आता शिंदेंसोबत युती करणाऱ्या, जोगेंद्र कवाडे यांनी हाजी मस्तानसोबत पक्ष सुरू केला होता…
‘अरे मरणाची भिती कुणाला आहे? हम तो कफन लेके घुमते है’ असं म्हणून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आपल्या सभेतल्या भाषणाला सुरूवात करतात. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि युतीची घोषणा केली.
प्रा. कवाडे म्हणजे आंदोलनांमधून समोर आलेला आणि मोठा झालेला चेहरा.
सध्या राजकारणात सक्रीय दिसत असले किंवा सर्वसामान्यांना ते एक राजकारणी म्हणून परिचीत असले तरीही प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ, पत्रकार, राजकारणी आणि समाजसेवक इतक्या क्षेत्रात काम करणारा हा माणूस.
सामाजिक, राजकीय, शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले जोगेंद्र कवाडे यांना सगळे जण कवाडे सर म्हणून ओळखतात
त्याचं कारण असंय की, कवाडेंनी एम. कॉम पूर्ण केल्यानंतर काही काळ शिक्षण क्षेत्रात काम केलं. प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. ही नोकरी करत असतानाच त्यांचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलंही काम सुरूच होतं.
अनेक सामाजिक चळवळींमध्ये, आंदोलनांमध्ये कवाडे यांनी मोठी भुमिका बजावलीये.
मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनात ते सहभागी होते.
मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनाचा ज्या ज्या वेळी इतिहास सांगितला जातो तेव्हा प्रा. कवाडे यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. त्याचं कारण म्हणजे, या आंदोलनात विशेष लक्षवेधी ठरलेला तो लाँग मार्च. याच लाँग मार्चचे प्रणेते म्हणून कवाडे यांच्याकडे पाहिलं जातं.
त्यांच्या या आंदोलनामुळे तत्कालीन राज्य सरकारला त्यांची दखल घ्यावी लागली होती.
१९७६ मध्ये सामाजिक उठावामुळे तुरूंगवास भोगला होता.
१९७६ मध्ये जेव्हा नवबौद्ध समाजातील नागरिकांच्या सवलतींसाठी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनानंतर त्यांना तिहार जेलमध्ये दहा दिवसांचा कारावास भोगावा लागला होता.
प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दलित, वंचित, आदिवासी आणि मागास महिलावर्गासाठी काम केलंय. याशिवाय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही ते नेहमीच सक्रिय होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा एक बुलंद आवाज म्हणूनही त्यांची ओळख आहे
ही आणि अशी अनेक आंदोलनं, चळवळी त्यांनी केल्या. त्यातलं सगळ्यात गाजलेलं आणि ज्या आंदोलनाने त्यांना ओळख मिळवून दिली ते म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचं आंदोलन.
कवाडेंची राजकीय कारकीर्दही प्रचंड मोठी आहे.
हाजी मस्तान सोबत त्यांनी पक्ष काढला होता.
त्यांच्या राजकीय कारकीर्दीतला एक महत्त्वाचा भाग म्हणजे, त्यांनी मुंबईतला डॉन हाजी मस्तान याच्यासोबत येऊन एक पक्ष सुरू केला होता. ‘दलित-मुस्लीम सुरक्षा महासंघ’ असं या पक्षाचं नाव होतं. कवाडे यांच्याकडे पक्षाचं संस्थापक अध्यक्षपद होतं तर, हाजी मस्तान हा सहसंस्थापक होता.
या पक्षाने मुस्लिम आणि दलित समाजातील मतं मिळवली. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणूकाही या पक्षाने लढवल्या होत्या.
१९९८ ला खासदार झाले.
१९९८ साली चंद्रूर जिल्ह्यातल्या चिमूर या लोकसभा मतदार संघातून भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर पक्षातल्या मतभेदांमुळे त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली. हा पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्षाचा घटक पक्ष होता पण कालांतराने त्यांच्यातले वाद हे समाजासमोर आले.
त्यानंतर २०१४ मध्ये राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून ते विधानपरिषदेवर होते.
आजच्या पत्रकार परिषदेत कवाडे यांनी महाराष्ट्राला धाडसी मुख्यमंत्री लाभलेत असं म्हणत युतीची घोषणा केली.
सध्याची पक्षाची राजकीय ताकद फार नसली तरी भीमशक्तीच्या विभागलेल्या घटकांपैकी एक हा पक्षही आहे. सध्याचं राज्यातलं राजकारण पाहिलं तर, प्रकाश आंबेडकर हे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीच्या तयारीत असतानाच एकनाथ शिंदेंनी कवाडेंसोबत युती केलीये. आता ही युती राजकीय दृष्ट्या पक्षाच्या ताकदीपेक्षा टायमिंग साधण्यासाठी केल्याचं दिसतंय.
त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेआधीच शिवशक्ती- भीमशक्तीला एकत्र आणून एकनाथ शिंदेंनी राजकारणातलं टायमिंग साधलंय, असं बोललं जातंय.
हे ही वाच भिडू: