तिला विसरायचं कितीही ठरवलं, तरी जॉन एलियामुळं ते शक्य नाही…

मैफिल सजलीये… स्वेटर घातलेली, शाल गुंडाळलेली लोकं जिथं जागा मिळेल तिथं बसलीयेत. माहोल एकदम कडक रंगलाय… तेवढ्यात निवेदकाचा आवाज येतो…

खवातिनो हजरात… जॉन एलिया…

पुढची काही मिनिटं कानांवर फक्त टाळ्या येत असतात. हाडाची काडं झालेल्या अंगावर चढवलेला सलवार कुर्ता, रात्रीची वेळ असूनही डोळ्यांवर घातलेला काळा गॉगल, आतमध्ये काय आहे हे माहीत नसलेला एक कप, मानेवर रुळणारे केस आणि यावरुन शेवटचा हात कधी फिरला होता असा प्रश्न पडणारे खप्पड गाल… जॉन आला, सगळ्या मैफिलीला नमस्कार करुन स्टेजवर मांडी घालून बसला…

पहिलं वाक्य बाहेर पडलं… भाईयों १९८५ में तबाह हो चुका था..!

माणूस आपल्याला तबाहीची कथा सांगतोय, रडतोय आणि समोर बसलेली मैफिल वाह वाह करतेय… आपल्याला दुःख होतं की आनंद होतो की रडावसं वाटतं… अजून समजलं नाही. पण जॉन एलिया लय डेंजर माणूस आहे.. हे पहिल्या फटक्यात समजतं.

उर्दू भाषेतल्या ‘दादा’ शायर लोकांपैकी एक. तरीही त्याला अहोजाहो घालावसं वाटत नाही. आजही टेबलला एकटं बसल्यावर वाटतं, जॉन येऊन समोरच्या खुर्चीवर बसेल आणि म्हणेल…

हम को यारों ने याद भी न रखा

‘जौन’ यारों के यार थे हम तो…

जिंदगीत दर्द अनुभवू शकणारी लय कमी लोकं असतात. जॉन त्या सगळ्यांचा मित्र. त्याचा जन्म झाला १९३१ मध्ये, उत्तर प्रदेशमधल्या अमरोहामध्ये. त्याचे वडीलही शायर होते आणि शिक्षणावर त्यांचा भर होता. शिक्षण हेच सगळ्यात मोठं टॅलेंट आहे आणि पुस्तकं हीच खरी संपत्ती, हे जॉनच्या वडिलांनी बालपणापासूनच त्याच्या मनावर कोरलं.

फाळणीनंतर जॉनचं कुटुंब पाकिस्तानात गेलं, मात्र तो भारतातच राहिला. आपले काका हकीम मीर अहमद यांच्याकडे तो जवळपास नऊ वर्ष राहिला. अहमद यांच्या मृत्यूनंतर मात्र जॉनला सीमेपार जावं लागलं. तिथं त्याची शायरीशी जुळलेली नाळ अधिक घट्ट झाली. पण भारताला, आपल्या अमरोह्यातल्या घराला तो विसरला नाही.

जॉननं शायरी लिहिली, नज्म लिहिल्या आणि प्रेमही केलं. तरुणपणी फारहा नावाच्या एका मुलीवर त्याचं प्रेम जडलं. पण भावानं ते तिला कधीच सांगितलं नाही. त्याच्या प्रेम करण्यात पण एक माज होता, प्रेमाची कबुली देण्याला तो कमीपणा समजायचा.. त्याचाच एक शेर आहे…

