याच वकिलाच्या माध्यमातून राणी लक्ष्मीबाईंनी ठणकावून सांगितलं होतं- “मै अपनी झांसी नही दूंगी”

झांसीची राणी लक्ष्मीबाई

आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटीशांशी लढत राहिल्या पण कधीच त्यांची गुलामी स्वीकारली नाही. आपल्या पराक्रमामुळे झांसीची राणी इतिहासात अजरामर झाली. इंग्रजांविरुद्धच्या लढाईत लढताना राणीला हौतात्म्य प्राप्त झालं.

इंग्रजांविरुद्धच्या लढाईत ब्रिटीश कॅप्टन रोड्रिक ब्रिग्ज यानं पाहिलांदाच राणीला लढताना बघितलं होतं. पण त्यापूर्वी फक्त एकच ऑस्ट्रेलियन वकील आणि पत्रकार होता, ज्याने राणी लक्ष्मीबाईना अतिशय जवळून बघितलं होतं. राणीने ज्यावेळी आपली केस लढण्यासाठी त्याला बोलावलं होतं, त्यावेळी ही भेट झाली होती.

जॉन लँग असं या वकिलाचं नाव.

wandering india

जॉन लँग यांनी ‘वांडरिंग्ज इन इंडिया’ नावाचं पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकात लँगच्या राणीशी झालेल्या भेटीचा संदर्भ बघायला मिळतो. पुस्तकात लँग यांनी  राणीसोबत झालेल्या भेटीविषयी आणि राणीच्या सौदर्याविषयी लिहिलंय.

कशी झाली राणी लक्ष्मीबाई यांच्याशी भेट…?

२८ एप्रिल १८५४ रोजी ब्रिटीश मेजर एलीस याने राणी लक्ष्मीबाईना आपला किल्ला खाली करण्याचा आदेश दिला होता. दत्तकपुत्र दामोदर यांचा दत्तकविधी अवैध घोषित करत इग्रजांनी हा फर्मान काढला होता. त्यामुळे राणी लक्ष्मीबाई किल्ला सोडून ‘राणी महाल’ याठिकाणी राहायला गेल्या होत्या.

राणी लक्ष्मीबाईनी लंडनच्या कोर्टात ‘ब्रिटीश इस्ट इंडिया’ कंपनी विरोधात केस दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. हीच केस लढवण्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी  आपला वकील म्हणून जॉन लँग यांची नियुक्ती केली होती. त्यासंदर्भात राणींना भेटण्यासाठी लँग ‘राणी महाल’ येथे आले होते.

जॉन लँग आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यादरम्यान एक पडदा होता परंतू दत्तकपुत्र दामोदर याने  हा पडदा हटवल्यामुळे राणी जॉन लँग यांच्यासमोर आल्या. थोड्याच वेळात राणींनी हा पडदा परत टाकला परंतु तोपर्यंत लँग यांनी राणी लक्ष्मीबाईंना बघितलं होतं.

….तर ब्रिटीश गव्हर्नर जनरल सुद्धा तुम्हाला झांसी परत देऊन टाकील !

राणी लक्ष्मीबाईंच्या सौदर्याने प्रभावित झालेले लँग त्यावेळी त्यांना म्हणाले की,

“ तुम्हाला बघता आलं हे मी माझं सुदैव मानतो आणि मी विश्वासाने सांगू शकतो की एवढ्या सुंदर राणीचं दर्शन झालं तर ब्रिटीश गव्हर्नर जनरल सुद्धा तुमची झांसी तुम्हाला परत देऊन टाकील”

राणी लक्ष्मीबाईंनी देखील लँग यांची ही कॉम्पलीमेंट स्वीकारली आणि पुढे त्यांनी लँग यांच्याशी केसच्या संदर्भात चर्चा केली. इंग्रजांविरुद्धची न्यायालयीन लढाई जोरदारपणे लढण्याचा इरादा बोलून दाखवला. याच भेटीमध्ये राणी लक्ष्मीबाईंची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेलं मै अपनी झांसी नही दूंगी असं लक्ष्मीबाईंनी लँगच्या माध्यमातून ब्रिटिशांना ठणकावून सांगितल्याचं मानलं जातं.

कोण होते जॉन लँग..?

जॉन लँग हे प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन लेखक, पत्रकार आणि वकील होते. त्यांचा जन्म सिडनी इथला. परंतु त्यांची बहुतांश हयात भारतात गेली. १८१६ साली ऑस्ट्रेलियात जन्मलेले लँग हे आपले मेव्हणे पीटरसन यांच्या आग्रहावरून भारतात आले होते. पीटरसन हे कोलकात्यात प्रतिथयश वकील म्हणून प्रसिद्ध होते.

भारतात आल्यानंतर लँग यांनी मेरठ येथून ‘द मोफूसीलाइट’ नावाचं वृत्तपत्र देखील सुरु केलं होतं. ‘मोफूसीलाइट’ हे फक्त वृत्तपत्राचं नावच नव्हतं तर याच टोपणनावाने ते लिखाण देखील करत असत.

ब्रिटीश साम्राज्यवादाचे कट्टर विरोधक असणाऱ्या लँग यांनी भारतात आल्यानंतर ‘ब्रिटीश इस्ट इंडिया’ कंपनी विरोधात एक केस लढवली होती आणि जिंकली देखील होती. त्यामुळेच आपली केस लढविण्यासाठी राणी लक्ष्मीबाई यांनी  लँग यांची नियुक्ती केली होती.

१८६४ साली जेव्हा त्यांचं निधन झालं त्यावेळी मसुरी येथील ‘कॅमल्स बॅक’ दफनभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. इस्ट इंडिया कंपनी विरोधात केस लढणारा आणि राणी लक्ष्मीबाईंना मदत करणारा हा ऑस्ट्रेलियन वकील भारतीयांसाठी ‘हिरो’ होता. २०१४ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील लँग यांना ऑस्ट्रेलियाचा भारतातील पहिला सांस्कृतिक दूत म्हंटलं होतं !

 

Leave A Reply

Your email address will not be published.