अमेरिकन कंपनीचा भारतीय मालक ज्याने औषधे विकण्यासाठी डॉक्टरांच्या समोर स्ट्रिपर्स नाचवल्या..

अमृतसरचा एक व्यक्ती, तो अमेरिकेत पोहोचला. खूप मोठा माणूस बनला. त्याने एक औषध कंपनी काढली. त्याच्या कंपनीनमध्ये विशिष्ट प्रकारचे एक औषध बनवले जायचे. त्या औषधीचं नाव होतं, सबसिस!

औषधाची चांगली विक्री व्हावी म्हणून हा माणूस डॉक्टरांसमोर स्ट्रिपर्स नाचवत असायचा. स्ट्रिपर्स म्हणजे त्या मुली, ज्या नाचताना एक-एक करून कपडे काढतात. डॉक्टरांना याव्यतिरिक्त आणखीही काही गोष्टी मिळत असायच्या. महागडी दारू, वर्ल्ड क्लास जेवण, पार्ट्या,अनेक महागडी गिफ्ट्स, त्यांच्या नातेवाईक-मित्रांसाठी नोकऱ्या. हे सर्व यासाठी चालले होते कि, डॉक्टरांनी सबसिस औषधच जास्तीत जास्त रुग्णांना लिहून द्यावे.

ही कोणत्या हॉलिवूड मूव्ही ची स्टोरी नाहीये तर खरंच असा एक माणूस होता. या माणसाचं नाव होतं, जॉन नाथ कपूर. ‘फोर्ब्स मॅगझीन’ ज्यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी पब्लिश केली जाते, त्या यादीत जॉनचे दोनदा नाव आलेले.

आता त्याच्यावर बोस्टनमधील न्यायालयात खटला सुरू आहे. 2019 मध्ये जॉन ला एफबीआयने अटक केली होती. त्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. सर्वात जास्त गंभीर आरोप हा कि, नशा करण्याची सवय लावली तेही, औषधात मिसळून. हे औषधं पण कसली? तर कॅन्सर ची.

कॅन्सरच्या औषधांचा ओव्हर डोस वाढवून लोकांना नशा करण्याची सवय लावली, आणि त्याची पत्नी कशी मरण पावली हे माहितीये का? तर ब्रेस्ट कॅन्सरने ! इथं केलेली पापं, इथेच फेडावी लागतात ते म्हणतात ना, ते जॉनच्या बाबतीत खरंच झालं .

कोण होता हा जॉन कपूर?

अमृतसरमध्ये जन्मलेला जॉन नाथ कपूर याची ओळख लाेकोपयोगी कार्यात मदत करणारी व्यक्ती अशी आहे. स्वातंत्र्याच्या चार वर्षे आधी 1943 मध्ये त्याचा जन्म झाला. कॉलेजमध्ये गेलेला त्याच्या कुटुंबातील तो पहिलाच व्यक्ती होता. शहर मुंबई. त्याने ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून फार्मसीचे शिक्षण घेतले, त्यानंतर १९६० मध्ये तो भारतातून अमेरिकेत गेला. न्यूयॉर्कमध्ये बफेलो युनिव्हर्सिटी आहे, तिथून जॉनने औषधी रसायनशास्त्रात डॉक्टरेट केली.

ज्या शहरात त्याने शिक्षण घेतले त्याच शहरात त्याला नोकरीही मिळाली. इन्व्हेनेक्स लॅबोरेटरीज ही न्यूयॉर्कमधील एक औषध बनवणारी कंपनी होती. जॉनने येथे सहा वर्षे काम केलं.

पण जॉनला आयुष्यभर काम करायचं नव्हतं, त्याने स्वतःचं काही सुरु करावं म्हणून उद्योगात उतरला. 1978 मध्ये त्याने लाइफोमेड नावाच्या औषध कंपनीशी संपर्क साधला. जॉनला इथे नोकरी तर मिळालीच, परंतु कंपनीचा मालक- स्टोन कंटेनर याने त्याच्याशी एक करार केला. कंपनी स्टोन कंटेनर कार्डबोर्ड बनविण्याच्या व्यवसायात होती. जेंव्हा ते फार्मा बिझिनेस सोडतील तेंव्हा ते जॉनला लाइफोमेड विकून टाकतील.