एक ही हादसा तो है और वो ये कि आज तक

बात नहीं कही गई बात नहीं सुनी गई…

पुढं त्याला जाहिदा नावाची एक पत्रकार मुलगी आवडू लागली. तिलाही जॉन आवडायचा. दोघांनी १९७० मध्ये लग्न केलं. त्यांना तीन मुलंही झाली, १९८४ मध्ये या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जाहिदा वेगळी झाल्यानंतर, जॉन सावरलाच नाही. त्यानं स्वतःला घरात बंद करुन घेतलं, दारु आणि सिगरेटला जवळ केलं. थुंकीवाटे रक्त बाहेर पडू लागलं पण जॉनची दारू सुटली नाही. त्याच्या मित्रांनी त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि १९९० मध्ये वयाच्या साठाव्या वर्षी त्याचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.. तो म्हणजे ‘शायद.’ त्यानंतर, त्याची कित्येक पुस्तकं आली, लोकांनी ती डोक्यावरही घेतली. जॉनचं शरीर २००२ मध्ये हे जग सोडून गेलं.. पण शब्द आजही आहेत आणि कायम राहतील.

मुझ को ख़्वाहिश ही ढूँडने की न थी

मुझ में खोया रहा ख़ुदा मेरा…

जॉनची शायरी लक्षात राहते, कारण ती इतर कुणासारखीच नव्हती. त्यात आपले मोकळे केस घेऊन तो मैफलीत बसला, की सगळ्या मैफिलीला येड लावायचा. शेर सांगता सांगता रडणं असेल, स्वतःचं डोकं बडवून घेणं असेल.. त्याच्यातही सच्चेपण होतं.

माहोल बनलाय म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो.. कॉलेजमध्ये एक पोरगी होती, इतकी सुंदर होती की आपल्याला ओळख दाखवेल असा कॉन्फिडन्सही नव्हता. तिच्याशी बोलायचं कसं? या प्रश्नानं किती रात्री जागवल्या गिणतीच नाही. एक दिवस तिच्या बॅगेत गालिबचं पुस्तक दिसलं. आपल्याला बोलायची लिंक सापडली…

शायद वो दिन पहला दिन था पलकें बोझल होने का

मुझ को देखते ही जब उस की अंगड़ाई शर्माई है…

शायरीची पुस्तकं देण्यावरुन बोलणं सुरू झालं. पुस्तकांच्या पानांचा रंग गुलाबी वाटू लागला… जॉननं प्रेमाची कबुली दिली नव्हती, म्हणून आम्ही पण दिली नाही. डोळे, ओठ आणि शांतता असणारी भेट मात्र बरंच काही बोलून जायची.

किस लिए देखती हो आईना

तुम तो ख़ुद से भी ख़ूबसूरत हो…

…तिनं पाकिटात ठेवायला दिलेला फोटो बघताना एवढंच सुचलं होतं!

पुढं भेटी वाढल्या, शांततेला आवाज फुटला. अत्तराच्या बाटल्या, सुकलेली पानं यांची देवाणघेवाण होऊ लागली. असंच तिला पाठवायला म्हणून शायरी वाचत बसलो, तर जॉननं म्हणून ठेवलेलं…

बहुत नज़दीक आती जा रही हो

बिछड़ने का इरादा कर लिया क्या…

कॉलेज संपल्यावर तिच्या घरच्यांनी लग्नाचा घाट घातला. तिच्या आणि माझ्या घरच्यांचं प्रार्थना करण्याचं स्थळ वेगळं होतं. पुढचा राडा नको म्हणून किंवा आमचा प्रवास इथपर्यंतच होता म्हणून, दोघंही न ठरवता शेवटचे भेटलो. या गोष्टीला लय वर्ष झाली.. तिची आठवण म्हणून पाकिटातला फोटो आणि एक बुकमार्क एवढंच राहिलंय जवळ… विसरायचा लय प्रयत्न करतो, पण बुकमार्कवर लिहिलंय..

तुम्हारी याद में जीने की आरज़ू है अभी..

कुछ अपना हाल सँभालूँ अगर इजाज़त हो

– जॉन एलिया

लय वेळा ठरवलं, तिला विसरुन जावं.. पण शप्पथ सांगतो.. जॉन एलियामुळं ते शक्य झालं नाही!

तुमची स्टोरी दर्दी असो किंवा नसो… कानात हेडफोन घाला आणि हा व्हिडीओ बघा… विषय संपतो!

  • भिडू चिन्मय साळवी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.