त्याचं नाव जॉन, ते जन्माने ख्रिश्चन आहेत अन् ते दरवर्षी उत्साहात घरी गणपती बसवतात

घराघरात गणपती बसले, यंदाचा उत्साहावर तसं विरजणचं पडलं आहे. घरातच असल्याने अनेकांनी यंदा घरातचं मुर्ती तयार केल्या आहेत. एकंदरीत वातावरण कसही असलं तरी आपण सण साजरे करण्यात मागे हटत नाही हेच खरं. पुरेशी खबरदारी घेवून आनंद हा व्यक्त करायलाचं हवा.

असो तर मुळ मुद्यावर येवुया. दरवर्षी एखाद्या मशिदीमध्ये बसवला जाणारा गणपती, मुस्लीम व्यक्तींचे गणपती प्रेम अशा गोष्टी आपण ऐकतच. ही गोष्ट देखील तशीच आहे. गोव्याच्या एका दिलखुलास माणसाची. हा माणूस धर्माने ख्रिश्चन. मात्र पंचा नेसून गणपतीची पूजा करतो. घरात गणपतीची प्रतिष्ठापना करतो.

आमचं आणि तुमचं हा भेदभाव आजूबाजूला वाढत असताना आपणाला त्यांच्या या गोष्टींच कौतुक वाटतं तेव्हा आपण जेव्हा त्यांना ख्रिश्चन असून गणपती बसवण्याचं कारण विचारतो तेव्हा ते उत्साहाने म्हणतात,

मला सर्व धर्म आवडतात आणि तोच माझा खरा सर्वधर्मभाव असतो. 

गेली सहा वर्ष आपल्या घरात गणपती बसवणाऱ्या या व्यक्तींच नाव आहे जॉन आगियार. जॉन हे गोव्याच्या रेस मागोस चे. जॉन गोव्याच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातून माहिती अधिकारी म्हणून रिटायर झाले.

जॉन यांच्याबद्दलची किर्ती ऐकून बोलभिडूने त्यांच्या घरी भेट दिली. आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा घराच्या बाहेर तुळस आणि आत येशू क्रॉस दिसले. त्यांच्या घरात देवघर देखील आहे आणि येशूंचा क्रॉस देखील.

त्यांच्यासोबत बोलताना आम्ही त्यांचा एक छोटासा व्हिडीओ तयार केला, यामध्ये ते म्हणतात,

 

गणपती ही विद्येची व निसर्गाची देवता आहे. मी आणि माझी पत्नी अंबाबाईचे भक्त आहोत. गेल्या चार वर्षांपासून आमच्या घरी गणपती बसवण्यास सुरवात झाली आणि ती परंपरा हा कायमस्वरूपी जपली जाईल.

धर्माच्या आधारे देवतांना हा देव मुस्लिमांचा, हा हिंदूंचा आणि हा  ख्रिश्चनांचा असे वाटले जाते. खरेतर हे चुकिचे आहे. प्रत्येक देवाच्या आराधनेचा आणि सेवा करण्याचा अधिकार प्रत्येक मानवाला असायला हवा. मी प्रत्येक धर्माचा आदर करतो आणि प्रत्येक धर्मात असणाऱ्या देवानंही मानतो.

आपण मेल्यानन्तर स्वर्ग किंवा नर्क जे काही आपल्याला प्राप्त होईल. तेथे हे भेदभाव असतील असे मला वाटत नाही. कारण देवाच्या दारात सगळे एक आहेत, असेही ते म्हणाले. 

दरवर्षी येथे आजूबाजूचे लोक उत्साहाने येतात. जॉन यांनी सुरु केलेल्या गणपती पूजनाचे कौतुक येथे सर्वांनाच असते.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.