जॉनने 1981 मध्ये गुंतवणूकदार जमा केले. पैसे जोडले आणि लाइफोमेड विकत घेतले. 1983 मध्ये ती एक पब्लिक कंपनी बनली. त्यावेळी अमेरिकेने जेनेरिक औषधांच्या बाजूने कायदे बनवले. लाइफोमेडची विक्री वाढली. 1983 मध्ये त्याची विक्री सुमारे 136 कोटी रुपये (आताच्या दराने) झाली.

1989 पर्यंत ती वाढून 1,137 कोटी रुपये झाली होती. यां कंपनीचा एफडीए (अन्न व औषध प्रशासन) सोबत काही इशु होते. एफडीएचे म्हणणे होते की, जॉनच्या कंपनीने औषध बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करत नाही. 1990 मध्ये जॉनने ही कंपनी जपानमधील फुजिसावा फार्मास्युटिकल्सला विकली. ही डील तब्बल 7,156 कोटी रुपयांची होती.

1992 मध्ये फुजिसावाने जॉनवर केस केली. कारण मागील रेकॉर्ड्स मुळे कंपनीच्या मागे एफडीएच्या अडचणी खूप आहेत. शेवटी फुजिसावा आणि जॉन १९९९ मध्ये सेटलमेंट झाली आणि विषय संपला. 1991 मध्ये जॉनने एकरॉन नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली. या कंपनीने आणखी काही कंपन्यांचे स्वत:मध्ये विलीनीकरण केले आणि मोठी कंपनी म्हणून समोर आली.

जॉनला सबसिस बनवण्याची आयडिया कोठून आली?

1992 मध्ये जॉनने शिले फार्मा ही कंपनी स्थापन केली. तो एकटाच याचा मालक नव्हता. पॅट्रिक फोर्ट्टो हा त्याचा पार्टनर होता. पॅट्रीकला औषध विकण्याचा अनुभव होता. शिले फार्माच्या आधी तो औषध कंपन्यांची विक्री वाढवण्यासाठी तो कॉन्ट्रॅक्ट घेत असे. जेव्हा औषध कंपन्यांना विक्री वाढवायची असायची तेंव्हा ते पॅट्रीकला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे. पॅट्रिकने आपला अनुभव शिले फार्ममध्येही वापरला.

ही कंपनी हृदयरोग, लहान मुलांची आणि ऍलर्जीची औषधे बनवत असे. ही कंपनी फार्माचा अनुभव नसणाऱ्यांना नोकरीवर ठेवत नसे, तर नुकतेच पास आऊट असलेले फ्रेशर्स, नर्सेस इत्यादींना नोकरीवर ठेवत असायचे. त्यांना सांगण्यात आले कि, डॉक्टरांनी आपल्याच कंपनीची औषधे रुग्णांना लिहून दिले तर त्यांना कमिशन मिळेल. आणि ही स्ट्रेटजी कामी आली. शिले फार्मा कंपनीमध्ये हृदयरोग असलेल्या रुग्णांसाठी खास स्प्रे बनवला जायचा. हा स्प्रे हृदयातील दुखणं कमी करायचा. यातूनच जॉनला सबसिस बनवण्याची कल्पना सुचली.

आणि मग इनसिस बनवली.

त्यानंतर 2002 मध्ये जॉनने इनसिसची निर्मिती केली. पॅट्रिकही 2011 मध्ये यात सामील झाला. जॉनचा या कंपनीत सुमारे 60 टक्के हिस्सा आहे. त्याचे सर्वात कुख्यात औषध म्हणजे सबसिस. हा एक प्रकारचा स्प्रे आहे. जेव्हा कर्करोगाच्या रुग्णांना तीव्र वेदना होतात, तेव्हा त्या वेदना थांबावण्यासाठी हे इनसिस स्प्रे जिभेखाली मारला जातो. हे औषध इतके वाईट होते की घेणाऱ्याला त्याचे व्यसन लागायचे.

