रणजीमध्ये प्रचंड दबदबा असलेल्या जे पी यादवने क्रिकेटसाठी जीव पणाला लावला होता….

भारतात आणि जगात कट्टर रसिकांसाठी क्रिकेट म्हणजे जीव की प्राण असा खेळ. ऑल राउंडर खेळाडू असणे म्हणजे तुमच्या बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. गल्लीत क्रिकेट खेळताना आपण सगळे ऑल राऊंडरचं असतो पण प्रोफेशनल लेव्हलवर खेळताना ऑल राउंडर असणं किती गरजेचं असतं याची प्रचिती येते.

कपिल देव नंतर भारताकडे तसा महान ऑल राउंडर झाला नाही, कपिल देवचा वारसदार म्हणून इरफान पठाण, जोगिंदर शर्मा, लक्ष्मीरतन शुक्ला, विजय शंकर सारख्या खेळाडूंची नावं समोर येतात पण

एक खेळाडू असा होता ज्याचं नाव फारसं चर्चिलं गेलं नाही. पण त्याने भारतीय क्रिकेटमध्ये कोच,खेळाडू,मेंटर अशी अनेक पद निभावली आहेत. त्या खेळाडूचं नाव आहे जयप्रकाश यादव अर्थात जे पी यादव. अनसंग हिरो म्हणून जे पी यादवला ओळखलं जातं.

1974 साली जे पी यादवचा जन्म भोपाळमध्ये झाला. वाढत्या वयानुसार अभ्यासात कमी आणि क्रिकेटमध्ये जे पी यादवंच मन रमू लागलं. जीव तोडून मेहनत घेत आणि क्रिकेटमध्ये जीव ओतत वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी जे पी यादव मध्यप्रदेशच्या रणजी टीममध्ये सिलेक्ट झाला. पहिल्या सिजनला विशेष काही त्याला करता आलं नाही पण त्याच्यात तशी चांगला खेळाडू बनण्याची ताकद होती. म्हणून मध्यप्रदेशच्या टीमने त्याला कायम संघात ठेवलं.

पण अचानक जे पी यादवच्या जीवनात एक असं भयंकर संकट आलं 1995 च्या सुरवातीपासून जे पी यादवला पोटात दुखू लागलं होतं. जेवण पचवण्यासाठी त्रास होत होता. सुरवातीला जे पी यादवने या घटनेकडे टीसने दुर्लक्ष केलं. जेव्हा मुंबईत येऊन जे पी यादवने डॉक्टरकडे चेकअप केलं तेव्हा कळलं की त्याला पोटाचा कॅन्सर आहे आणि त्याला 7 केमोथेरपी प्रक्रियेतून जावं लागणार आहे. शिवाय दीड वर्ष क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे.

जे पी यादवच्या या प्रक्रियेदरम्यान वजन कमी होत गेलं,तब्येत ढासळू लागली. केस गळू लागले. क्रिकेटमध्ये परत कधी तो परतेल याची खुद्द त्यालाही शाश्वती नव्हती. अगदी जीवघेणी वेळ आलेली असतानाही त्याचं क्रिकेटबद्दल प्रेम कमी झालं नाही. अनेक लोकांनी त्याला क्रिकेटला रामराम करण्याचा सल्ला दिला पण हा भिडू कित्येक किलिमीटर सायकल वरचा प्रवास करून मध्यप्रदेशच्या रणजी टीममध्ये सामील झाला.

रणजी मध्ये आल्यावर त्याने या आजारपणाबद्दल सांगितलं नव्हतं. फास्ट बॉलिंग ऐवजी तो स्पिन बॉलिंग करू लागला. चांगल्या कामगिरीनंतर आजारपण सुद्धा दूर गेलं याला कारणीभूत होतं जे पी यादवंच क्रिकेट प्रेम. स्थानिक क्रिकेटमध्ये जे पी यादवच्या रेकॉर्डच्या आसपासही कुणी नव्हतं. चांगल्या कामगिरीनंतर 1998 च्या सहारा कपमध्ये जे पी यादवंच सिलेक्शन फिक्स मानलं जात होतं.

1998 च्या सहारा कपला जे पी यादव नाव होतं पण तो दुसरा खेळाडू ज्योती प्रकाश यादव होता. जय प्रकाश यादवंच रेकॉर्ड चांगलं असूनही त्याला संधी मिळाली नाही. पण जे पी ने जिद्द सोडली नाही रणजी ट्रॉफीत त्याने दमदार प्रदर्शन केलं आणि 2002 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या सिरीजमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. पण इथं त्याला फक्त 2 चं मॅच खेळू दिल्या त्यातही एकच रन जेपीला करता आला. म्हणून तो पून्हा एकदा संघाबाहेर गेला.

रणजीमध्ये पुन्हा एकदा चांगला खेळ करत त्याने कमबॅक केलं. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची निवड झाली आणि तिथे त्याने जबरदस्त कामगिरी केली. न्यूझीलँड विरुद्धच्या मॅचला इरफान पठाण सोबत 69 धावा करत 118 धावांची जबरदस्त भागीदारी जे पी यादवने केली होती. यानंतर चांगलं खेळुनसुद्धा फक्त 9 वनडे मॅच खेळण्याची संधी जेपीला मिळाली. 2005 नंतर तो टीममध्ये आलाच नाही.

एकूण 12 वनडे मॅचमध्ये 86 धावा आणि 6 विकेट जेपीला मिळाल्या.

डोमेस्टिक क्रिकेटचा किंग म्हणून जेपीला आजही ओळखलं जातं आणि क्रिकेटसाठी जीव पणाला लावणारा खेळाडू म्हणूनही त्याला ओळखलं जातं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.