पडली आहे.

आजपर्यंत जेएनयूच्या कुलगुरू पदी फक्त पुरुषच होते मात्र यावेळी पहिल्यांदा एक महिला कुलगुरू जेएनयूचा कार्यभार सांभाळणार आहेत. त्यांचं नाव म्हणजे प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित

जेएनयूच्या कुलगुरू पदी नियुक्ती झालेल्या शांतिश्री पंडित यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापक म्हणून त्या काम पाहत आहेत. त्यांनी गोवा विद्यापीठात १९८८ ला अध्यापनाला सुरुवात केली होती आणि त्यानतंर १९९३ मध्ये त्या पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या.

शांतिश्री १९८५ पासून संशोधन करत आहेत. त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून फेलोशिप देखील मिळाली आहे. सोबतच शांतिश्री पंडित या जेएनयूच्या माजी विद्यार्थीही आहेत. त्यांनी जेएनयू विद्यापीठातूनच आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर एमफील आणि पीएचडी केली आहे. 

शांतिश्री पंडित यांनी अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसंच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशासकीय पदे भूषवली आहेत. सध्या त्या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्सेस रिसर्च यांसारख्या संस्थांच्या सदस्या तसंच केंद्रीय विद्यापीठांच्या भेटी देणार्‍या नामांकित व्यक्ती आहेत. 

शांतिश्री तामिळ, तेलगू, संस्कृत, हिंदी, मराठी आणि इंग्रजी बोलू शकतात आणि कन्नड, कोंकरी आणि मल्याळी समजू शकतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. तर, ८ विद्यार्थ्यांनी एम.फिल. केलं आहे.

अशा शांतिश्री यांच्या नियुक्तीचे पत्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. राष्ट्रपती आणि विद्यापीठाचे कुलगुरू रामनाथ कोविंद यांनी शांतिश्री धुलीपुडी पंडित यांच्या जेएनयूच्या कुलगुरूपदी नियुक्तीला मान्यता दिली असून त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी असेल, असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. 

या घोषणेसोबत शांतिश्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीच्या पहिल्या महिला कुलगुरु ठरल्या आहेत.

शांतिश्री पंडित यांच्या नियुक्तीने पुणे विद्यापीठासाठी फार सन्मानाची गोष्ट झाली आहे. आमचा राज्यशास्त्र विभाग हा प्रचंड ताकतीच्या प्राध्यापकांनी भरलेला होता. त्यात शांतिश्री पंडित या पिढीतील शेवटच्या राहिल्या होत्या. त्यांची JNU च्या  कुलगुरूपदी नियुक्ती होणे हे महाराष्ट्रासाठी फार उपयोगी राहील. शिवाय आपली माणसे दिल्लीत असणे हे फार महत्त्वाचं आहे, अशा भावना पुणे विद्यापीठाच्या काही प्राध्यापकांकडून व्यक्त केल्या आहेत.

याआधी एम जगदीश कुमार हे  जेएनयूचे कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडत होते. त्यांचा जेएनयूचे कुलगुरू म्हणून कार्यकाळ जानेवारी २०१६ मध्ये सुरू झाला होता. त्यानुसार २६ जानेवारी २०२१ ला कार्यकाळ संपला होता मात्र त्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. जगदीश कुमार हे २०१९ मध्ये जेएनयूमधील हॉस्टेल फी वाढीबाबतही चर्चेत आले होते. ते विद्यार्थ्यांशी बोलत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती.

आता कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर जेएनयूच्या कुलगुरुपदावर शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची निवड करण्यात आली आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.