कारण त्यात एक प्रकारचं ड्रग्स ‘फॅन्टानिल’ टाकलं जायचं. हा एक प्रकारचा ओपिओइड होता. जॉन कडून लाच घेणारे डॉक्टर कर्करोग नसलेल्या रुग्णांनाही ही औषधे लिहून द्यायचे असा आरोप त्यांच्यावर होता. जॉनच्या कंपनीवर 2015-16 पासूनच हे आरोप होऊ लागले होते. ऑक्टोबर 2017 मध्ये जॉनला प्रथमच अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगातच आहे.

जॉन वरील सर्वात गंभीर आरोप असे आहेत कि,

१. डॉक्टरांना जॉनच्या कंपनीचेच औषध लिहून देण्यासाठी लाच देणे.

२. कर्करोग नसलेल्या रुग्णांना ओपीऑइड या औषधाचा जादा डोस लिहून देणे.

३. विमा कंपन्यांची फसवणूक करणे.

जॉनचा मोडस ऑपरेंडी काय होतं ?

जॉनच्या कंपनीने सबसिस विकण्यासाठी भरपूर पैसे खर्च केले. कंपनी विशेष इव्हेंट्स आयोजित केले जायचे. यात डॉक्टरांना बोलावण्यात यायचे. डॉक्टरांचे बाहेर सांगायचे कि, त्यांना औषधी आणि त्याचा वापर आणि इतर आवश्यक वस्तूंवर संशोधन जाणून घ्यायचे आहे. परंतु आत मध्ये तर डॉक्टरांसाठी खास पार्टींचे आयोजन केले जायचे.

या पार्ट्यांमध्ये सर्व प्रकारची चैनी चालायची. दारू पाण्यासारखी वाहत असायची. फक्त इतकेच नाही तर डॉक्टर मंडळींना भुलवण्यासाठी नग्न स्ट्रिपर्सचा देखील वापर केला जायचा.

यां व्यतिरिक्त जॉन कडून लाच ही वेगळी मिळायची. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ 2016 मध्ये डॉक्टरांना सुमारे 18 हजार वेळा पगार देण्यात आला होता. संपूर्ण ट्रांजेक्शनची एकूण किंमत सुमारे 14 कोटी 23 लाख होती.

जॉन इन्शुरन्स कंपनीला देखील चकमा द्यायचा.

बुद्धिमान लोक मेडिकल इन्शुरन्स घ्यायचे. जेणेकरून ते आजारी असतील तर औषध कंपन्यांनी त्यांच्या उपचारांचा, त्यांच्या औषधांचा खर्च उचलावा. पण ही सबसिस औषध खूप महाग होते. आता कर्करोगात घेतले जाणारे हे औषध उर्वरित रुग्णांना का दिले जात आहे?

विमा कंपनीने हे सर्व प्रश्न विचारले तर कदाचित संपूर्ण प्रकरण उघडकीस पडले असते. पण जॉनने त्यावर उपाय काढला. त्याच्या कंपनीतील काही लोक डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये त्या डॉक्टरांचा कर्मचारी बनून बसत असत.

विमा कंपन्या जेव्हा एखाद्या रुग्णाबद्दल विचारण्यासाठी यायच्या, तेंव्हा जॉनची लोकं त्यांना खोटं उत्तरं द्यायची. जेणेकरून एजंट औषधाची किंमत क्लीअर करून टाकायचा.

प्रकरणे वाढत असताना आरोग्य विमा कंपन्या सतर्क झाल्या. सबसिस हे औषध बाकीच्या रुग्णांना दिले तर आम्ही विमा संरक्षण देणार नाही, असे इन्शुरन्स कंपनीचे म्हणणे होते. जॉन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला सामोरे जाण्याचा कट रचला. त्यांनी ‘रिइम्बर्समेंट युनिट’ तयार केले. काय झाले की, विमा आणि फार्मसी बेनिफिट मॅनेजरला (पीबीएम) आधीच परवानगी मिळून जायची. नंतर मंजुरीचा अप्रूवल साठी वेगळी प्रोसिजर करण्याची गरजच नसते.

हे पीबीएम काय होते?
अमेरिकेतील उपचार खूप महाग असतात, कदाचित जगातील सर्वात महागडे. आरोग्य विम्याशिवाय लोक तेथे टिकू शकत नाहीत. पण तुम्ही विम्याचा हप्ता भरू शकता. विमा नसेल तर वैद्यकीय उपचार आपल्य कुवतीच्या बाहेर असतात.

पीबीएमची भूमिका बघायला गेलं तर, पीबीएम हे थर्ड-पार्टी ऍडमिनिस्ट्रेटर असतो. म्हणजे विमा घेणारा आणि विमा कंपनी यांच्यातील दुवा. जेव्हा दोन्ही पक्षांमध्ये क्लेम ची सेटलमेंट व्हायची तेव्हा ती पीबीएम ची भूमिका असायची. कार-बाईक असलेल्या थर्ड पार्टीपेक्षा हे वेगळे आहे. म्हणजे जॉन आणि त्याच्या साथीदारांनी अशा प्रकारे विमा कंपन्यांची फसवणूक होत होती… हा गेम बऱ्याच वरच्या लेव्हल वरून चालला होता.

हे रिम्बर्समेंट युनिट द्वारे जॉन मोठी चलाखी करत होता. उपचाराच्या वेळी डॉक्टरांनी जे काही औषध दिले त्याचा खर्च विमा कंपनीला बसत होता. कंपनीला माहित नसायचे की ते कोणत्या औषधासाठी क्लेम देत आहेत. असे करून जॉनने विमा कंपन्यांना बराच काळ फसवत राहिला.

अमेरिकेची दुखती नस म्हणजे ही ओपिऑइड औषध .

ओपिऑइडचं व्यसन अमेरिकेमधील एक महामारी होती. चरस -गांजा वाईटच, कारण एक म्हणजे त्यामुळे होणारे नुकसान. दुसरं म्हणजे त्याचे व्यसन. ओपिओइड्स ही औषधांच्या स्वरूपात असणारे एक ड्रग्सच आहेत. यांचा उपयोग म्हणजे, खूप तीव्र वेदना दडपून टाकाण्यात मदत होते. खूप वेळ वापरला तर तो परिणामही निघून जातो. आणि वेदनाही वाढू शकतात. बाकी त्याचे व्यसन लागण्याची शक्यता वेगळीच आहे.

त्याचा जास्त वापर केल्याने मृत्यूही होऊ शकतो. ओपिओइड्सचा वापर हा अमेरिकेतील एक साथीचा रोग बनला आहे. 1999 नंतरच्या काही वर्षांत, प्रिस्क्रिप्शनमध्ये ओपिओइड औषधांच्या औषधांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्याच्या ओव्हरडोसमुळे मृतांची संख्या वाढली. आकडेवारीनुसार केवळ 2017 मध्ये या औषधामुळे 47,600 लोकांचा मृत्यू झाला.

जॉन ने एका स्ट्रिपरला सेल्स मॅनेजर बनवले.

इन्सिसच्या नफ्यासाठी जॉन ने काय काय नाही ते सगळे प्रयत्न केले. याचं एक उदाहरण म्हणजे, एक मुलगी होती, तिचे नाव सनराइज ली होते. ती स्ट्रिपर होती. जॉनच्या कंपनीने तिला सेल्स मॅनेजर पद दिले. न्यायालयात देण्यात येणाऱ्या साक्षींपैकी एक म्हणजे एलेक बार्लाकॉफची साक्ष. एलेक जॉनच्या कंपनीत काम करत होता. त्याच्या म्हणण्यानुसार, जॉनकडून लाच मिळालेल्या डॉक्टरांमध्ये सनराइजचे खूप आकर्षण होते. डॉक्टरांना आकर्षित करणे हे तिचे काम होते. जेणेकरून ते डॉक्टर तिच्या मोहापायी रुग्णांना सबसिस देतील. जॉनच्या विरोधात साक्ष देणारे एलेकसह इतरही अनेक कर्मचारी होते.

जॉनचं प्रकरण इतकं मोठं का आहे?

इन्सिस ही एकमेव कंपनी नाही ज्याने अंमली पदार्थांचा गैरवापर केला आहे. 2008 मध्ये सेफालॉनने कोट्यवधी रुपयांचा दंड भरला होता. असे आढळले की त्याने ऍक्टिक नावाच्या औषधाला बढावा दिला होता. मायग्रेन, ऍनिमिया सारखे आजार, अगदी जखमेवरची पट्टी बदलताना यांचा वापर करावा इथपर्यंत यांचा वापर वाढवण्यात आला होता.

सेफालॉनने या कर्करोगाच्या औषधाच्या वापराला चालना दिली. नंतर हे 2011 मध्ये इस्रायलच्या टेवा फार्मास्युटिकल्सने विकत घेतले होते. जेवढा मोठा गुन्हा सेफालॉनने केला होता, त्यामानाने ते खूप स्वस्तात सुटले गेले होते. इन्सिस थेरप्युटिक ही अमेरिकेची पहिली सर्वात मोठी औषध कंपनी आहे ज्यावर एवढी मोठी कारवाई झाली होती. इथे योग्य तो न्याय मिळाला तर बाकीच्या औषध कंपन्यांनाही आवश्यक तो संदेश मिळेल.

32 वर्षीय सारा फुलप ची केस, 25 मार्च 2016 मध्ये फोर्ब्समध्ये छापली गेली.

या दिवशी साराला आपल्या आईची गाडी दुकानात सोडायची होती, याची तिला आठवण करून देण्यासाठी सकाळी आठ वाजता तिच्या आईने साराला फोन केला. तिला वाटलं की ती झोपली असेल. साराने फोन उचलला नाही. त्यानंतर आईने साराच्या होणाऱ्या नवऱ्याला फोन केला. तो साराला उठण्यासाठी तिच्या खोलीत गेला, तर सारा जमिनीवर पडली होती. मृतावस्थेत.

तिच्या डेड बॉडीची तपासणी करण्यात आली तेंव्हा कळलं कि, साराचं औषध चालू होतं. ती दोन औषधे घेत असे. एक सेनेक्स, हे औषधी ऐन्ग्जाइटी साठी होते. दुसरं औषध होतं सबसिस. हे कॉम्बिनेशन प्राणघातक होते. साराला काय कॅन्सर नव्हता. अपघातानंतर तिच्या पाठीला आणि मानेला दुखापत झाली. त्या हाडांचे दुखणे वाढत होते, हे दुखणे कमी करण्यासाठी ती घेत असे. अशा रुग्णाला सबसिस देणे हा गुन्हा होता.

साराचे कुटुंब सब्सिस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला साराचे मारेकरी समजते, असं समजणे काही चुकीचं नव्हतं. 2015 मध्ये इन्सिसने एकूण 2,368 कोटी रुपयांची औषधे विकली. ही विक्री केवळ कर्करोगाच्या रुग्णांच्या आधारावर नव्हती. त्यातील एक मोठा भाग सारासारख्या रुग्णांना विकला गेला. जॉन कपूरवरचा हा आरोप सिद्ध झाला तर तो 25 वर्ष तुरुंगाची हवा खाईल. जरी तो गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले तरी, त्याच्या गुन्ह्याच्या तुलनेत ही खूप सामान्य शिक्षा असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.